गायी, म्हशींतील प्रजनन व्यवस्थापन

गर्भधारणा यशस्वीपणे होण्यासाठी जनावराच्या माजाची लक्षणे ओळखणे महत्त्वाचे असते.
गर्भधारणा यशस्वीपणे होण्यासाठी जनावराच्या माजाची लक्षणे ओळखणे महत्त्वाचे असते.

गायी, म्हशी नियमित माजावर येण्यासाठी योग्य समतोल आहार, कालवडींची योग्य वाढ, उत्कृष्ट संगोपन आणि व्यवस्थापन, पशुपालकांची जागरुकता, चिकित्सक निरीक्षण, माजाचे तांत्रिक पद्धतीने व्यवस्थापन तसेच योग्य वेळी कृत्रिम रेतन केल्यास गर्भधारणेचे प्रमाण वाढेल. यामुळे दोन वेतातील अंतर आणि भाकड काळ कमी होऊन आर्थिक नुकसान टाळता येईल.   गाय, म्हैस नियमित माजावर येणे, गाभण राहाणे तसेच वेळेवर वीणे ही यशस्वी दुग्धव्यवसायाची गुरुकिल्ली आहे. पशुव्यवस्थापनामध्ये जनावरांचा माज अचूक ओळखणे ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. गायी, म्हशी माजावर केव्हा येतात?

  • सर्वसाधारणपणे भारतीय देशी गायी वयात येण्यासाठी त्यांचे वय २४ ते ३६ महिने, तर शारीरिक वजन २५० ते २७५ किलो, संकरित गायींचे वय १२ ते १८ महिने तर वजन २५० किलो तसेच म्हशींचे वय ३६ ते ४२ महिने तर वजन ३०० ते ३५० किलो असणे आवश्‍यक आहे. अशाप्रकारे वय तसेच शारीरिक वजन प्राप्त केल्यावर अशी जनावरे नियमित माजावर येतात.
  • गाय, म्हैस वयात आल्यानंतर ऋतूकाळ चक्राची सुरवात होते. वयात आलेली कालवड अथवा रेडी दर २१ दिवसांनी माजावर येते. यास ऋतूचक्र असे म्हणतात. गायी, म्हशी व्याल्यानंतर ४५ ते ६० दिवसांत माजावर येतात.
  • माजाची प्रमुख लक्षणे

  • माजावर आलेली गाय अस्वस्थ व बैचेन होते, वारंवार हंबरते, कान टवकारते, गोठ्यात फिरण्याचे प्रमाण वाढते.
  • खाणे - पिणे, रवंथ करणे यावर लक्ष नसते. त्यांची भूक मंदावते.
  • गायी म्हशींच्या दूध उत्पादनात घट होते. अवेळी पाणवते.
  • स्पष्ट माजावर आलेली गाई - म्हैस कळपातील वळूकडे आकर्षित होते, त्याच्याजवळ जाऊन लगट करण्याचा प्रयत्न करते.
  • - माजावर आलेली जनावरे दुसऱ्या जनावरांवर उड्या मारतात तसेच दुसरी जनावरे पाठीमागून उड्या मारत असतील तर माजावर आलेली गाय-म्हैस स्थिर उभी राहाते.
  • माजावर आलेल्या गाई-म्हशींचा योनीमार्ग लालसर, ओलसर सुजल्यासारखा दिसतो.
  • योनीमार्गातून पारदर्शक, काचेसारखा, स्वच्छ, चिकट स्राव (सोट) बाहेर लोंबकळू लागतो. हा स्राव गायींच्या मागील बाजूस तसेच शेपटीस चिकटून लोंबत असतो.
  • ग्रामीण भाषेत याला गाय बळसली अथवा सोट टाकला असे म्हणतात.
  • माजावर आलेली गाय - म्हैस शेपटी उंचावून एका बाजूला करते.
  • काही संकरित गायींमध्ये तिसऱ्या - चौथ्या दिवशी योनीमार्गातून थोडा रक्तस्राव दिसून येतो.
  • म्हशींमधील माजाची लक्षणे

  • माजाची लक्षणे स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे म्हशींच्या माजाला मुका माज असे म्हणतात. काही म्हशी विशिष्ट प्रकारच्या आवाजात हंबरतात.
  • म्हैस माजावर आल्यावर वारंवार थोडी - थोडी लघवी करते.
  • म्हशींमध्ये सायंकाळनंतर माजावर येण्याचे प्रमाण जास्त असते.
  • मुख्यत्वे म्हशी विशिष्ट हवामानात म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत माजावर येतात.
  • माज कसा ओळखावा

  • साधारणपणे गायी - म्हशींच्या माजाच्या लक्षणावरून माज ओळखण्याची प्रचलित पद्धत आहे. त्यासाठी जनावरातील माजासंबंधीचे तांत्रिक ज्ञान देणे, तसेच गायी - म्हशींमधील माज ओळखण्याच्या विविध पद्धतींची माहिती असणे आवश्‍यक आहे.
  • प्रजननाविषयी सर्व नोंदी वेळच्या वेळी केल्यास, पुढील माजाची तारीख तसेच विण्याची तारीख बिनचूक काढता येते.
  • गायी, म्हशींच्या कळपामध्ये नियमित माज ओळखण्यासाठी नसबंदी केलेला वळू सोडून माजावर आलेली जनावरे ओळखता येतात.
  • गोठ्यातील फिरत्या दूरचित्रवाणी संचाद्वारे (सीसीटीव्ही) माजावर आलेल्या जनावरांची लक्षणे, हालचाली चित्रित करून माजावर आलेली जनावरे अचूक ओळखता येतात.
  • काही देशांमध्ये जनावरांचा माज ओळखण्यासाठी प्रशिक्षित केलेल्या श्‍वानाद्वारे माजावर आलेली जनावरे ओळखता येतात.
  • तज्ज्ञ पशुवैद्यकांच्या सहाय्याने अत्याधुनिक अल्ट्रा सोनोग्राफी मशीनचा वापर करून माजावर आलेली जनावरे ओळखता येतात.
  • कळपातील अनेक जनावरांना एकाचवेळी संप्रेरकाच्या इंजेक्‍शनाद्वारे माजाचे सनियंत्रण करून माजावर आलेल्या सर्व जनावरांना एकाच वेळी कृत्रिम रेतन करता येते.
  • माजावर आलेल्या गायी - म्हशींमधील कृत्रिम रेतन

  • साधारणतः गायीचा माजाचा कालावधी हा १८ ते २४ तास तर म्हशीचा २४ ते ३६ तासांचा असतो.
  • गायी - म्हशींमध्ये माजाचा मध्य अथवा उत्तरार्ध म्हणजे स्पष्ट पक्‍क्‍या माजाच्या कालावधीत कृत्रिम रेतन करून घेतल्यास गर्भधारणेची शक्‍यता अधिक असते.
  • म्हणजेच ढोबळमानाने सकाळी माजावर आलेल्या गायी - म्हशींना त्याच दिवशी सायंकाळी तर सायंकाळी माजावर आलेल्या गायी - म्हशींना दुसऱ्या दिवशी कृत्रिम रेतन करावे.
  • कृत्रिम रेतन केल्याची तारीख काळजीपूर्वक नोंदवून ठेवावी.
  • गाय - म्हैस २१ दिवसांनंतर पुन्हा माज दाखवते का ते पहावे. माज व दाखविल्यास तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून गर्भतपासणी करून घ्यावी. - तीन वेळा कृत्रिम रेतन करून गाय - म्हैस गाभण न राहिल्यास तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून तपासणी करून आवश्‍यक औषधोपचार करावा.
  • गायी, म्हशी माजावर न येण्याची कारणे

  • जन्मलेल्या वासरांची वाढ खुंटलेली असणे कालवडी अशक्त असणे.
  • जनावरांचा आहार असंतुलित किंवा निकृष्ट असणे.
  • वातावरणातील तसेच तापमानातील बदलामुळे म्हशी माजावर येत नाहीत.
  • जनावरांचे उतारवय, जीर्ण स्वरुपाचे दीर्घकालीन आजार.
  • पोटातील कृमींचा तसेच गोचिड प्रादुर्भाव.
  • नुकत्याच व्यायलेली तसेच जास्त दूध देणाऱ्या गायी - म्हशी.
  • गर्भाशयाचे आजार तसेच बिजांडावरील विकृती.
  • शरीरातील अंतःस्त्रावाचा असमतोल.
  • माजाविषयीचे अज्ञान इत्यादी कारणांमुळे गायी - म्हशी माजावर येत नाही किंवा त्यांचा माज ओळखता येत नाही.
  • माजाचे व्यवस्थापन

  • गाभण जनावरांची काळजी - गाभण काळात आहार संतुलित असेल तर, व्यवस्थापन उत्कृष्ट असल्यास जन्मतेवेळी वासरांचे वजन जास्त असते, पुढे त्यांचा वाढीचा वेग चांगला राहातो यामुळे कालवडी - रेड्या लवकर वयात येतात.
  • कालवडी, तसेच गायी - म्हशींच्या आहारात हिरवा चारा, जीवनसत्त्व आणि क्षारयुक्त खुराक संतुलित असेल तर वेळेत माजावरती येतात.
  • वेळेवर लसीकरण, कृमीनाशक, गोचिडनाशक औषधोपचार, तात्कालीन आजारांची काळजी, ऋतुमानानुसार योग्य काळजी घेतल्यास जनावरे वेळेवर माजावर येतात.
  • व्यायलेल्या जनावरांचे योग्य व्यवस्थापन, गर्भाशयाचे आजार, बिजांड कोशाचे आजार यावर योग्य उपाय केल्यास जनावरे चांगला माज दाखवितात.
  • प्रत्येक जनावरांना ओळख क्रमांक असणे आवश्‍यक आहे. गोठा पुरेसा मोठा, स्वच्छ, भरपूर सूर्यप्रकाश व खेळती हवा तसेच मुक्त निवारा पद्धतीचा गोठा असल्यास जनावरे माजाची लक्षणे स्पष्ट दाखवितात.
  • जनावरांच्या हालचालीवर माज ओळखण्यासाठी दिवसातून कमीत कमी चार वेळा म्हणजे पहाटे ५, सकाळी ८, संध्याकाळी ६ आणि रात्री ९ वाजता अर्धा-अर्धा तास लक्ष ठेवणे आवश्‍यक आहे.
  • गायी - म्हशींच्या प्रजननाविषयी सर्व नोंदी वहीत करून ठेवणे आवश्‍यक आहे.
  • संपर्क ः डॉ. राजू शेलार, ९४२२६०८२६१ (मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com