सुधारित शाबूकंदामुळे कमी होतील लोह, जस्त कमतरतेच्या समस्या

शाबूकंद
शाबूकंद

जनुकीय सुधारणेच्या माध्यमातून शाबूकंदामध्ये लोहाचे प्रमाण ६ ते १२ पटीने, तर जस्ताचे प्रमाण ३ ते १० पटीने वाढवण्यात संशोधकांना यश आले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील १२ पेक्षा अधिक संशोधकांच्या सुमारे दहा वर्षांपासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण संशोधनाला यश आले आहे. या संशोधनाचा फायदा पश्चिम आफ्रिकेतील शाबूकंदाच्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणात वापर असलेल्या भागामध्ये कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी होणार आहे. हे संशोधन ‘जर्नल नेचर बायोटेक्नॉलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. कुपोषणाची समस्या ही जागतिक पातळीवर मानवी आरोग्यासाठी मोठा धोका मानली जाते. त्यात सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरतेमुळे आफ्रिका खंडातील लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येत आहेत. नायजेरियातील ७५ टक्के लहान मुले ( शिशुगट) आणि ६७ टक्के गर्भवती महिलांमध्ये लोहाच्या कमतरतेमुळे रक्तक्षय (अॅनिमिया) दिसून येत आहे. पाच वर्षांखालील २० टक्के मुलांमध्ये जस्ताची कमतरता आढळते. लोहाच्या कमतरतेमुळे माणसांच्या प्रतिकारशक्तींवर विपरीत परिणाम होतो. मुलांची वाढ व मानसिक वाढही खुंटते. जस्ताच्या कमतरतेमुळे हगवणीचा त्रास होऊन मृत्यूही होऊ शकतो. अशा विविध सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी पुरक अशा खाद्य पिकांच्या नव्या जातींचा विकास करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यातही सामान्यतः लागवडीखाली व खाण्यामध्ये असलेल्या शाबूकंदासारख्या पिकांमध्ये जैवअभियांत्रिकीद्वारे लोह वाहकाचे आणि फेरीटीन या घटक अधिक कार्यक्षम करण्याचे काम डोनाल्ड डॅनफोर्थ शास्त्र केंद्रातील शास्त्रज्ञ नारायणन, निगेल टेलर, डोरोथी जे. किंग आणि आंतरराष्ट्रीय १२ पेक्षा अधिक संशोधकांच्या गटाने केले आहे. गेल्या दहा वर्षांच्या सातत्यपूर्ण संशोधनानंतर त्यात यश मिळाले आहे. यामुळे शेतामध्ये वाढवलेल्या शाबूकंदाच्या पिकामध्ये लोह आणि जस्ताचे प्रमाण वाढते. हे वाढलेले प्रमाण त्यांच्या मुळामध्ये साठवले जाते. प्रक्रियेनंतर त्यापासून विविध पदार्थांची निर्मिती करता येते. कारण शाबूकंदाचे विविध पदार्थ पश्चिम आफ्रिकेतील लोकांच्या खाण्यामध्ये सातत्याने असतात. या विषयी निगेल टेलर यांनी सांगितले, की शाबूकंदाच्या उत्पादनावर कोणताही परिणाम न होता त्यातील लोह आणि जस्त या पोषक घटकांचे प्रमाण वाढवण्यात यश आले आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांसह ग्राहकांनाही होणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ही वाढलेले पोषक घटक शिजवतानाही कमी होत नाही. त्याचप्रमाणे त्यांची पचनीयता चांगली असल्याने सेवन करणाऱ्या व्यक्तीलाही फायदेशीर ठरू शकतात. आतापर्यंत गवतवर्गीय तृणधान्य पिकांत पोषक घटकांचे प्रमाण वाढवण्यात आले होते. पहिल्यांदा गवतवर्गीय नसलेल्या शाबूकंदामध्येही हे प्रयोग यशस्वी झाले आहेत. कारण या सर्व पिकांची जमिनीतून मूलद्रव्ये उचलण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. असे आहे संशोधन ः

  • अर्बिडॉप्सिस या प्रारूप वनस्पतीमध्ये IRT१ आणि FER१ या जनुकांचे एकत्रीकरण करण्यात यश आले. त्यातून शाबूकंदामध्ये जनुकांचे एकत्रीकरण करण्यात आले. या नव्या जातीमध्ये लोहाचे प्रमाण पारंपरिक शाबूकंदाच्या तुलनेमध्ये ६ ते १२ पटीने वाढले, तर जस्ताचे प्रमाण ३ ते १० पटीने वाढले.
  • डॉ. नारायणन म्हणाले, की दोन्ही सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण एकाच वेळी वाढवण्याचे आव्हान आमच्यासमोर होते. त्याच वेळी पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊनही चालणार नव्हता.
  • पश्चिम आफ्रिकेमध्ये शाबूकंदापासून घारी आणि फूफू या नावाने दोन पदार्थ बनवले जातात. त्यात शाबूकंद कापून काही काळ भिजवले जातात. त्यानंतर क्विण्वन प्रक्रिया सुरू झाल्याने त्यावर दाब देऊन चांगले भाजले जातात. या प्रक्रियेमध्ये नव्याने विकसित केलेल्या जातीतील पोषक घटक स्थिर राहत असल्याचे प्रयोगात आढळले. मानवाच्या आतड्यामध्ये या पोषक घटकांचे चांगल्या प्रकारे शोषण होत असल्याचे दिसून आले आहे.
  • या सुधारत शाबूकंदातून सरासरी लोहाचे प्रमाण ( EAR) ४० ते ५० टक्के, तर जस्ताचे प्रमाणे ६० ते ७० टक्के मिळू शकेल. त्याचा फायदा लहान मुले आणि महिलांना होणार आहे.
  • चाचण्यानंतर शेतकऱ्यांपर्यंत ः व्हीआयआरसीए प्लस या प्रकल्पामध्ये नायजेरियामध्ये प्रसिद्ध असलेला शाबूकंदाच्या जातींमध्ये लोह आणि जस्ताचे प्रमाण वाढवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनामध्ये कोणताही घाटा होणार नाही. मात्र, त्याचा प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर चाचण्या आणि विश्लेषण २०१९ मध्ये करण्याचे नियोजन आहे. या सर्व चाचण्यातून पार पडल्यानंतर शाबूकंदाच्या या सुधारित जाती लोकांपर्यंत पोचतील, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला.    

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com