अननसाच्या टाकाऊ सालीपासून पर्यावरणपूरक कुंड्या

अननसाच्या सालीपासून तीन प्रकारच्या कुंड्या तयार करण्यात आल्या आहेत.
अननसाच्या सालीपासून तीन प्रकारच्या कुंड्या तयार करण्यात आल्या आहेत.

अननस खाल्ल्यानंतर त्याची साल सहसा फेकून दिली जाते. वाया जाणाऱ्या या सालींपासून थायलंड येथील संशोधकांनी पर्यावरणपूरक कुंड्यांची निर्मिती केली आहे. या कुंड्या पूर्णपणे कुजत असल्याने प्लॅस्टिक कुंड्यांना पर्याय म्हणून वापरता येतात. रोपवाटिकेमध्ये विविध रोपांच्या निर्मितीसाठी आणि रोपांच्या पुनर्लागवडीसाठी या कुंड्या उपयुक्त ठरतील. पुढे कुंड्या कुजून जमिनीची सुपीकताही वाढवतात. हे संशोधन स्प्रिंगर या संशोधन पत्रिकेमध्ये प्रसिद्ध करण्यात अाले अाहे. अननस उत्पादनात अाणि निर्यातीमध्ये थायलंड देश जगात चाैथ्या क्रमांकावर अाहे.  थायलंडमध्ये अननसावर आधारित प्रक्रिया उद्योगांची संख्याही जास्त अाहे. या प्रक्रिया उद्योगामध्ये अननसाचा गर काढून घेतल्यानंतर साली शिल्लक राहतात. तुलनेने कठीण असल्याने सावकाश कुजतात. या वाया जाणाऱ्या सालीचा योग्य उपयोग करण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करीत होते.  त्यांनी अननस सालीपासून नावीन्यपूर्ण अाणि पर्यावरणपूरक कुंड्या बनवल्या आहेत. या पर्यावरणपूरक कुंड्यांमुळे तीन उद्देश साध्य होतात. १) अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये वाया जाणाऱ्या अननस सालीचा पुनर्वापर होईल. २) प्लॅस्टिक कुंड्यांना पर्यावरणपुरक पर्याय उपलब्ध होईल. ३) अननस सालीमध्ये असलेले सेंद्रिय व पोषक घटक रोपांना उपलब्ध होतील. जमिनीची सुपीकता जपली जाईल.

पोषक तत्त्वांचा उत्तम स्राेत अननस

  • वनस्पतींच्या वाढीसाठी पोषक ठरणाऱ्या नायट्रोजन आणि फॉस्फरसचा अननस  हा उत्तम नैसर्गिक स्राेत अाहे.
  • रोपांच्या शाकीय वाढीच्या काळात व नंतरही नायट्रोजन अत्यंत आवश्‍यक घटक मानला जातो. तो यातून उपलब्ध होतो.
  • फॉस्फरस मुळांच्या, फुलांच्या अाणि फळांच्या वाढीसाठी उपयुक्त अाहे. तसेच यामुळे झाडावर रोग अाणि किडींचेही प्रमाण कमी राहते.
  • अननस सालीपासून सेंद्रिय कर्ब उपलब्ध होण्यास मदत होते. सेंद्रिय कर्ब उपयुक्त जिवाणूंच्या वाढीसाठी, पर्यायाने जमिनीच्या सुपीकतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कुंड्यांचे महत्त्व या तीनही घटकांमुळे अधोरेखित होते.
  • कुंड्या तयार करण्याची पद्धत

  • या कुंड्या तयार करण्याची पद्धत साधी व सोपी आहे. यासाठी अननसाची साल १५० फॅरनहाइट तापमानावर शिजवली.
  • शिजवलेल्या मिश्रणामध्ये टॅपिअोका स्टार्च अाणि पाणी मिसळून त्याला कुंड्यांचा अाकार देण्यात अाला. टॅपिअोका स्टार्च शिजवलेल्या मिश्रणाला बांधून ठेवण्याचे अाणि कुंड्यांना चांगला अाकार देण्याचे काम करते.
  • रोपांच्या चांगल्या वाढीसाठी, कुंड्यांचा जास्त उपयुक्त अाकार निश्‍चित करण्यात आला. बनविण्याचा खर्च कमी करण्यासाठी अननसाची साल जाड, मध्यम अाणि बारीक अशा अाकारात बारीक करून घेतली.
  • जाड, मध्यम अाणि बारीक केलेल्या सालीमध्ये विविध प्रमाणात टॅपिअोका स्टार्च मिसळून विविध जाडीच्या कुंड्या तयार केल्या.
  • झाडाची चांगली वाढ होते की नाही हे पाहण्यासाठी तयार कुंड्यांमध्ये माती भरून चाचण्या घेण्यात अाल्या.
  • मिळालेले निष्कर्ष

  • कमी जाडी असलेल्या कुंड्या (१.५ सेंटिमीटर किंवा त्याहून कमी) सहजपणे तयार होऊन त्यामध्ये माती साठवता अाली तर जास्त जाडीच्या कुंड्यांमध्ये माती साठवणे शक्य झाले नाही.
  • जाडसर अननसाच्या सालीपासून मजबूत कुंड्या तयार झाल्या.
  • जाड अननस साल अाणि टॅपिअोका स्टार्चचे १ः० प्रमाण असलेल्या १ सेंमी जाडीच्या कुंड्या सर्वात जास्त मजबूत होत्या अाणि या कुंड्यांमुळे जमिनीची नैसर्गिकपणे सुपीकता वाढण्यासही मदत झाली.
  • चाचण्यांच्या काळात या कुंड्यांमध्ये लावलेल्या रोपांवर ४५ दिवसांपर्यंत कुठलेही दुष्परिणाम झाले नाहीत.
  • या कुंड्यांमध्ये पाणी शोषले जाते जे तीन दिवसांपर्यंत कुंडीमध्ये टिकून राहते. त्यामुळे वारंवार झाडाला पाणी घालण्याची गरज भासली नाही.
  • या कुंड्या कॉयर अाणि लाकडापासून बनविलेल्या कुंड्यांना चांगला पर्याय ठरू शकतात.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com