आजार का होतात?

उत्तम अारोग्य
उत्तम अारोग्य

उत्तम आरोग्य हा प्रत्येक नागरिकाचा हक्क; परंतु त्याच वेळी ते आरोग्य यंत्रणेच्या समोरचे आव्हानही आहे. आज तांत्रिक आणि भौतिक प्रगतीमुळे काही आव्हाने कमी झाली असली, तरी काही वाढलीसुद्धा आहेत. आरोग्यसेवेच्या एका टोकाला अत्याधुनिक आरोग्यसेवा आहे, तर दुसऱ्या टोकाला काही ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्यसेवाही उपलब्ध नाही. ग्रामीण भागातील काही प्रश्न हे भौगोलिक परिस्थिती, अद्ययावत गोष्टींबाबत अनभिज्ञता, शिक्षण व वाहतुकीची असुविधा, स्वच्छतेचे अव्यवस्थापन, निष्काळजीपणा यातून उद्भवतात. यासंबंधी आपण काही उदाहरणे पाहूयात.

पूर्वीच्या काळी स्वयंपाकासाठी चुलीचा वापर होत असे. त्यामुळे घरात धूर साठून कितीतरी लोकांना श्वसनाचे आजार होऊ लागले. अगदी मागच्या महिन्यांपर्यंत घराजवळ साठलेल्या पाण्यात डास वाढून डेंग्यू, चिकुनगुनिया या आजारांचे प्रमाण वाढले. ग्रामीण भागात जनावरांशी दैनंदिन संबंधामुळे गोचिडतापाचे प्रकार, ब्रुसेलोसिस असे आजार दिसतात. उंदीर, घुशीमुळे संक्रमित होणारे लेप्टोस्पारोसिस, प्लेग यांसारख्या आजारांची शक्यता ग्रामीण भागातसुद्धा आहे.

बऱ्याचदा पिण्याचे पाणी दूषित होते. ते निर्जंतुक करण्याकरिता लागणाऱ्या सुविधांचा अभाव असतो. यामुळे जुलाब, उलट्या, गॅस्ट्रो, विषमज्वर, अमिबाचे संक्रमण, कावीळ, जंत असे आजार होतात. आपल्या देशातून पोलिओचे जवळपास उच्चाटन झाले आहे. तोसुद्धा पाण्यातून पसरणारा आजार होता. पाण्यातील क्षारांचे प्रमाण अधिक असल्यास मूतखड्याचा त्रास होतो. दुचाकीचा बेजबाबदार वापर, ट्रिपल सीट गाड्या चालवणे, बेकायदेशीर वाहतूक यामुळेही अपघातांचे प्रमाण वाढले आहे. साप-विंचू चावणे, कीटकनाशकांची विषबाधा हेदेखील एक प्रकारे अपघातच!

ग्रामीण भागात तंबाखू, गुटखा यांचे व्यसन मोठ्या प्रमाणात लहान मोठ्या व्यक्तींमध्ये आढळते. अतिमद्यपान, धूम्रपान तर सर्वत्र आहेच. खेड्यात तातडीने उपचारांची सोय नसल्याने व्यसनांमुळे होणारे आजार गंभीर रूप घेतात. अगदी स्तनाच्या कर्करोगासारखे आजार शहर व ग्रामीण भागांत सारख्या प्रमाणात जरी असले, तरी ग्रामीण भागात त्यांचे निदान उशिरा, आजार पसरल्यावर होते. मानसिक आजारांचेसुद्धा तसेच आहे. पूर्वी शहरी आजार समजले जाणारे मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईडचे आजार, हृदयविकार हे आजारसुद्धा ग्रामीण भागातही दिसत आहेत. कदाचित निदान होण्याची सोय झाल्यामुळे ते लक्षात येऊ लागलेत. गरोदरपणात व प्रसूतीमध्ये आजारांची गुंतागुंत होण्याचे प्रमाण खेड्यांमध्ये जास्त आहे.

ग्रामीण भागात स्थानिक अन्नपदार्थांची सहज उपलब्धता आहे, जी शहरी भागात नाही. उदा. भाज्या, फळे, धान्ये, दुग्धजन्य पदार्थ. शहरामध्ये सर्व पदार्थ बाहेरून येतात. ते थोडे शिळे झालेले असतात. दुधाची मुबलकता व शारीरिक कष्टाच्या कामामुळे खेड्यातील लोकांच्या हाडांची घनता वृद्ध व्यक्तींमध्येसुद्धा चांगली असते. खेड्यांमध्ये शहराच्या मानाने लोकसंख्येची घनता कमी असते. रेल्वे, बस स्टॅंड ,मोठे बाजार इ. गर्दीची ठिकाणे कमी असल्याने स्वाइन फ्लूसारखे संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता कमी असते. गावांमध्ये लोकांची एकमेकांशी ओळख चांगली असते, एक आपुलकी असते. त्यातून भजन-कीर्तन मंडळासारखी सामाजिक व्यासपीठे चांगली तयार होतात. आपल्या मातीतील या चांगल्या गोष्टींची जाणीव ठेऊन त्या वृद्धिंगत केल्या पाहिजेत.

आरोग्यातील अडचणींची माहिती शोधून अभ्यास केला पाहिजे. स्वच्छता, लसीकरण, आरोग्य, योगासने, व्यायाम, व्यसनमुक्ती यांसारख्या गोष्टींचे ज्ञान मिळवले पाहिजे व चांगल्या सवयी अंगी बाणवल्या पाहिजेत. त्यातूनही पुढे पाऊल टाकून अद्ययावत सुविधा ग्रामीण भागात आल्या पाहिजेत. त्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्नांची गरज आहे. गावापर्यंत आरोग्य पोचण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सुजाण होण्याची गरज आहे. चला तर मग, सुजाण होण्यासाठी या लेखमालेच्या माध्यमातून आजारांना चार हात लांब ठेवण्याचा प्रयत्न करूयात...

(लेखिका दाैंड जि. पुणे येथे अाय. सी. यु तज्ज्ञ अाहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com