बहुवीध पीक पद्धतीतून चांडोलीच्या शिवारात समृद्धी, ग्रामस्थ झाले बाजारपेठ अभ्यासक, शीतगृह पद्धतीचाही वापर

आधुनिक शेतीच्या माध्यमातून विविध पीकबदल करण्यात यशस्वी झालेले आमचे गाव पुढचे पाऊल टाकत आहे. शेतीमाल प्रक्रिया उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्याबरोबरच ‘फूड टेक्नॉलॉजी’ विषयातील महाविद्यालय उभारण्यासाठी शेतकरी एकत्र येत आहेत ही समाधानाचीच बाब आहे. -बी. टी. बांगर माजी सरपंच, प्रयोगशील शेतकरी
शेवंतीच्या माध्यमातून पीकबदल, शेतीतून आलेली समृध्दी
शेवंतीच्या माध्यमातून पीकबदल, शेतीतून आलेली समृध्दी

चांडोली खुर्द (जि. पुणे) हे गाव १९८५ पर्यंत विहिरीच्या उपलब्ध पाण्यावर बाजरी, बटाटा अशी पारंपरिक शेती करायचं. डिंभे धरण व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमुळे गाव बारमाही बागायती झालं मग गावानं चेहरामोहरा बदलला. कोबी, फ्लॉवर, बीट रूट, शेवंती, टोमॅटो अशी विविध पिकांची पद्धती अंमलात आली. बाजारपेठांचा अभ्यास असलेल्या इथल्या शेतकऱ्यांनी शीतगृहांची पद्धतीही वापरली. एकमेकांच्या साथीने शेतीत वेळोवेळी सुधारणा करीत चांडोलीकरांनी आपल्या गावचं शिवार समृद्ध केलं आहे.    पुणे जिल्ह्यात चांडोली खुर्द (ता. आंबेगाव) हे सुमारे २५० उंबऱ्याचं आणि दीड हजार लोकवस्तीचं घोडनदीच्या किनाऱ्यावर वसलेलं गाव. सन १९८५ ते १९९० पर्यंत गावात विहिरीच्या उपलब्ध पाण्यावर शेती व्हायची. मात्र डिंभे धरण झाल्यावर घोडनदीवर विविध ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले. बंधाऱ्यामधील पाणीसाठ्यावर शेती वाढत गेली आणि बदलत गेली. याबाबत सांगताना माजी सरपंच आणि ज्येष्ठ शेतकरी बी. टी. बांगर म्हणाले, की पूर्वी गावात विहिरीवरील पाण्यावर केवळ बाजरी आणि बटाटा ही दोनच पिकं प्रामुख्याने व्हायची. काही शेतकरी कांदा, लसूण वगैरे घ्यायचे.  पाण्याची उपलब्धतता झाल्यानंतर शेतकरी कोबी, फ्लॉवर आदी भाजीपाला पिकांकडे वळले. हा सर्व भाजीपाला वाशी बाजार समितीत पाठविला जायचा. ‘चांडोली फ्लॉवर’ अशी ओळख तिथं तयार झाली होती असं सांगताना बांगर यांच्या चेहऱ्यावर अभिमान दिसून येतो. या फ्लॉवरला विशेष मागणी असायची. दर देखील ५ ते १० टक्क्यांहून जास्त मिळायचा. टप्प्याटप्याने पीकबदलाला सुरवात झाली.  बीट झाले नवे पीक  बटाटा पिकाला पर्याय म्हणून काही शेतकरी विचार करत होते. संगमनेर परिसरात आमच्या पाहुण्याने बीट रूट पिकाचा प्रयोग केला होता. तो अभ्यासून मी देखील त्याचा प्रयोग करण्याचे ठरवले. साधारण १९९५-९६ मध्ये एक एकरात त्याची लागवड केली. उत्पादन, मिळालेला दर आणि त्याचे अर्थकारण चांगल्या प्रकारे जुळल्यासारखे झाले. टप्प्याटप्प्याने बिटाचे क्षेत्र वाढत गेले. आता माझे स्वतःचे १० एकर, तर गावात तब्बल ५०० एकरांत हे पीक घेतले जात असल्याचे बांगर यांनी सांगितले.  शीतगृहामुळे मूल्यवर्धन  गावालगत पाच वर्षांपूर्वी दोन शीतगृहे झाली आहेत. यामुळे बाजारातील मागणी आणि पुरवठ्याचा अंदाज घेत बीट शीतगृहात ठेवण्यास सुरवात झाली आहे. याबाबत बांगर म्हणाले की दर ५ ते ६ रुपये प्रति किलोपर्यंत घसरल्यानंतर आम्ही बीट शीतगृहात तीन महिन्यांसाठी ठेवतो. त्या काळासाठी दोन रुपये प्रति किलो भाडेशुल्क असते. हाताळणी खर्च एक रुपया प्रति किलो असतो. तीन महिन्यांसाठी ४ रुपये प्रति किलो खर्च केला तर साधारण १५ रुपये प्रति किलोचा दर मिळू शकतो. याचा शेतकऱ्यांचा चांगला फायदा होत आहे. एकमेकांचा अनुभव घेत चांडोलीचे ग्रामस्थ सुमारे १० हजार पिशव्यांपर्यंत बीट शीतगृहात ठेवत आहेत.  आता शेवंतीकडे कल  गावातील शेतकरी बीट शेतीत स्थिर झाल्यानंतर शेवंतीच्या फुलशेतीकडे वळले आहेत. गणेशोत्सव आणि दिवाळी सणानुसार लागवडीचे नियोजन केले जाते. सध्या गावात सुमारे २५० एकरांवर शेवंतीची आधुनिक पद्धतीने लागवड केली जात आहे. पावसाळी आणि ढगाळ वातावरणात प्रकाश संश्‍लेषणाला अडथळा येऊ नये यासाठी रात्री फ्लड लाइट शेतात लावले जातात. ही पद्धती आम्ही गावकऱ्यांनीच सुरू केल्याचे बांगर यांनी सांगितले. शेवंतीदेखील १५ दिवस शीतगृहात ठेवून बाजारातील मागणी, पुरवठा आणि दरांचा अंदाज घेऊन विक्री केली जात आहे.  शेतीशाळांचे आयोजन  बाजारपेठेचा बारकाईने अभ्यास केलेले गावातील शेतकरी हुशारीने पीकबदल करताना दिसतात. कोबी, फ्लॉवर, बीट, शेवंती, टोमॅटो, कांदा अशी विविधता म्हणूनच गावशिवारात दिसून येते. सातत्याने कृषी विभागाशी समन्वय साधत विविध पिकांच्या शेतीशाळांचे आयोजनही केले जाते. ऊस देखील गावच्या प्रमुख पिकांपैकी एक आहे.  दूध संकलन १० हजार लिटर  बहुपीक पद्धतींसह गावातील शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायात देखील आघाडी घेतली आहे. गावात सुमारे ६०० गायीस म्हशी अशी पशुसंपदा आहे. त्यासाठी आधुनिक मुक्त गोठा पद्धतीचा वापर केला जातो. दररोजचे एकूण दूध संकलन सुमारे १० हजार लिटरपर्यंत आहे. भैरवनाथ डेअरीसह प्रभात आणि श्रीराम या खासगी दूध संघाचे संकलन देखील गावात होते.  स्वतंत्र ग्रंथालय  चांडोलीची ग्रामपंचायत देखील सक्रिय आहे. ग्रामपंचायतीने स्वतंत्र ग्रंथालय स्थापन केले असून, त्यासाठी स्वतंत्र वास्तू उभारली आहे. ग्रंथालयात सुमारे ११ हजार पुस्तके असून यामध्ये धार्मिक, अध्यात्मिक, शेती यासह विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक पुस्तकांचा समावेश आहे. दररोज सुमारे १० वृत्तपत्रे येथे येत असून, त्यात ‘ॲग्रोवन’चा देखील समावेश आहे.  खासदार, जिल्हा परिषद निधीतून कामे  माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचा खासदार निधी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण गिरे यांच्या निधीतून सभामंडप, समाज मंदिर, अंगणवाडी, प्राथमिक शाळांच्या इमारती गावात बांधण्यात आल्या. स्वतंत्र इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळाही सुरू झाली आहे.  जमीन दिली बक्षीसपात्र  गावाला जुनी पाणीपुरवठा योजना होती. मात्र योजनेसह पाइपलाइन जुनी झाल्याने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून ९० लाख रुपयांची योजना मंजूर झाली आहे. त्यासाठी विहीर आणि टाकीसाठी अनंथा गणपत इंदोरे पाटील आणि संजय रामदास इंदोरे पाटील यांनी प्रत्येकी २ गुंठे जमीन गावाला बक्षीसपत्र करून दिली आहे.  पर्यटन विकासाचा आराखडा  गावालगत असलेल्या घोडनदीच्या काठावर सुमारे एक कोटी रुपयांच्या लोकवर्गणीतून भैरवनाथाचे भव्य मंदिर उभारले आहे. मंदिराचा परिसर सुशोभित करून हा परिसर पर्यटनासाठी विकसीत करण्याचे प्रयत्न ग्रामपंचायतीचे आहे. त्यातून अतिरिक्त उत्पन्न गावाला मिळणार आहे.  पुरस्कार व उल्लेखनीय कामे 

  • निर्मलग्राम पुरस्कार 
  • महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार 
  • संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार 
  • पर्यावरण संतुलित ग्राम पुरस्कार 
  • मुलींसाठी १०० सायकलींचे वाटप 
  • प्रत्येकी पंचवीस पीठ गिरण्या व शिलाई यंत्रांचे वाटप 
  • संपर्क- बी. टी. बांगर- ९८२२२५३०००

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com