सुधारित तंत्राने करा बटाटा लागवड

खांदणी, खुरपणी व मातीची भर घालणे अशी कामे पहिल्या तीस दिवसांमध्ये करावीत. त्यानंतर आंतरमशागतीच्या कामांमुळे बटाटा कंदांना इजा पोचू शकते.
खांदणी, खुरपणी व मातीची भर घालणे अशी कामे पहिल्या तीस दिवसांमध्ये करावीत. त्यानंतर आंतरमशागतीच्या कामांमुळे बटाटा कंदांना इजा पोचू शकते.

बटाटा पीक यशस्वी होण्यामध्ये जमिनीच्या निवडीप्रमाणे योग्य वेळी लागवड अत्यंत महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे गादीवाफ्यावर लागवड केल्यास पाण्याचा निचरा होण्याची समस्या दूर होते. फळसड व अन्य समस्या उद्भवत नाहीत. बटाटा पिकाची वाढ आणि विकास जमिनीच्या आत होत असतो. त्यामुळे बटाटा पीक यशस्वी होण्यासाठी जमिनीची निवड अत्यंत महत्त्वाची ठरते. पाण्याचा योग्य निचरा होणारी व भुसभुशीत, पोयट्याची जमीन निवडावी. जमिनीमध्ये पाणी साचून राहत असल्यास बटाटा विकासाच्या काळात फळ सड होऊ शकते. जमीन पाणी दिल्यानंतर घट्ट बनत असल्यास बटाटा कंदाची वाढ योग्य प्रकारे होत नाही.

  • ऑक्‍टोबर - नोव्हेंबर या महिन्यात बटाटा लागवडीचे नियोजन करावे. बटाटा पिकासाठी हलक्या थंड वातावरणाची गरज असते. बटाट्याच्या योग्य वाढीसाठी २२ ते २४ अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते.
  • बटाटा वाढ व विकास जमिनीच्या अंतर्गत होते. शाकीय वाढीनंतर बटाटा कंदाची (विकसित रूपांतरित खोड) निर्मिती होण्यासाठी १८-२० अंश सें. तापमानाची गरज असते. यास ‘ट्युबरलायझेशन’ असे म्हणतात.
  • लागवड पद्धत  आणि अंतर  योग्य वाढ व विकास होण्यासाठी  लागवड ही गादी वाफ्यावर करावी. काही ठिकाणी सरी वरंबा पद्धतीचा वापरही केला जातो. दोन्ही ओळींमधील अंतर दोन फूट, तर झाडांमधील अंतर जमिनीचा मगदुर व जातिनुसार ३० सें.मी. किंवा ४५ सें.मी. ठेवावे. बेणे निवड व प्रक्रिया

  • लागवड करण्यासाठी, कंदांची सुप्तावस्था पूर्ण झालेल्या कंदांची निवड करावी.
  • काढणी केल्याबरोबर ताबडतोब लागवडीसाठी निवड करू नये.
  • बटाट्यामध्ये सुप्तावस्था असल्यामुळे काही काळ साठवणूक केल्यानंतर ज्या बेण्यावर कार्यक्षम डोळ्यांची संख्या असलेल्या बेण्याची निवड करावी.
  • साधारणतः एक हेक्‍टर लागवडीसाठी १५-२० क्विंटल बेणे आवश्‍यक असते.  
  • बेणे साधारणतः ३०-३५ ग्रॅम वजनाचे व कार्यक्षम डोळे असणे आवश्‍यक असते.
  • जर बेणे ३०-३५ ग्रॅम वजनापेक्षा जास्त असल्यास अशा बेण्याची दोन चार भागांमध्ये कापणी करावी. परंतु कापणी करत असताना कार्यक्षम डोळ्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. कापणी केल्यानंतर बेण्याचे वजनदेखील साधारणतः ३०-३५ ग्रॅम असावे.
  • बेणेप्रक्रिया

  • बटाटा पिकांमध्ये उशिरा येणारा व लवकर येणारा करपा रोगांचा प्रामुख्याने प्रादुर्भाव होतो. तो टाळण्यासाठी बटाटा बेणे लागवडीपूर्वी मॅन्कोझेब ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणात किमान अर्धा तास बुडवावेत. २० क्विंटल बियाण्यासाठी सुमारे १०० लिटर पुरेसे होते.  
  • त्यानंतर बटाटा बेण्याच्या वाढीसाठी नत्रयुक्त घटकांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने २.५ किलो ॲझोटोबॅक्‍टर अधिक ५०० मि.लि. द्रवरूप ॲसिटोबॅक्‍टर प्रति १०० लिटर पाणी या द्रावणात बटाटे किमान अर्धा तास बुडवून ठेवावेत. हे द्रावण २० क्विंटल बटाटा बेण्यासाठी पुरेसे होते.  
  •  खत व्यवस्थापन

  • एक हेक्‍टर क्षेत्रासाठी लागवडीपूर्वी किंवा लागवडवेळी रानबांधणी करताना १५-२० टन चांगले कुजलेले शेणखत मिसळून घ्यावे.
  • लागवडीच्या वेळी रानबांधणी करताना युरिया २०८ किलो, १२८ किलो डीएपी आणि २०० किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरी खत मात्रा द्यावी.
  • साधारणपणे ४० दिवसानंतर जमिनीअंतर्गत बटाटा वाढ व विकास होण्यास सुरुवात होते. त्यानंतर बटाटा पिकांमध्ये अांतरमशागत करू नये. उदा. खांदणी, खुरपणी, भर घालणे इ. आंतरमशागतीची कामे बटाटा पीक साधारणः ३० दिवसांचे असेपर्यंतच करावी. खांदणी करून खोडालगत मातीची भर द्यावी. या वेळेस प्रतिहेक्‍टरी साधारणतः १०४ किलो युरिया खताची मात्रा द्यावी. ( हेक्टरी१०० किलो नत्र,६०ः किलो स्फुरद,१२० किलो पालाश. द्यावे नत्र दोनवेळा विभागून द्यावे.  )
  • डॉ. पी. ए. साबळे, ८४०८०३५७७२ (सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, सरदार कृषीनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, गुजरात.  )  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com