अोळखा थंडीमुळे येणारा जनावरांतील ताण

तापमानावर लक्ष ठेवून हिवाळ्यात जनावराच्या आहारात बदल करावा.
तापमानावर लक्ष ठेवून हिवाळ्यात जनावराच्या आहारात बदल करावा.

सध्या तापमानात घट होत अाहे व थंडीचे प्रमाण वाढत अाहे. त्यामुळे दुधाळ जनावरांवर विपरीत परिणाम दिसून येत आहेत. दुधाळ जनावरांमध्ये थंडीमुळे पडणारा ताण ओळखून योग्य उपाययोजना केल्यास जनावरांचे आरोग्य चांगले राहते, उत्पादन वाढते. बदलत्या वातावरणात जनावराची तग धरून राहण्यासाठी क्षमता खालावते, अाजाराचे प्रमाण वाढते अाणि दूध उत्पादनामध्ये घट होते. त्यामुळे दुधाळ जनावरावर थंडीमुळे पडणाऱ्या ताणाकडे दुर्लक्ष करू नये.

थंडीमुळे पडणारा ताण म्हणजे काय?

  • गायी शरीराच्या २५ ते २७ अंश सेल्सिअस तापमानाला तर म्हशी शरीराच्या ३६ अंश सेल्सिअस तापमानाला बाहेरील वातावरणाच्या तापमानावर सुरळीत कार्य करतात, यालाच थर्मोन्यूट्रल झोन (Thermonutral zone) असे म्हणतात.
  • गाय व म्हैस गरम रक्ताचे प्राणी असल्यामुळे ते स्वतःच्या शरीराचे तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या आसपास राखून ठेवतात.
  • ज्यावेळेस वातावरणातील तापमानाची पातळी थर्मोन्यूट्रल झोनच्या खाली येते त्यावेळी जनावरावर ताण येतो. या ताणाला हिवाळ्यातील ताण (Cold stress) असे म्हणतात.
  • हिवाळ्यात पडणाऱ्या ताणाला प्रतिकार करण्यासाठी जनावरांमध्ये होणारे बदल

  • शुष्क घटकाचे ग्रहण वाढणे
  • शुष्क घटकांचे पचन कमी करणे
  • रवंथ करण्याची प्रक्रिया वाढणे
  • आतड्यांची हालचाल वाढणे
  • खालेल्या घटकांना पचनसंस्थेतून शेणावाटे बाहेर फेकण्याचा वेग जास्त होणे
  • प्राणवायू घेण्याचा वेग वाढणे
  • शरीरामध्ये काही ठराविक ग्रंथीरसाचे प्रमाण वाढवणे
  • आहार ग्रहणावर होणारे परिणाम वातावरणातील तापमान २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी होण्यास सुरवात होते तेव्हा जनावराच्या शरीरावर विपरीत परिणाम व्हायला सुरवात होते. त्यामुळे आहार घेण्याचे प्रमाण मंदावते, त्यामुळे शरीरक्रियेला लागणाऱ्या उर्जेची आवश्यकता वाढते.

  • जनावर उर्जेच्या कमतरतेमुळे शरीराचे तापमान योग्य त्या स्थितीत ठेवण्यास असमर्थ होते, त्यामुळे पचनसंस्था व दूध उत्पादनावर परिणाम होतो.
  • जास्त थंडी असलेल्या देशामध्ये हिवाळ्यातील ताणामुळे जनावरांची उर्जेची गरज २० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढते, पण भारतात जास्त थंडीच्या दिवसात विशेषतः डिसेंबर व जानेवारी महिन्यात ही गरज १५ टक्क्यांनी कमी असू शकते. कारण या कालावधीत रात्रीचे तापमान हे १० अंश सेल्सिअस व त्यापेक्षा कमी पण असते.
  • उर्जेची कमतरता व शरीराचे तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या आसपास राखून ठेवण्यासाठी जनावर शुष्क घटक ग्रहण करण्याचे प्रमाण वाढवते, त्यामुळे शरीरातील चयापचयाचा वेग वाढून तापमान नियंत्रणात ठेवण्यात मदत होते
  • घ्यायची काळजी

  • तापमानावर लक्ष ठेवून हिवाळ्यात जनावराच्या आहारात बदल करावा.
  • बाहेरून येणाऱ्या थंड वाऱ्यापासून दुधाळ जनावरांचे संरक्षण होईल याप्रमाणे गोठ्यात बदल करावेत.
  • गोठ्यातील जमीन ऊबदार राहण्यासाठी अाणि गोठा कोरडा राहण्यासाठी जमिनीवर वाळलेले गवत किंवा धान्याचा भुसा पसरावा. दोन ते तीन दिवसांनी अाच्छादन बदलावे.
  • दुधाळ जनावरांच्या आहारात दाणा मिश्रण व सुक्या चाऱ्याचा समावेश करावा. अाहारात हरभरा, ज्वारी किंवा गहू कुटाराचे प्रमाण वाढवावे
  • जनावरांना पुरवलेला आहार पचायला वेळ लागतो म्हणजेच जनावराने एकदा जो आहार ग्रहण केला की चयापचय प्रक्रिया चालू होऊन त्यापासून जनावराला ऊर्जा कमीत कमी ६-१० तासांनी उपलब्ध होते आणि या उर्जेचा उपयोग करून जनावरे त्यांच्या शरीरातील तापमान नियंत्रित करून थंडीच्या ताणापासून स्वतःचे रक्षण करतात. म्हणून दुधाळ जनावरांना संध्याकाळी पुरवला जाणारा आहार हा ६ ते ७ वाजता पुरवावा जेणेकरून ही ऊर्जा त्यांना जवळपास रात्री २ ते सकाळी ६ वाजायच्या दरम्यान वापरता येईल. खास करून महाराष्ट्रात याच काळात म्हणजे पहाटेच्या वेळेस जनावरावर थंडीचा ताण जास्त प्रमाणात पाहायला मिळतो.
  • जनावराला पूर्ण वेळ पाणी उपलब्ध करून द्यावे. पाण्याचे तापमान जनावराच्या शरीराच्या जवळपास म्हणजे ३७ ते ४० अंश सेल्सिअस असावे. जास्त गार पाणी असल्यास जनावरे पाणी पीत नाहीत. त्याचा परिणाम आहार ग्रहणावर होतो.
  • संपर्क ः डॉ. अमित शर्मा, ८८८८३३३४५० (पशुआहारशास्त्र विभाग, राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, कर्नाल, हरियाणा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com