पशुपालन सल्ला

हिवाळ्यात नवजात करडांना उबदार ठिकाणी ठेवावे.
हिवाळ्यात नवजात करडांना उबदार ठिकाणी ठेवावे.

कमी तापमान अाणि थंडीमुळे शेळ्या अाणि लहान करडांना न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. बदलत्या हवामानानुसार व्यवस्थापनामध्ये योग्य ते बदल करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. फुफ्फुसास सूज येण्याला फुफ्फुसदाह किंवा न्यूमोनिया म्हणतात. यामध्ये जंतूसंसर्ग होऊन फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होते किंवा फुफ्फुस पूर्णपणे निकामी होऊन श्‍वसनाच्या त्रासाने करडे, शेळ्या मृत्युमुखी पडतात.

न्यूमोनियाची लक्षणे :

  • ताप येणे यामध्ये शरीरतापमान साधारणतः १०४ अंश ते १०६ अंश फॅरनहाइटपर्यंत आढळते.
  • ढासणे (खोकलने), खोकताना छातीत दुखणे
  • श्‍वसनास त्रास होणे, तोंड पसरून श्‍वास घेणे
  • नाकातून स्राव येणे
  • भूक मंदावणे
  • मलूल बनून बसणे
  • छातीला स्टेथोस्कोप लावून ऐकल्यास खरखर, घरघर असा आवाज येतो.
  • उपाययोजना :

  • शेळ्यांचा गोठा नियमित स्वच्छ व कोरडा ठेवावा.
  • थंडीच्या काळात पिलांना उबदार ठिकाणी ठेवून पुरेसा चीक व दूध पिण्यास द्यावे.
  • बाटलीने दूध पाजवताना घाईघाईने न पाजवता हळूहळू घोट घेईल तसे दूध पाजवावे. ठसका न लागता दूध पाजवावे. प्रत्येक वेळी बाटली गरम पाण्याने स्वच्छ धुऊन ठेवावी.
  • गोठ्यामध्ये हवा खेळती राहण्यासाठी भिंती कमी उंचीच्या व वर जाळी बसवलेली असावी. आजारी शेळ्यांना निरोगी शेळ्यांपासून वेगळे ठेवावे.
  • शेळ्यांना नेहमी संतुलित आहार, पशुखाद्य द्यावे जेणेकरून त्यांची रोगप्रतिकारक्षमता उत्तम राहील. शेळ्यांना व पिलांना त्यांच्या शारीरिक अवस्थेनुसार आहार द्यावा.
  • शेळ्यांची, करडांची एकाचवेळी अतिदूर वाहतूक न करता टप्प्या-टप्प्याने थांबून चारा-पाणी करून वाहतूक करावी. वाहतुकीवेळी शेळी/ पिलांची अति गर्दी टाळावी. वाहतुकीवेळी पावसामध्ये शेळ्या भिजणार नाहीत तसेच थंडी असेल, तर उबदारपणा टिकविण्यासाठी उपाययोजना करावी. शक्‍यतो कोरड्या हवामानात शेळ्यांची वाहतूक करावी.
  • व्यवस्थापनामध्ये अचानक बदल करू नयेत.
  • शेडमध्ये वयानुसार, शारीरिक अवस्थेनुसार शेळ्या, पिले वेगळी ठेवण्याची व्यवस्था करावी. शेडमध्ये योग्य प्रमाणात जागा ठेवून गर्दी टाळावी.
  • शेळ्यांना करडांना एका ठिकाणी बांधून न ठेवता फिरते राहतील अशी सोय करावी.
  • हिवाळ्यात नवजात करडांना उबदार ठिकाणी ठेवावे, जाळीला रात्री पडदे लावून अति थंडीपासून शेळी/ करडांचे संरक्षण करावे. दिवसभर पडदे उघडे ठेवावेत.
  • शेडभोवतालची धूळ वाऱ्यासोबत शेडमध्ये येणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच शेडमध्येही धूळ जास्त प्रमाणात होणार नाही त्याची काळजी घ्यावी.
  • शेणतपासणी करून जंतनिर्मूलन करावे.
  • गाभण काळामध्ये शेवटच्या दीड महिन्यात शेळ्यांना संतुलित पशुखाद्य द्यावे. जेणेकरून करडे सशक्त जन्मतील व पुढे शेळीचे दूध उत्पादन उत्तम राहून करडांना पुरेसे दूध मिळेल. यामुळे शेळी अाणि करडांचीही रोगप्रतिकारशक्ती टिकवली जाईल.
  • संपर्क : डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ९४२३८७०८६३ (लेखक पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर येथे कार्यरत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com