उन्हाळ्यात म्हशींची घ्या काळजी

वाढत्या तापमानात म्हशी सावलीत राहतील याकडे लक्ष द्यावे.
वाढत्या तापमानात म्हशी सावलीत राहतील याकडे लक्ष द्यावे.

उन्हाळ्यातील वाढलेल्या तापमानाचा परिणाम म्हशीमध्ये लक्षणीय पद्धतीने जाणवतो. वर्षभर दूध उत्पादनासाठी उन्हाळ्यात म्हशींचे योग्य प्रकारे संगोपन केल्यास दुग्ध उत्पादन व प्रजनन योग्य राहून उन्हाळ्यातही अधिक फायदा मिळतो.

म्हशींचे वर्षभर सातत्यपूर्ण दूध उत्पादन व प्रजनन असणे हे किफायतशीर व्यवसायाकरिता महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात उन्हाळ्यात तापमानाचा पारा हा ४० अंश सेल्सिअसच्या वर जातो. तर विदर्भातील काही जिल्ह्यांत हे तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचते. बहुतांश पशुपालकांकडे म्हशींसाठी गोठ्याची व्यवस्था नसते. त्यामुळे म्हशींना झाडाखाली किंवा कमी सावलीत तर कधी कधी उघड्या जागेत ठेवले जाते. त्यामुळे म्हशीच्या आहारावर, आरोग्यावर तसेच प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम जाणवतो. उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे म्हशीवर होणारे परिणाम व याकरिता पशुपालकांनी ठराविक उपाययोजनांचा उपयोग करावा व या उपाय योजनांची माहिती खाली दिली आहे.

जास्त तापमानाचा म्हशीवर होणारा परिणाम

  •  म्हशीच्या कातडीमध्ये घामग्रंथीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे शरीरातील घामग्रंथीद्वारे तापमान नियंत्रण ही क्रिया दिसून येत नाही. यामुळे म्हशी ह्या वाढलेल्या तापमानाला लगेच बळी पडतात. यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान वाढते.
  • म्हशींचा रंग हा गडद काळा असतो. त्यामुळे सूर्यकिरणे ही काळ्या रंगात लवकर व जास्त प्रमाणात शोषली जातात. यामुळे म्हशीच्या शरीराचे तापमान जास्त वाढते.
  • शरीरातील वाढलेल्या तापमानामुळे म्हशीची भूक मंदावते. साधारणपणे म्हशीची खाद्य खाण्याची क्षमता २५ ते ३० टक्के इतकी कमी होते. यामुळे खाद्यघटकाच्या कमतरतेमुळे दुधाचे उत्पादन ५ ते ७ टक्के इतके कमी होते. कमी खाद्यामुळे म्हशीच्या पोटातील सामू (ph) बदलतो व आम्लता वाढते.
  • शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यासाठी, शरीरातील खनिजे तसेच सोडिअम, पोटॅशियम, इत्यादी चे जास्त उत्सर्जन होते. यामुळे त्यांची कमतरता जाणवते.
  • वाढलेल्या तापमानामुळे शरीरातील पाण्याची पातळी फारच कमी होते. यामुळे म्हशींना अशक्तपणा, जाणवतो व भूक मंदावते. यामुळे दूध उत्पादन कमी होते.
  • म्हशींना जर उन्हात बांधलेले असेल तर प्रखर सूर्यकिरणांमुळे शरीरातील संप्रेरकाचे संतुलन बिघडल्यामुळे काही म्हशींचा कालावधी पूर्व किंवा गर्भपात होतो यामुळे आर्थिक नुकसान होते.
  • म्हशी मुळातच शांत किंवा मुका माज दाखवितात. माजाची लक्षणे म्हशीमध्ये तीव्र नसतात. उन्हाळ्यात आणखीन परिणाम होऊन म्हशी उन्हाळ्यात माजावर येत नाहीत. माजावर आलेल्या म्हशीच्या माजाचा कालावधी कमी राहतो (६ ते ८ तास). बहुतांश म्हशी रात्रीचा माज दाखवतात व शांत माजामुळे माजाचे निदान होत नाही.
  • उन्हाळ्यात म्हशींमध्ये माज निदानानंतर गर्भधारणेचे प्रमाण कमी असते. गर्भ तयार झाल्यावरही अति उष्ण तापमानामुळे गर्भ टिकून राहू शकत नाही.
  • उपाययोजना अ. खाद्याचे नियोजन

  •  उन्हाळ्यात म्हशींची भूक कमी होते. त्यामुळे त्यांना खाद्य घटकाची कमतरता जाणवते. याची भरपाई करण्यासाठी म्हशीच्या खाद्यामध्ये जास्त ऊर्जा देणारे घटक उदा. तेल, फॅट इत्यादीचा वापर करावा. लवकर ऊर्जा मिळण्यासाठी ऊसाची मळी किंवा गूळ इत्यादीचा वापर करावा. यामुळे ऊर्जा तयार होऊन दूध उत्पादन टिकून राहील.
  • म्हशींना सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत खाद्य देऊ नये. म्हशींना जेव्हा बाहेरील तापमान कमी असेल त्यावेळेस कुट्टी केलेला कडबा किंवा मका, बाजरीची कुट्टी द्यावी. शक्‍यतो संध्याकाळी ६ ते सकाळी १० वाजेपर्यंत चारा व खाद्य द्यावे.
  • शरीरावाटे बाहेर पडणारी खनिजे, सोडिअम व पोटॅशियम यांची पातळी टिकवण्याकरिता खाद्यामध्ये खनिज मिश्रण द्यावे व सोबत दररोज ५० ग्रॅम मोठे/जाडे मीठ द्यावे.
  • म्हशींना कमीत कमी ४ ते ५ वेळा थंड पाणी पाजावे. शक्‍यतो २४ तास पाण्याचा पुरवठा असल्यास उन्हाचा परिणाम कमी जाणवतो अाणि दूध उत्पादन टिकून राहण्यास मदत होते.
  • खाद्यात दररोज ५० ग्रॅम खाण्याचा सोडा दिल्यास पोटातील (ph) सामू हा टिकून राहून खाद्याचे पचन उत्तम होते. याचा थेट दूध उत्पादनावर चांगला परिणाम दिसून येतो.
  • ब. गोठ्यात सावलीचे नियोजन

  • म्हशींना गोठ्यात बांधत असल्यास व गोठ्याचे शेड पत्र्यांचे असल्यास पत्र्यावर कडबा, गव्हाचे किंवा भाताचे तणीस यांचा रुंद थर द्यावा. यामुळे सूर्यकिरण पत्र्यावर पडत नाहीत व गोठ्यातील तापमान थंड राहण्यास मदत होते.
  •  गोठ्याच्या मध्य भागांची उंची जास्त असावी. (१२ ते १४ फूट) यामुळे हवा खेळती राहते व गोठ्याचे तापमान कमी होण्यास मदत होते.
  • गोठ्याच्या बाजूने पोते बांधावे व त्यावर पाणी शिंपडावे. यामुळे थंडगार हवा गोठ्यात येईल व त्याचा कुलर सारखा उपयोग होईल.
  • शक्‍य असल्यास गोठ्यात फॅन किंवा फॉगर बसवावे. त्यामुळे तापमान नियंत्रित होईल.
  • गोठ्याच्या बाजूने शेवरी, लिंब किंवा दाट सावली देणारे वृक्ष लावावेत. यामुळे गोठ्यातील तापमान कमी व थंड राहते. तसेच झाडाच्या सावलीमुळे थंडावा राहतो.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे म्हशीच्या अंगावर दिवसातून दोनदा पाणी टाकून धुवावे. किंवा पाण्यात डुबण्यास सोडावे.
  • क. प्रजननाचे नियोजन

  • उन्हाळ्यात म्हशीच्या माजाचे निदान चांगल्या पद्धतीने करावे. रात्री व सकाळी (लवकर) म्हशींना चांगले निरखून पाहिल्यास माजाचे निदान योग्य होईल.
  • कृत्रिम रेतन करताना शक्‍यतो सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी करावे.
  • काही म्हशी माजावर येत नसतील तर पशुवैद्यकाच्या मदतीने त्यांच्या माजाचे एकत्रीकरण करावे व ठरलेल्या वेळेस कृत्रिम रेतन करावे. यामुळे माजाचे निदान करावे लागत नाही व गर्भधारणेचे प्रमाण वाढते.
  • संपर्क ः डॉ. एम. व्ही. इंगवले, ९४०५३७२१४२ स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com