उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा हातखंडा 

 एचडीपीई जाळीच्या आधारामुळे कारलीच्या वेलींची झालेली निकोप वाढ.
एचडीपीई जाळीच्या आधारामुळे कारलीच्या वेलींची झालेली निकोप वाढ.

लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व नरेंद्र हे पाटील बंधू चक्राकार पीकपद्धतीचा अवलंब करतात. पॉली मल्चिंगचा वापर व एकूण चोख व्यवस्थापनातून अन्य नगदी पिकांबरोबर उन्हाळी कारली पिकातही त्यांनी हातखंडा तयार केला आहे. त्यांच्या उत्कृष्ट कारल्याला दरही चांगला मिळतो. यंदाचा या पिकाचा त्यांचा चौथा हंगाम आहे.     जळगाव जिल्ह्यातील लोणी (ता. चोपडा) हे जळगावपासून सुमारे ४० किलोमीटरवरील गाव सातपुडा पर्वतालगत आहे. या भागात पाण्याची समस्या आहे. जमीन काळी कसदार, मध्यम प्रकारची आहे. येथील भरत, गणेश व नरेंद्र हे पाटील बंधू प्रगतशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहेत. नरेंद्र हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विस्तार परिषदेचे सदस्य आहेत.  पारंपरिक शेतीला चक्राकार व नावीन्यपूर्ण उपक्रमांची जोड या पाटील बंधूंनी दिली आहे. तिघेहीजण शेतीचे व्यवस्थापन उत्तमपणे पाहतात. कलिंगड, खरबूज, पपई, भाजीपाला शेतीत त्यांचा हातखंडा आहे. शेतीसोबत गावचे पोलिस पाटीलपदही नरेंद्र समर्थपणे सांभाळतात.  शेतीपद्धती  पाटील यांची ३० एकर संयुक्त शेती. पाच कूपनलिका. या वर्षी पाणीटंचाई आहे. मात्र पाण्याचा काटेकोर वापर सुरू आहे. दोन सालगडी व दहा महिला मजूर वर्षभर कार्यरत असतात. केळी, कापूस, मका, पपई, कलिंगड, खरबूज, कारली आदी पिकांची विविधता शेतात दिसून येते. सुमारे दोन एकरांत संकरित कारले पिकाची शेती नरेंद्र नित्याने म्हणजे सुमारे तीन ते चार वर्षांपासून करीत आहेत. त्यापूर्वी जूनमध्ये करटुले पीक घेण्याचा प्रयोग केला. मात्र बियाणे संबंधित काही कारणांमुळे हे पीक यशस्वी झाले नाही. त्याच एक एकर रिकाम्या क्षेत्रात मल्चिंगवर कारले घेण्यास सुरवात केली.  कारल्यासाठी जाळीचा वापर  वेलींना आधार देण्यासाठी सुरवातीला पारंपरिक पद्धतीने बांबू, तार व तागाच्या बारीक दोरीचा वापर व्हायचा. त्यामुळे वेलीच्या पुढील नाजूक भागास इजा व्हायची. या दोऱ्या तुटून गुंता वाढायचा. नुकसान व्हायचे. वाढ खुंटून पीक १० ते १२ दिवस लांबणीवर पडायचे. त्यानंतर आधार देण्यासाठी एचडीपीई प्रकारच्या जाळीचा उपयोग केला. नाशिक येथून ही जाळी आणली आहे. तिची उंची पाच फूट आहे. लागवडीनंतर सात दिवसांत या जाळीचा आधार पिकाला दिला. मऊ व लवचिक असलेली ही जाळी उभी करण्यासह आडवा ताण देण्यासाठी बांबू व तारांचा वापर केला. जाळी विणलेली असल्याने वेल त्यावर पसरण्यास मोठा वाव आहे. ताणल्याने ती तुटत नाही. तीन वर्षे टिकू शकते. यामुळे आणखी पुढील दोन हंगाम ती उपयोगात येईल. दोन एकरांसाठी त्यासाठी ३० हजार रुपये खर्च आला आहे.  लागवड व्यवस्थापन 

  • ज्या क्षेत्रात लागवड, तेथे एकरी तीन ट्रॉली शेणखताचा वापर 
  • पॉली ट्रेमध्ये कोकोपीट, निंबोळी पावडर, ट्रायकोडर्मा यांचा वापर करून रोपनिर्मिती. 
  • जानेवारीत रोपांची लागवड 
  • एकरी पाच ते सहा हजार रोपसंख्या. 
  • दोन ओळींमधील अंतर सहा फूट; तर दोन रोपांमधील अंतर दीड फूट 
  • सुमारे एक ते सव्वाफूट उंचीचा गादीवाफा, प्लॅस्टिक मल्चिंग व ठिबक सिंचनाचा वापर. 
  • रासायनिक खतांचे स्वतंत्र वेळापत्रक तयार केले आहे. 
  • साधारण ५५ दिवसांत काढणी सुरू होते. 
  • प्लॉट जुलैपर्यंत चालतो. 
  • दोन दिवसाआड एकरी चार ते सहा क्विंटल तोडा मिळतो. 
  • एक मजूर दररोज ६० किलोपर्यंत तोडणी करतो. त्यास प्रतिदिन १०० रुपये मजुरी द्यावी लागते. 
  • उत्पादन व विक्री  एकरी आठ ते नऊ टन उत्पादन मिळते. उत्पादन खर्च सुमारे ५० हजार रुपये होतो. विक्री अडावद (ता. चोपडा), चोपडा, किनगाव (ता. यावल), यावल व जळगाव येथील बाजार समिती, उपबाजारांमध्ये होते. या बाजारपेठा सुमारे २० ते २६ किलोमीटर व त्या परिघात आहेत. अडावद येथे सर्वाधिक विक्री होते. तेथे दररोज लिलाव होतात. येथे वाहतुकीसाठी नरेंद्र आपल्या मिनी ट्रॅक्‍टरचा उपयोग करतात. कारल्यास कायम मागणी असते. किलोला ३० ते ३५ रुपये दर मिळतात. एके वेलीस कमाल दर ६८ रुपये मिळाला होता.  शेतीतील अभ्यासात कायम उत्सुक  शेती, निविष्ठा यासंबंधीच्या सुमारे ४० व्हॉट्सॲप ग्रुपवर नरेंद्र सक्रिय आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, पाल (ता. रावेर), जळगाव येथील कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, चोपडा यांचे मार्गदर्शन त्यांना मिळते. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांनी त्यांच्या कारली प्लॉटला भेट देऊन त्यांचे कौतुक केले; तसेच पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शनही केले. कलिंगड, खरबूज पिकात ५० गुंठ्यात पॉली मल्चिंगचा प्रयोग सुमारे सहा वर्षांपूर्वी नरेंद्र यांनी सुरू केला. गावातील तो पहिलाच असावा. त्यानंतर अन्य शेतकरी त्यांचे अनुकरण करू लागले.  शेतीतील तंत्रज्ञानाचा प्रसार अन्य शेतकऱ्यांत करण्यात नरेंद्र नेहमीच आघाडीवर असतात. ॲग्रोवनचे ते पहिल्या दिवसापासूनचे वाचक आहेत.  संपर्क- नरेंद्र पाटील- ९६७३३५८७६९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com