शेळ्यांच्या जंतनिर्मूलनाकडे लक्ष द्या

फायदेशीर शेळीपालनासाठी
फायदेशीर शेळीपालनासाठी

जंतांच्या प्रादुर्भावामुळे शेळ्यांच्या शरीरातील रक्त कमी होणे, अशक्त होणे, वजन घटणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, असे परिणाम दिसून येतात. प्रत्येक जनावरामागे मिळणाऱ्या उत्पादनात घट होते. त्यामुळे शेळ्यांच्या जंतनिर्मूलनाकडे विशेष लक्ष द्यावे. जंत शेळ्या-मेंढ्यांच्या पोटामध्ये दूषित चाऱ्यावाटे व दूषित पाण्यातून प्रवेश करतात. हे वेगवेगळ्या प्रकारचे जंत शेळ्यांच्या पचनसंस्थेमध्ये, रक्तामध्ये व विविध अवयवांमध्ये वाढतात.

जंतप्रादुर्भाव होण्याची कारणे

  • जंत नेहमी चरणाऱ्या जनावरांमध्ये जास्त प्रमाणात होतात.
  • जंतांचे गोल जंत, चपटे जंत, पानाच्या आकाराचे जंत हे महत्त्वाचे प्रकार आहेत.
  • गवतावर असलेले धोकादायक अवस्थेतील जंत पोटात गेल्याने शेळ्यांना जंतांचा प्रादुर्भाव होतो.
  • लेंड्यांबरोबर जंतांची अंडी बाहेर पडतात.
  • अनुकूल हवामानात अंड्यांतून अळ्या बाहेर पडतात.
  • अळ्या हवेचे तापमान व दवाच्या मदतीने गवताच्या पात्यांवर जाऊन बसतात. शेळी जेव्हा गवतावर चरते, तेव्हा गवताबरोबर अळ्याही पोटात जातात.
  • पोटात अळीचे जंतांत रूपांतर होऊन जीवनचक्र पुन्हा सुरू होते.
  • काही प्रकारच्या जंतांच्या अळ्यांची वाढ इतर प्राण्यांच्या शरीरात होते.
  • जंत प्रादुर्भावात होणारे नुकसान

  • शेळ्यांमधील जंतप्रादुर्भावामुळे तीन प्रकारे नुकसान होते.
  • स्पष्ट नुकसान ः शेळ्या मरणे, खाद्य न खाणे, शेळ्या बारीक होणे
  • लपलेले/ सहज लक्षात न येणारे नुकसान ः वजनवाढ कमी होणे, खाद्याचे वजनात रूपांतर कमी प्रमाणात होणे, दूध कमी व कमी काळासाठी देणे, कातडी व केस राठ होणे
  • अनियंत्रित खर्च ः औषधोपचार, कामगार, जनावरे वेगळी ठेवण्यासाठी लागणारा आडोसा, प्रक्षेत्र जमिनीचा अकार्यक्षम वापर
  • यावर अनियंत्रित खर्च होतो.
  • जंतनाशकांचा वापर

  • जंतनाशकांचा वापर करताना विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. वर्षभराच्या चार जंतनिर्मूलनावेळी वेगवेगळी औषधे देणे/ औषधे बदलणे टाळावे. ज्यामुळे सर्वच जंतनाशक औषधांच्या विरुद्ध जंतांची प्रतिकारशक्ती वाढू शकते व ते औषधोपचार निरुपयोगी ठरू शकतात.
  • त्यावर उत्तम उपाय म्हणजे जोपर्यंत एका विशिष्ट जंतनाशक औषधाला गुण येत नाही, तोपर्यंत त्या विशिष्ट औषधाचा वापर सुरू ठेवावा.
  • जंतनाशक औषधाचा पूर्ण डोस जनावराच्या वजनानुसार देणे आवश्‍यक आहे.
  • कळपामध्ये नवीन जनावर मिसळण्याअगोदर जंतांचे औषध देणे आवश्‍यक आहे.
  • जंत प्रादुर्भावाची लक्षणे
  • शेळ्या- मेंढ्यांच्या पोटात नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे गोल कृमी आढळतात.
  • सर्वसाधारणपणे सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळणारी व त्यांच्या आरोग्यास अपायकारक जंतांची जात म्हणजे हिमाँकस कॉन्टॉर्टस (Haemonchus Contortus) ही होय.
  • ही जात रक्ताचे शोषण करणारी आहे. या जातीचा एक प्रौढ जंत एका दिवसात ०.०५ मिलि रक्त शोषण करतो.
  • जर शेळी- मेंढीला मोठ्या प्रमाणात जंत प्रादुर्भाव झालेला असेल, उदा. या जातीचे २००० जंत पोटात असतील, तर त्या शेळी-मेंढीच्या शरीरातील एकूण रक्ताच्या ५ ते ७ टक्के रक्त हे रोज या जंतांद्वारे शोषले जाईल.
  • त्यातून शेळीला पंडुरोग होतो, उत्पादनक्षमता कमी होते. प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर झालेला असेल (विशेषतः शेळी- मेंढी आधीचीच आजारी असेल किंवा नुकतीच विलेली असेल), तर मृत्यू होणे असे घातक परिणाम संभवतात.
  • शेळीच्या पुढच्या पायांच्या व पोटाच्या खाली पाणी होते.
  • शेळ्या, करडे खंगत जातात, वाढ खुंटते, मलूल दिसतात व खाणे कमी करतात.
  • खाल्लेले अन्न पचत नाही, हगवण लागते.
  • अंगावरील चमक जाऊन केस उभे राहतात.
  • जबड्याखाली व पोटाखाली सूज येते. जनावरे पोटाळलेली दिसतात.
  • रक्त शोषणाऱ्या जंतांमुळे शरीरातील रक्त कमी होते.
  • इलाज न केल्यास शेवटी खाणे बंद होऊन जनावरे दगावतात.
  • लेंडी व रक्ताची तपासणी केल्यास जंतांची अंडी किंवा जंत दिसतात.
  • शेळ्या- मेंढ्या अशक्त होतात व त्यांचे वजन घटते, नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने बसतात व लोळतात.
  • शेळ्या- मेंढ्या अशक्त झाल्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होऊन फुफ्फुसाचा दाह होणे इ.सारख्या इतर आजारांनासुद्धा त्या बळी पडू शकतात.
  • मोठ्या प्रमाणात जंतांचा प्रादुर्भाव असलेल्या शेळ्या- मेंढ्यांचे डोळे अलगद उघडून पाहिले असता नेहमी लालसर असणारा पापण्यांचा आतील भाग पांढरट दिसतो.
  • डरंगळणे (हगवण लागणे, पातळ संडास होणे) हे जंत प्रादुर्भावाचे प्रमुख लक्षण नाही. जंत प्रादुर्भावाशिवाय इतर कारणांनीसुद्धा शेळ्या- मेंढ्या डरंगळतात व बऱ्याच वेळा शेळ्या- मेंढ्यांमध्ये डरंगळणे दिसल्यास लगेचच जंतनाशक औषध पाजले जाते, हे चुकीचे आहे.
  • काही वेळा शेळ्या- मेंढ्या जंत प्रादुर्भावामुळे डरंगळू शकतात. त्यांचे निदान करण्यासाठी आजारी शेळ्या- मेंढ्यांची लेंडी तपासून घेऊन त्यांच्यातील जंतांचे प्रमाण पाहणे गरजेचे आहे.
  • जंत प्रादुर्भाव आटोक्‍यात ठेवण्याचे उपाय

  • जंत वाढल्यानंतर उपचार करण्यापेक्षा ते वाढू नयेत, म्हणून पुढीलप्रमाणे प्रतिबंधक उपाययोजना करणेच चांगले.
  • लेंडीच्या ढिगाभोवती शेळ्या चरायला सोडू नयेत.
  • सकाळी दहिवरात गवताच्या टोकावर जंतांच्या अळ्या आलेल्या असतात. दहिवर हटल्यावर त्या गवताच्या मुळाशी जातात, त्यामुळे दहिवर हटल्यावर शेळ्या चरायला सोडणे योग्य.
  • चरण्यास जाणाऱ्या शेळ्यांना जंतांची लागण होतच राहते, म्हणून पावसाळा सुरू होताना आणि पावसाळा संपताना असे दोनदा पशुवैद्याच्या देखरेखीखाली जंतांचे औषध पाजावे.
  • लेंड्यांची तपासणी करून आवश्‍यक असल्यास इतर वेळेसही औषध पाजावे.
  • शेळ्यांचा गोठा नेहमी स्वच्छ व कोरडा ठेवावा.
  • तळ्याच्या परिसरातील गोगलगाईंमध्ये काही जंतांच्या अळ्या वाढतात म्हणून गोगलगाईंच्या नियंत्रणासाठी योग्य ते उपाय योजावेत.
  • तळ्यात बदके पाळल्यानेही गोगलगाईंचा नायनाट होतो.
  • हिरवा चारा थोडा वेळ उन्हात वाळवून मग द्यावा. शेळीचे व्यवस्थापन चांगले केल्यास मृत्यूचे प्रमाण फक्त २ टक्के राहते.
  • संपर्क : डॉ. तेजस शेंडे, ९९७०८३२१०५ (पशुअनुवंश व पशुपैदास विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com