पौष्टिक चाऱ्यासाठी लसूणघास

पौष्टीक चाऱ्यासाठी लसूणघास लागवड फायदेशीर ठरते.
पौष्टीक चाऱ्यासाठी लसूणघास लागवड फायदेशीर ठरते.

लसूणघास चाऱ्यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने, काष्ठमय तंतू, कर्बोदके आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. पीक वर्षभर सतत चारा देणारे असल्यामुळे योग्य प्रमाणात भरखते, वरखते द्यावीत. दोन ओळींत एक फूट अंतर ठेवून ओळीत बियाणे पेरणी करावी. लसूणघास हे द्विदलवर्गीय चारापिकांपैकी महत्त्वाचे पीक आहे. बहुवार्षिक पिकापासून दरवर्षी १२ ते १५ कापण्या मिळतात. लसूणघास चाऱ्यामध्ये १८ ते २० टक्के प्रथिने, २.० टक्के स्निग्धांश, २५ टक्के काष्ठमय तंतू, २९ टक्के कर्बोदके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, उपयुक्त आम्ले तसेच अ आणि ड जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात आहे.

  • या पिकास चांगला सूर्यप्रकाश व थंड हवामान अधिक मानवते. हे पीक वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये चांगले वाढू शकते. मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन मानवते.
  • हे पीक तीन वर्षांपर्यंत टिकणारे असल्यामुळे जमिनीची चांगली मशागत करावी.
  • पिकास योग्य प्रमाणात भरखते, वरखते द्यावीत. मशागतीच्या वेळी हेक्टरी १० ते १५ टन शेणखत जमिनीत मिसळावे. पेरणीपूर्वी २० किलो नत्र, १०० किलेा स्फुरद व ५० किलो पालाश या रासायनिक खतांची प्रति हेक्टरी मात्रा द्यावी. त्यानंतर दर तीन ते चार कापण्यानंतर हेक्टरी ५० किलो स्फुरद खताची मात्रा द्यावी.
  • बियाणे वापरताना ते जातिवंत व शुद्ध असणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळेस बियाण्यांमध्ये अमरवेल या परोपजीवी वनस्पतीचा समावेश असतो. त्यामुळे खात्रीशीर ठिकाणीच बी खरेदी करावे.
  • लसूणघासाची फोकून पेरणी तसेच ओळीत पेरणी करता येते. फोकून पेरणी केल्याने जास्त प्रमाणात (५० किलो/हेक्टरी) बियाणे लागते. त्याऐवजी दोन ओळीत १ फूट अंतर ठेवून ओळीत बियाणे पेरणी केली असता हेक्टरी फक्त २५ किलो बियाणे लागते. ओळीत पेरणी केल्याने खते देणे सोपे जाते. हातकोळप्याने आंतरमशागत करता येते.
  • ओळीत बियाणे पेरणी करण्याअगोदर जमिनीमध्ये वाफे तयार करून घ्यावे. यासाठी जमिनीचा उतार बघून साधारणपणे ३ ते ५ मीटर रुंद व १० मीटर लांबीचे वाफे तयार करावेत. त्यानंतर १ फूट अंतरावर काकऱ्या पाडाव्यात. तयार केलेल्या काकऱ्यामध्ये चिमटीने बी पेरून हाताने काकऱ्या बुजवून घ्याव्यात. पेरणीपूर्वी प्रतिदहा किलो बियाण्यास रायझोबियम २५० ग्रॅमची प्रक्रिया करावी.
  • पेरणीसाठी आरएल-८८, आनंद-२, आनंद-य्को-१ या सुधारित जातींची लागवड करावी.
  • बी पेरल्यानंतर पहिले पाणी हळूवार द्यावे. त्यासाठी दाराच्या तोंडाजवळ गोणपाट टाकावे म्हणजे बी वाहून जाणार नाही. त्यानंतर पिकास नियमित पाणीपुरवठा करावा. जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. तुषार सिंचनाचा वापर करावा. यामुळे रानबांधणीचा खर्च वाचतो.
  • लसूणघास हे बहुवर्षीय पीक असल्याने प्रत्येक कापणीनंतर खुरपणी करावी. ओळीत बियाणे पेरले असल्यास हात कोळपणी यंत्राने कमी खर्चात तण नियंत्रण करता येते.
  • पिकामध्ये उंदरांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. त्याच्या नियंत्राणासाठी पिकामध्ये ठराविक अंतरावर मोगली एरंडीच्या कांड्या किंवा वाया गेलेल्या लाइटच्या ट्यूबा उभ्या खोचाव्यात, त्याचप्रमाणे कापणी करताना एकाआड एक वाफ्याची कापणी केल्याने उंदरांचे चांगले नियंत्रण होते. पिकाच्या चारही बाजूस एरंडी व पाटामध्ये झेंडूची सापळा पीक म्हणून लागवड करावी.
  • (बाएफ मध्यवतीर् संशोधन केंद्र, उरुळीकांचन, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com