agriculture story in marathi, brinjal farming in drought condition, bhortek, bhadgaon, jalgaon | Agrowon

अत्यल्प पाण्यात वांग्यांचे गुणवत्तापूर्ण उत्पादन 
चंद्रकांत जाधव 
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

कमी पाण्यावर घेतले पीक 
वांग्यांच्या पिकाला अधिक पाणी लागते हा काहींचा असलेला समज संजय महाजन यांनी यशस्वी नियोजन करून दूर केला. ऑक्‍टोबरपासून दोन दिवसांला फक्त एक तास पाणी देण्यात आले. जमिनीत सेंद्रिय कर्ब चांगला असल्याने वाफसा चांगला आहे. कारण संजय हे मशागत फारशी करायची नाही या सूत्रावरच काम करतात. त्यांच्याकडे पाच देशी गायी व बैलजोडी आहे. मजुरांकरवी ते कामे करून घेतात

जळगाव जिल्ह्यातील भोरटेक (ता. भडगाव) येथील शेतकरी संजय बळिराम महाजन हे अवर्षणप्रवण स्थितीला मागील तीन-चार वर्षांपासून तोंड देत आहेत. दिवसात फक्त तासभर चालणाऱ्या विहिरीच्या पाण्यावर त्यांनी भरीताच्या व काटेरी वांग्यांचे दर्जेदार उत्पादन घेतले आहे. पीक अवशेषचा वापर व सेंद्रिय पद्धतीचा वापर या बाबींवर भर देत त्यांनी आपल्या वांग्यांची वेगळी ओळख तयार केली आहे. 

जळगाव जिल्ह्यात भोरटेक (ता. भडगाव) परिसरात दुष्काळी स्थिती आहे. मागील दोन वर्षे हवा तसा पाऊसच झाला नाही. शेती संकटात आली. विहिरी, कूपनलिकांची पाणीपातळी एवढी खाली आली की तासभरही विहिरींमधून पाण्याचा उपसा होत नाही. पाच अश्‍वशक्तीचा पंपही चालत नाही. कोरडवाहू शेती तर या भागात धोक्यातच आल्यासारखी झाली. गावातील संजय महाजन यांच्याकडे साधारण अशीच स्थिती झाली. त्यांची सुमारे १७ एकर शेती आहे. दोन विहिरी. मात्र एकाच विहिरीला पाणी आहे. तीदेखील जेमतेम तासभर चालते. संजय हे कोल्हापूर येथील प्रयोगशील शेतकरी व जमीन सुपीकतेसंबंधी ॲग्रोवनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवा विचार देणारे प्रताप चिपळूणकर यांच्या संपर्कात असणारे शेतकरी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात संजय यांनी तणांचे नियंत्रण व्यवस्थापन व विना मशागतीची शेतीची कास धरली आहे. 

विना मशागत शेतीची कास 
कमी खर्च व गुणवत्तापूर्ण उत्पादन हे सूत्र बांधून संजय विविध पिके घेत आहेत. देशी कापसाची शेती त्यांनी विना मशागत व रसायनांचा वापर शक्यतो न करता यशस्वी केली आहे. सध्या चार एकर सुबाभूळ, चार एकर देशी कापूस (कापसात मोसंबीचे आंतरपीक, एक एकर हळद, एक एकर कांदा, दीड एकर मका, पाऊण एकर वांगी अशी पिके आहेत. सुबाभूळला सिंचनाची फारशी गरज नाही. कापसाचे पीक त्यांनी पावसाच्या पाण्यावर घेतले. त्याला दोन वेळेस पट पद्धतीने पाणी दिले. पीक जोमात आहे. उर्वरित सर्व पिकांमध्ये ठिबक आहे. भाजीपाला शेतीचा चांगला अनुभव आहे. मात्र कमी पाण्याची समस्या लक्षात घेऊन त्याचे नियोजन केले. 

वांग्याचा प्रयोग 
संजय गेल्या नऊ वर्षांपासून पिकांच्या अवशेषांचा वापर करतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढली आहेच. शिवाय जलधारण शक्तीही वाढली आहे. त्याचाच फायदा कमी पाण्याच्या काळात त्यांना होतो आहे. यंदा वांगे शेतीतील नियोजनात पऱ्हाटी न उपटता त्यावर रोटाव्हेटर फिरविला. पिकांचे अवशेष नेहमीप्रमाणे ठेवले. पाऊण एकरात भरताच्या वांग्यांची २७ जून रोजी साडेचार बाय चार फूट अंतरात तर काटेरी वांग्यांची चार बाय दोन फूटवर लागवड केली. भरताच्या वांग्याची रोपे हिंगोणे (ता. एरंडोल, जि. जळगाव) येथील शेतकऱ्याकडून आणली. एक रुपये प्रतिरोप असा खर्च आला. तर काटेरी संकरित वांग्यांची रोपेही एक रुपये प्रतिरोप या दरात पाचोरा येथील नर्सरीतून घेतली. ठिबकचे नियोजन केले. कारण पावसाच्या लहरीपणाचा फटका बसला असता तर ठिबकचा आधार गरजेचा होता. पावसाच्या पाण्यावर पीक सुरवातीला वाढले. जुलै, ऑगस्टमध्ये पावसाने ताण दिल्याने पीक तरले. त्या वेळेसही विहिरीतून तासभर पाणी मिळायचे. खरे तर वांगी अधिक फवारणी व रसायनांच्या वापराशिवाय जोमात येतच नाहीत असे सांगितले जाते. पण शक्यतो अत्यंत कमी किंवा गरजे एवढाच रासायनिक कीडनाशकांचा वापर केला. तणनाशकांचा वापरही टाळला. व्हेंच्युरीमधून दशपर्णी अर्क आठ ते १० दिवसांआड दिला. त्याचबरोबर दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, ताक, हिंग यांच्याही फवारण्याही नियमित घेतल्या. शेतात झाडाखाली सुमारे ४५ दिवस दशपर्णी अर्क आंबवण्याची क्रिया केली. 

उत्पादनास सुरवात 
भरताच्या वांग्यांची एक हजार तर काटेरी वांग्यांची सुमारे ३०० झाडे आहेत. ऑगस्टमध्ये उत्पादन सुरू झाले. सुरवातीला दर चार ते पाच दिवसांत तीन ते साडेतीन क्विंटल तर त्यानंतर सात ते आठ क्विंटलचा प्रतितोडा व्हायचा. आत्तापर्यंत सुमारे २० तरी तोडे झाले आहेत. सुरवातीला विक्री जळगाव, चाळीसगाव येथील बाजारात केली. मागील काही दिवसांपासून मुंबई (वाशी) येथील बाजारात वांगी पाठविण्यात येत आहेत. कजगाव (ता. भडगाव) येथील मालवाहू वाहनचालक ही वांगी घेऊन जातात. ऑक्‍टोबर ते अलीकडील काळापर्यंत सरासरी १५ ते २० रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. वांगी निरोगी, चमकदार, मऊ व चवदार असल्याने आगाऊ मागणी असते. सुमारे दीड लाख रुपयांचे एकूण उत्पन्न नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत मिळाले. हंगाम आणखी किमान दीड ते दोन महिने सुरू राहील. आता पुन्हा १५ गुंठ्यांवर लहान काटेरी वांग्यांची लागवड केली आहे. 

कमी पाण्यावर घेतले पीक 
वांग्यांच्या पिकाला अधिक पाणी लागते हा काहींचा असलेला समज संजय यांनी यशस्वी नियोजन करून दूर केला. ऑक्‍टोबरपासून दोन दिवसांला फक्त एक तास पाणी देण्यात आले. जमिनीत सेंद्रिय कर्ब चांगला असल्याने वाफसा चांगला आहे. कारण संजय हे मशागत फारशी करायची नाही या सूत्रावरच काम करतात. त्यांच्याकडे पाच देशी गायी व बैलजोडी आहे. मजुरांकरवी ते कामे करून घेतात. त्यांचा थोरला मुलगा रितेश उच्चशिक्षित असून कृषी व्यवसाय व्यवस्थापन संबंधीच्या कंपनीत नोकरी करतो. लहान व्यंकटेश माध्यमिक शिक्षण घेत आहे. पत्नी सौ. मनीषा यांची संजय यांना शेतीच्या व्यवस्थापनात मदत मिळते. 

संपर्क- संजय महाजन - ९५१८७६४२९३, ९८५०६९११३३  

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
गिलक्‍याने दिले अर्थकारणाला बळबाजारपेठेची गरज ओळखून कठोरा (ता. जि. जळगाव) येथील...
सेवानिवृत्तीनंतर शिक्षकाची शेतीत सेवा...आयुष्यभर नोकरी करताना अनेक गोष्टींचा त्याग करावा...
विदर्भात उत्कृष्ट व्यवस्थापन असलेली २३...वर्धा जिल्ह्यात केळी पिकाला पुन्हा गतवैभव प्राप्त...
वर्षभरात पाच हंगामात दर्जेदार कोथिंबीरपाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...
पशुपालन, प्रक्रिया उद्योगात नेदरलॅंडची...शास्त्रीय पद्धतीने पशुपालन, दुग्धोत्पादन आणि...
आदिवासी पाड्यावर रुजली कृषी उद्योजकताकोणे (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथील आदिवासी...
दोनशे देशी गायींच्या संगोपनासह ...सुमारे दोनशे देशी गायींचे संगोपन-संवर्धन यासह...
अर्थकारण उंचावणारी उन्हाळी मुगाची शेती वाशिम जिल्ह्यातील पांगरी नवघरे येथील दिलीप नवघरे...
शंभर एकरांत सुधारित तंत्राने शेवग्याची...नाशिक जिल्ह्यातील पवारवाडी (ता. मालेगाव) येथील...
निर्धारातून टाकोबाईची वाडीच्या...सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा काही भाग...
निसर्गरम्य पन्हाळा तालुक्यात ...कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगराळ, निसर्गरम्य पन्हाळा...
दुष्काळात स्वयंपूर्ण शेतीचा आदर्श,...नव्वद क्विंटल तूर, ३० क्विंटल ज्वारी व हरभरा, १५०...
उच्चशिक्षित कृषी पदवीधराने उभारला...गोपालपुरा (जि. आणंद, गुजरात) येथील एमएस्सी...
अभ्यासातून शेतीमध्ये करतोय बदलवेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील महाविद्यालयात...
आळिंबी, गव्हांकुर उत्पादनातून बचत गटाची...गोद्रे (ता. जुन्नर, जि. पुणे) गावातील महिलांनी...
कुटुंबाची एकी, सुधारित तंत्र, शिंदे...नांदेड जिल्ह्यातील वसंतवाडी येथील शिंदे परिवाराला...
दुष्काळात बाजरी ठरतेय गुणी, आश्‍वासक... कमी पाणी, कमी कालावधी, अल्प खर्चातील बाजरी...
AGROWON AWARDS : नैसर्गिक, एकात्मिक...ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार...
रडायचं नाही, आता लढायचं : वैशाली येडे पुणे : सावकाराचे कर्ज डोक्यावर ठेवून पतीने...