लागवड लसूणघासाची...

लसूणघासाची ओळीत  लागवड केल्याने चांगले उत्पादन मिळते.
लसूणघासाची ओळीत लागवड केल्याने चांगले उत्पादन मिळते.

लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली असते. लागवडीसाठी आरए,-८८, आनंद-२, आनंद-३ या जाती निवडाव्यात. दोन ओळीत एक फूट अंतर ठेवून ओळीत बियाणे पेरणी केली असता हेक्‍टरी फक्त २५ किलो बियाणे पुरते. ओळीत पेरणी केल्याने खते देणे सोपे जाते. हात कोळप्याने आंतरमशागत करता येते. लसूणघास हे द्विदलवर्गीय चारापिकांपैकी एक अतिशय महत्त्वाचे पीक आहे. हे पीक वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीत व हवामानात आढळून येते. राज्यात या पिकाच्या जास्त करून बहुवार्षिक जातींची लागवड केली जाते. बहुवार्षिक पिकापासून दरवर्षी १२ ते १५ कापण्या मिळतात.पिकास चांगला सूर्यप्रकाश व थंड हवामान अधिक मानवते.

  • हे पीक वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये चांगले वाढू शकते. तथापी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली असते.
  • हे पीक तीन वर्षांपर्यंत टिकणारे असल्यामुळे जमिनीची चांगली मशागत करावी. त्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी.
  • पीक वर्षभर सतत चारा देणारे असल्यामुळे भरपूर प्रमाणात भरखते व वरखते देणे गरजेचे आहे. मशागतीच्या वेळी हेक्‍टरी १५ टन शेणखत जमिनीत मिसळावे. पेरणीपूर्वी २० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व ५० किलो पालाश या रासायनिक खतांची प्रतिहेक्‍टरी आवश्‍यकता आहे. त्यानंतर दर तीन ते चार कापण्यानंतर हेक्‍टरी ५० किलो स्फुरद खताची मात्रा द्यावी.
  • बियाणे जातीवंत व शुद्ध असावे. बऱ्याच वेळेस बियाणामध्ये अमरवेल या परोपजीवी वनस्पतीचा समावेश असतो. त्यामुळे खात्रीशीर ठिकाणीच बी खरेदी करावे.
  • पेरणी ही फोकून किंवा ओळीत पेरणी करता येते. फोकून पेरणी केल्यास हेक्टरी ५० किलो बियाणे लागते. त्याऐवजी दोन ओळीत एक फूट अंतर ठेवून ओळीत बियाणे पेरणी केली असता हेक्‍टरी फक्त २५ किलो बियाणे पुरते. ओळीत पेरणी केल्याने खते देणे सोपे जाते. हात कोळप्याने आंतरमशागत करता येते.
  • ओळीत बियाणे पेरणी करण्याअगोदर जमिनीमध्ये वाफे तयार करून घ्यावेत. जमिनीचा उतार बघून साधारणपणे ३ ते ५ मीटर रुंद व १० मीटर लांबीचे वाफे तयार करावेत. त्यानंतर १ फूट अंतरावर काकऱ्या पाडाव्यात. यासाठी अत्यंत साधे व सोपे अवजार तयार करता येऊ शकते. तयार केलेल्या काकऱ्यामध्ये चिमटीने बी पेरून हाताने काकऱ्या बुजवून घ्याव्यात. पेरणीपूर्वी दहा किलो बियाणास २५०  ग्रॅम रायझोबियमची बीजप्रक्रिया करावी.
  • आरए,-८८, आनंद-२, आनंद-३ या जातींची लागवड करावी.
  • बी पेरल्यानंतर पहिल्यांदा पाणी हळूवार द्यावे. त्यासाठी दाऱ्याच्या तोंडाजवळ गोणपाट टाकावे. म्हणजे बी वाहून जाणार नाही. त्यानंतर पिकास नियमित पाणीपुरवठा करावा. जमिनीच्या मदगुरानुसार हिवाळ्यात १० ते १५ दिवसांनी तर उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. तुषार सिंचनाचा वापर फायदेशीर ठरतो.  यामध्ये रानबांधणीचा खर्चही बराच वाचतो.
  • पिकाच्या चारी बाजूस एरंडी व झेंडूची लागवड केल्यास पिकाचे किडीपासून व सुत्रकृमींचे चांंगले नियंत्रण होते.
  • हे बहुवर्षीय पीक असल्याने प्रत्येक कापणीनंतर खुरपणी करून तणांचे नियंत्रण करावे लागते. ओळीत बियाणे पेरले असल्यास हात कोळपणी यंत्राने कमी खर्चात तणनियंत्रण करता येते.
  • पिकामध्ये उंदरांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. त्याच्या नियंत्रणासाठी पिकामध्ये ठरावीक अंतरावर मोगली एरंडीच्या कांड्या किंवा वाया गेलेल्या ट्यूब लाइट उभ्या खोचाव्यात. त्याचप्रमाणे कापणी करताना एकाआड एक वाफ्याची कापणी केल्याने उंदरांचे चांगले नियंत्रण झाल्याचे दिसून येते.
  • चाऱ्याचे उत्पादन

  • लसूणघासाची पहिली कापणी पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी करावी. पहिल्या कापणीनंतर दर २२ ते २५ दिवसांनी कापणी करावी. बहुवार्षिक लसूणघासापासून दरवर्षी १२ ते १५ कापण्या मिळतात.
  • वर्षभरातील १२ ते १५ कापण्यापासून सरासरी १०० ते १२५ टन हेक्‍टरी हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते. चांगली जमीन व व्यवस्थापन असल्यास हेक्‍टरी १५० टनापर्यंत हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळू शकते.
  • चाऱ्यात १८ ते २० टक्के प्रथिने, २.० टक्के स्निग्धांश, २५ टक्के काष्ठमय तंतू, २९ टक्के कर्बोदके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, उपयुक्त आम्ले तसेच ‘अ' आणि ‘ड' जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असतात.
  • एकाच पिकापासून चारा आणि बियाणे उत्पादन
  • बायफ संस्थेमध्ये केलेल्या संशोधनातून असे दिसून आले की लसूणघासाच्या एकाच पिकापासून दरवर्षी हिरव्या चाऱ्याबरोबरच बीजोत्पादनसुद्धा घेता येते. यासाठी बियाणे एक फूट अंतरावर ओळीत पेरावे. एक हेक्‍टरसाठी २५ किलो बियाणे पुरेसे होते. उन्हाळ्यामध्ये मार्च महिन्यात कापणी करून पीक बियाण्यावर सोडावे. साधारणपणे अडीच तीन महिन्यांत पीक फुलोऱ्यावर येऊन बियाणे तयार होते. या वेळी पिकाची कापणी करून खळ्यामध्ये वाळवून घ्यावे. कापणीनंतर लगेच हलकी खुरपणी करून पिकास स्फुरदयुक्त खत देऊन पाणी द्यावे. त्यामुळे नवीन फूट येऊन पीक पुन्हा जोमाने वाढते. वाळत घातलेल्या पिकाची मळणी करून बी तयार करावे. अशा पद्धतीने तीन वर्षे एकाच पिकापासून चारा आणि बियाणे उत्पादन करून जास्तीत जास्त आर्थिक फायदा मिळवता येतो.
  • एक हेक्‍टर क्षेत्रापासून दरवर्षी सुमारे १६० ते १७० किलो बियाणे आणि ७० ते ८० टन हिरवा चाऱ्याचे उत्पादन मिळू शकते.
  • बरसीम लागवड

  • बरसीम हे द्विदलवर्गीय चारापीक असून या पिकापासून लुसलुसीत, रुचकर आणि पौष्टिक असा भरघोस चारा मिळतो. यामध्ये १८ ते २० टक्के प्रथिने असतात. पिकास थंड व कोरडे हवामान आवश्‍यक आहे. पाण्याचा चांगला निचरा असणारी, मध्यम ते भारी तसेच चुना व स्फुरद भरपूर प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या जमिनीत हे पीक चांगल्याप्रकारे वाढते. काहीशा प्रमाणात विम्लयुक्त जमिनीमध्ये सुद्धा हे पीक वाढते. परंतु आम्लयुक्त आणि पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत हे पीक वाढत नाही. जमिनीमध्ये सोडियम, पोटॅशियम व मॅग्नेशिअमचे क्षार जास्त असतील तर बरसीम बियांच्या उगवणीवर व वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. हलक्‍या जमिनीमध्ये जास्त प्रमाणात शेणखताचा वापर करून बरसीम लागवड करावी.
  • जमिनीची योग्य मशागत करून पुरेसे शेणखत पसरवून झाल्यानंतर काकरपाळी देऊन पिकासाठी भुसभुशीत जमीन तयार करावी. जमीन तयार केल्यानंतर बांधणी करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी दोन मीटर रुंद आणि जमिनीच्या उतारानुसार लांबी ठेवून वाफे बनवावेत. २ मीटर रुंद व १० मीटर लांब अशा आकाराचे वाफे तयार केल्यास पेरणीसाठी सुलभ व पाण्याच्या पाटामध्ये कमी क्षेत्र वाया जाते.
  • हेक्‍टरी २० किलो नत्र, ८० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश ही खतमात्रा पेरणीच्या वेळेस द्यावी.
  • हेक्‍टरी २५ किलो बियाणे लागते. लागवडीसाठी वरदान, बुंदेल बरशीम २ या जातींची निवड करावी. पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पूर्ण करावी. म्हणजे पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक असणारी थंडी तीन ते चार महिन्यापर्यंत मिळेल आणि त्यापासून जास्तीत जास्त म्हणजेच चार कापण्या मिळतील. बियाणाची पेरणी करण्याअगोदर बियाणे १० टक्के मिठाच्या पाण्यात बुडवावे. असे केल्याने चिकोरी गवताचे बी पाण्यात तरंगून येते. ते आपणाला सहजरीत्या वेगळे करता येते. बियाणे पाण्यातून बाजूला काढून पोत्यावर घ्यावे. प्रति दहा किलो बियाणास २५० ग्रॅम रायझोबियम व २५० ग्रॅम स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. बियाणे पूर्णतः सावलीमध्ये सुकवून घ्यावे. अशारीतीने प्रक्रिया केलेले बियाणे वाफ्यामध्ये २५ सें.मी. अंतरावर ओळीमध्ये  २ ते २.५ सें.मी. खोलीवर पेरावे. त्यापेक्षा जास्त खोलवर पेरणी केल्यास बियाणे उगवणीवर परिणाम होतो.
  • पेरणी केल्यानंतर पाण्याची पहिली पाळी द्यावी. या पाण्याच्या वेळी वाफ्याच्या सुरवातीला पाण्याच्या बाऱ्यावर गोणपाट अथवा झाडाचा पाला ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे गवताचे बियाणे वाहून जात नाहीत. पहिल्या पाण्याच्या पाळीनंतर दुसरी पाण्याची पाळी ५ ते ७ दिवसांच्या अंतराने द्यावी. म्हणजे बियाणाची उगवण चांगली होते. त्यानंतरच्या पाळ्या १० ते १२ दिवसांच्या अंतराने जमिनीची प्रत ठरवून देणे. पिकास १२ ते १४ इतक्‍या पाण्याच्या पाळ्या आवश्‍यक आहेत.
  • या पिकामध्ये चिकोरी हे तण आढळते. उगवण झाल्यानंतर १० ते १५ दिवसांनी खुरपणी करावी. दोन ओळीमध्ये हाताने चालणाऱ्या कोळप्याने आंतरमशागत करावी.
  • पेरणीनंतर पहिली कापणी ५० ते ५५ दिवसांनी करावी. गवताची कापणी जमिनीच्यावर ४ ते ५ सें.मी. वर करावी. नंतरच्या कापण्या २२ ते २५ दिवसांनी कराव्यात. महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबरमध्ये पेरणी केलेले गवत मार्च अखेरपर्यंत टिकते. या काळामध्ये एकूण चार कापण्या मिळतात.
  • डॉ. विठ्ठल कौठाळे, ९९६०५३६६३१ (बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फउंडेशन, मध्यवर्ती संशोधन केंद्र, उरुळी कांचन, जि. पुणे)    

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com