दूध काढणी यंत्रामुळे स्वच्छ दूध निर्मिती शक्‍य होते.
दूध काढणी यंत्रामुळे स्वच्छ दूध निर्मिती शक्‍य होते.

नियोजन स्वच्छ दूध उत्पादनाचे...

दुग्ध व्यवसायात आर्थिक परिस्थिती, शास्त्रोक्त माहितीचा अभाव, उत्पादनातील निष्काळजीपणामुळे दुधाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते. अशा दुधापासून बनविलेल्या दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्तादेखील निकृष्ट दर्जाची असते. शास्त्रोक्त पद्धतीने दूध निर्मिती केल्यामुळे दुधाची प्रत वाढतेच, शिवाय जनावरांतील अनेक (कासदाह) आजारांनाही आळा घातला जाऊ शकतो.   स्वच्छ दूध म्हणजे डोळ्यांना दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या‍ अशुद्धीपासून मुक्त असलेले दूध. स्वच्छ दूध उत्पादनामुळे दुधाची प्रत चांगली होऊन ते आधिकाधिक काळ टिकवता येते. अशा दुधात जिवाणूंचे प्रमाण खूप कमी असते म्हणून ते मानवी आरोग्यास चांगले असते. या दुधापासून बनवलेल्या दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता उत्कृष्ट दर्जाची असते. स्वच्छ दूध उत्पादनासाठी घ्यावयाची काळजी १. दुभत्या जनावरांची स्वच्छता

  • धार काढण्यापूर्वी जनावरांची कास व सड स्वच्छ पाण्याने धुवावी. कास व सड सौम्य पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने निर्जंतुक करावेत.
  • दूध देणारी गाय निरोगी असावी. त्यांना कुठल्याही प्रकारचा संसर्गजन्य रोग झालेला नसावा. यामध्ये मुख्यतः कासदाह, क्षय या रोगांचा समावेश होतो.
  • या रोगाच्या जिवाणूंचा दुधाच्या माध्यमातून प्रसार होतो. त्यासाठी जनावरांची तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून नियमित तपासणी करून घ्यावी.
  • रोगी जनावरांचे दूध पिण्यासाठी वापरू नये. नेहमीच दूध उकळून व थंड करून प्यावे. त्यामुळे दुधातून प्रसार होणाऱ्या संसर्गजन्य रोगांना आळा बसतो.
  • २. जनावरांचा गोठा

  • गोठा आणि भोवतालचा परिसर नेहमी स्वच्छ आणि कोरडा ठेवावा. हवा खेळती असावी.
  • दूध काढण्यापूर्वी गोठ्यातील शेण, मलमूत्र व काडीकचरा काढून नियमित साफसफाई करावी. गोठ्यात माशा, डास, गोचीड इत्यादी कीटकांचा शिरकाव प्रसार होऊ नये म्हणून काळजी घ्यावी.
  • गोठ्याच्या भिंती पक्क्या असाव्यात, म्हणजे कीटकांच्या उत्पादनाला जागा मिळणार नाही. भिंतींना नेहमी चुना मारून घ्यावा.
  • दूध काढणारी व्यक्ती

  • धारा काढणारी व हाताळणारी व्यक्ती निरोगी सुदृढ व संसर्गजन्य रोगांपासून मुक्त असावी. अन्यथा त्याला जडलेल्या रोगांचे जिवाणू दुधातून प्रसार पावतात व इतरांनाही अशा दुधामधून संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
  • दूध काढणाऱ्या व्यक्तीने नेहमी नखे व केस कापावी. स्वछ कपडे परिधान करावेत. डोक्यावर शक्यतो रुमाल बांधवा. दूध काढणाऱ्याला शिंका येणे, खोकणे व धूम्रपान करणे यांसारख्या सवयी असू नयेत.
  • दूध काढण्यापूर्वी हात साबणाने धुवून कोरडे करून घ्यावेत.
  • दुधाची भांडी-दूध काढण्यासाठी व साठवण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी शक्यतो योग्य आकाराची व स्टेनलेस स्टीलची असावीत. ती स्वच्छ धुतलेली व जंतुविरहित असावीत.
  • मिल्किंग मशिनने दूध काढले जात असेल तर ते स्वच्छ, कोमट पाण्याने धुतलेले व जंतुविरहित करावे.
  • भांडी धुवून झाल्यानंतर ती कोरडी करण्यासाठी पालथी करून ठेवावीत. शक्यतो निमुळत्या तोंडाची भांडी दूध काढण्यासाठी वापरावीत.
  • दूध काढण्याची पद्धत

  • चिमटा पद्धत, पूर्ण हात पद्धत, नकलिंग म्हणजेच अंगठा पद्धत अशा तीन पद्धतीने दूध काढले जाते. यात पूर्ण हात पद्धत ही सर्व उत्तम मानली जाते. या पद्धतीत संपूर्ण हाताच्या पाचही बोटात सड पकडून खालच्या बाजूने ओढून दाब दिला जातो. ही पद्धत अंगठ्याने दूध काढण्याच्या पद्धतीपेक्षा उत्तम आहे कारण याला वेळोवेळी हात बदलावा लागत नाही. या पद्धतीने वासराने दूध ओढल्याप्रमाणे दूध काढले जाते. तसेच सडांवर सारखा दाब टाकला गेल्यामुळे कासदाहसारख्या आजारास जनावर कमी प्रमाणात बळी पडते. सडास मसाज करण्याने, वासरच्या सड चोखण्याने किंवा धारा काढण्याच्या वेळीच्या नेहमीच्या आवाजामुळे जनावरे पान्हा सोडतात.
  • जनावराने पान्हा सोडल्यानंतर पाच ते सात मिनिटात दूध काढणे आवश्यक असते, सुरुवातीच्या काही धारा भांड्यात घेऊ नयेत, कारण यामध्ये अपायकारक जिवाणू असतात. जनावराच्या शेवटच्या धारेमध्ये जास्त प्रमाणात स्निग्धांश असतो, म्हणून शेवटचे दूध नीट काढून घ्यावे. पाच ते सात मिनिटांत धार काढणे पूर्ण करावे.
  • दूध काढल्यानंतर शक्य तितक्या लवकर संकलन केंद्रावर पाेचवावे किंवा ५-१० अंश सेल्सिअस तापमानाला दूध साठवून ठेवावे.
  • यंत्राच्या साह्याने दूध काढणे- या पद्धतीचा उपयोग सरकारी संस्था किंवा मोठे फार्म मोठ्या प्रमाणात करतात. ही पद्धत शक्यतो जास्त जनावरांचे दूध काढण्यासाठी वापरली जाते. या पद्धतीत सडाला मालिश होते. यामुळे कासेला इजा होत नाही. शक्य असेल तर ही पद्धत अमलात आणावी. या पद्धतीत जलद दूध काढता येऊन मनुष्यबळ वाचते आणि जनावरांची एकंदर उत्पादकता समजते.
  • संपर्क ः डॉ. अमोल आडभाई, ८८०५६६०९४३ (दक्षिणीय विभाग, राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, बंगळूर, कर्नाटक) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com