Agriculture story in marathi, Disease management in cows and buffaloes | Agrowon

प्रथमोपचाराने बरे होतील जनावरांतील आजार
डॉ. गजेंद्र भंगाळे, डॉ. रवींद्र जाधव
मंगळवार, 19 मार्च 2019

जनावरांमध्ये विविध प्रकारचे विषाणूजन्य व जीवाणूजन्य आजार अाढळतात. हे आजार विविध माध्यमातून निरोगी जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात. अनुकूल हवामान भेटल्यास असे विषाणू, जिवाणू विविध अवयवात प्रादुर्भाव करतात. अशा आजारांच्या लक्षणांची माहिती असल्यास आजारी जनावरे लवकर लक्षात येऊन होणारे आर्थिक नुकसान टाळता येते.

जनावरांमध्ये विविध प्रकारचे विषाणूजन्य व जीवाणूजन्य आजार अाढळतात. हे आजार विविध माध्यमातून निरोगी जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात. अनुकूल हवामान भेटल्यास असे विषाणू, जिवाणू विविध अवयवात प्रादुर्भाव करतात. अशा आजारांच्या लक्षणांची माहिती असल्यास आजारी जनावरे लवकर लक्षात येऊन होणारे आर्थिक नुकसान टाळता येते.

१) पोट फुगी
जनावराचे पोट डाव्या कुशीमध्ये फुगते. पोटामध्ये वायू भरल्यामुळे डाव्या कुशीचा भाग वर येतो. जनावर बैचन होते, चार पाणी खाणे सोडून देते व रवंथ करणे बंद होते. पोटामध्ये वायू तयार होण्याचे प्रमाण जास्त असल्यास जनावरास श्वास घेण्यास त्रास होतो व कधी कधी जनावर तोंड उघडून श्वास घेते. हा आजार प्रामुख्याने ओला व कोवळा चारा खूप जास्त प्रमाणात आणि अति घाईने खाल्ल्यास होतो.
उपचार
प्राथमिक उपचार म्हणून पोटाच्या डाव्या बाजूस मसाज करावा. जनावराच्या तोंडात लाकडी काठी बांधल्यास लाळ स्रावून पोटफुगी कमी होण्यास मदत होते. पोटफुगीची तीव्रता जास्त असल्यास पशुवैद्याकडून तत्काळ उपचार करून घ्यावा.

२) अपचन
खुराक, धान्य किंवा घरातील शिळे अन्न जास्त प्रमाणात जनावरांना दिल्यास किवा जनावरांनी अपघाताने खाल्ल्यास अपचन हा आजार होतो. यामध्ये आजारी जनावर खाणे पिणे बंद करते, पोट काही प्रमाणात फुगते, रवंथ करणे बंद होते व जनावर सुस्त होते. अपचनाची तीव्रता जास्त असल्यास जनावर सुस्त व अशक्त होते.
उपचार
खाण्याचा सोडा किवा मॅग्नेशिअम सल्फेट कोमट पाण्यात मिसळून पाजावे व पशुवैद्याकडून तत्काळ उपचार करून घ्यावा.

३) हगवण
या आजारामध्ये शेण पातळ, पाण्यासारखे किंवा रक्तमिश्रित पडते तसेच वारंवार शौचास होते. जनावर मलूल आणि सुस्त पडते. खाद्य व्यवस्थापन, वयोमान तसेच जनावराची प्रजनन व दूध उत्पादन यांतील अवस्थेनुसार या आजाराची विविध कारणे आहेत.
उपचार
खाद्य व्यवस्थापन कारणीभूत असल्यास योग्य तो बदल करावा. स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी द्यावे. चिमूटभर पोटॅशियम पर्मेंगनेट अर्धा लिटर पाण्यात मिसळून पाजावे. या व्यतिरिक्त पशुवैद्याकडून योग्य उपचार करून घ्यावा.

४) फऱ्या
हा जिवाणूजन्य व जनावरांमधील महत्त्वाचा जिवाणूजन्य आजार आहे. या मध्ये एकाएकी खूप ताप चढतो. जनावर लंगडू लागते. पायावरील जाड स्नायूवर सूज येते व ती दाबल्यास चरचर असा आवाज येतो. विशेषतः दोन वर्षे वयाखालील सुदृढ जनावरांत हा आजार प्रामुख्याने आढळतो. या आजाराची तीव्रता जास्त असून तो प्राणघातक आहे.
उपचार
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जनावरांना फऱ्या रोगाची लस टोचून घ्यावी व प्राणघातक आजाराचा प्रतिबंध करावा. रोग झालेला दिसून आल्यास तत्काळ पशुवैद्याकडून उपचार करून घ्यावेत.

५) कासदाह
हा आजार दुभत्या गाई म्हशींमध्ये होतो. यामध्ये दुधामध्ये गाठी येणे, अति पातळ किंवा प्रसंगी रक्तमिश्रित दूध येणे तसेच सड व कासेला सूज येणे व दूध उत्पादन कमी होणे ही प्रमुख लक्षणे आढळून येतात. सूज व वेदनेमुळे गाय म्हैस कासेला हात लावू देत नाही. दुभत्या जनावरांमध्ये अस्वच्छ गोठा किवा दूध काढण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे सडाद्वारे जिवाणूंचे संक्रमण होऊन कासदाह हा आजार उद्भवतो. हा आजार होण्यापासून जनावरांना वाचवणे हे झालेल्या रोगाचा उपचार करण्यापेक्षा फायद्याचे असते. कारण एकदा हा आजार झाल्यास गाई - म्हशीचे सड किंवा कास निरुपयोगी होण्याची दाट शक्यता असते. ज्यामुळे मोठा आर्थिक तोटा होतो. यासाठी स्वच्छ दूध उत्पादनासाठी लागणारे सर्व उपाय गोठ्यात अवलंबावेत.
उपचार
प्रादुर्भाव झालेल्या सडातील खराब दूध दिवसातून ६-८ वेळा काढणे व पशुवैद्यकाकडून योग्य तो उपचार करून घेणे. गोठ्यात स्वच्छता राखणे तसेच दूध काढण्यासाठी पूर्ण हात पद्धतीचा वापर करणे जेणेकरून सडांना इजा होणार नाही. योग्य उपचारासाठी बाधित सडातील दुधाच्या नमुन्याची प्रतिजैविक संवेदनशीलता तपासणी प्रयोगशाळेत करून त्यानंतर पशुवैद्याकडून उपचार करून घेणे उपयुक्त ठरते.

६) घटसर्प
हा जिवाणूजन्य आजार पावसाळ्याच्या सुरवातीला जनावरांमध्ये आढळून येतो. आजाराची लागण झाल्यानंतर आजारी जनावरास भरपूर ताप येणे, तोंडाखाली घशाला भरपूर सूज येणे, तोंडातून लाळ गाळणे, श्वसनास त्रास होणे किवा उघड्या तोंडाने श्वास घेणे, श्वासोच्छवास सुरू असताना घरघर आवाज येणे, डोळे लालबुंद होणे ही प्रमुख लक्षणे आढळून येतात. आजाराची तिव्रता जास्त असल्याने तत्काळ योग्य उपचार न झाल्यास जनावर दगावण्याची शक्यता असते.
उपचार
आजारापासून जनावरांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी घटसर्प प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. आजारी जनावरांवर पशुवैद्याकडून तत्काळ उपचार करून घेणे गरजेचे ठरते.

७) तिवा
हा आजार विषाणूपासून होतो. विषाणूंचा प्रसार डासांपासून होतो. जनावरास अचानक ताप येतो, ते थरथर कापते. या आजाराचे विशेष लक्षण म्हणजे जनावर आलटून पालटून चारही पायावर किंवा कधी कधी एखाद्या पायावर लंगडू लागते. पाय, मान, पाठ डोळे इत्यादी अवयवांचे स्नायू आकुंचन पावतात. बसलेले जनावर जास्त वेळ बसून राहते किंवा उभे असलेले जनावर जास्त वेळ उभेच राहते.
उपचार
जनावरांस तापनाशक व वेदनाशामक औषधांचा डोस व इतर आवश्यक औषधोपचार पशुवैद्याच्या सल्ल्यानुसार द्यावा. गोठ्यातील तसेच परिसरातील डासांचा योग्य त्या पद्धतीने नायनाट करावा.

८) फाशी
हा जिवाणूजन्य आजार असून खूपच तीव्र व प्राणघातक असतो. जनावराला भरपूर ताप येतो व जनावर तत्काळ दगावते. शेवटच्या टप्प्यात किवा आजाराने मृत झालेल्या जनावरांत कान, नाक, तोंड, गुदद्वार, योनीमार्ग इत्यादी अवयवातून काळसर रक्तस्त्राव होतो. रक्तस्राव झालेले रक्त गोठत नाही.
उपचार
आजारावरील प्रतिबंधक लस दरवर्षी न चुकता टोचावी. आजाराचे लवकरात लवकर निदान झाल्यास पेनिसिलीन सारखी प्रतिजैविके पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार द्यावीत.

९) फुफ्फुसदाह
हा आजार जिवाणूजन्य असून काही प्रमाणात विषाणू व इतर घटक या आजारास कारणीभूत असतात. ऋतू बदलाच्या वेळी किंवा हिवाळ्यातील थंड वातावरणात या आजाराचा जनावरांत जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. आजारी जनावरात ताप येणे, नाकातून पाण्यासारखा किंवा चिकट द्रव स्त्रवणे, श्वसनाचा वेग वाढणे, ढासने, खाणे-पिणे कमी किवा बंद होणे ही लक्षणे प्रामुख्याने आढळून येतात.
उपचार
आजारी जनावराचे थंडीपासून संरक्षण करावे. हवेशीर ठिकाणी बांधावे जेणेकरून श्वसनास त्रास होणार नाही.

१०)) लाळ-खुरकूत
विषाणूपासून होणारा हा अतिशय संसर्गजन्य आजार असून गाय, म्हैस, शेळी, मेंढी, डुक्कर या सारख्या जनावरांना होतो. या आजारावर उपचार उपलब्ध नाहीत. सहा महिन्यांखालील वासरांना या आजाराची लागण झाल्यास मोठ्या प्रमाणात मरतूक होते. आजारी जनावरांना सुरवातीला ताप येतो, जनावरांचे चारा खाणे, पाणी पिणे बंद होते, रवंथ मंदावते. तोंडावाटे सतत लाळ गळते, जिभेवर, हिरड्यांवर पांढरे फोड येतात. शिवाय नखांच्या खुरात जखमा होतात आणि जनावर लंगडते. आजारातून बऱ्या झालेल्या जनावरांमध्ये प्रजननक्षमता घटने, दूध उत्पादकता घटने, बैलांमध्ये थोडे काम केले तरी धाप लागणे, पाठीवर केसांची जास्त वाढ होणे ही लक्षणे आढळून येतात. थोडक्यात आजारातून बऱ्या झालेल्या जनावरांची उत्पादकता मोठ्या प्रमाणात घटते.
उपचार
या आजारावर प्रतिबंधक लस उपलब्ध असून सहा महिन्यांतून एक वेळ लस टोचून घेणे आवश्यक आहे. तोंडात तसेच हिरड्यांच्या व खुरातील जखमा २ टक्के पोटॅशियम परमॅंगनेटच्या द्रावणाने दिवसातून दोन वेळा स्वच्छ धुवून तोंडातील जखमांवर बोरोग्लिसरीन तर खुरांतील जखमांवर ॲन्टीसेप्टिक औषधे तसेच बाजारात उपलब्ध असलेल्या वनस्पतीजन्य औषधांचा फवारा मारावा जेणेकरून जखमांवरील माश्यांचा प्रादुर्भाव टाळता येतो. पशुवैद्याकडून योग्य औषधोपचार करून घेतल्यास तोंडातील व खुरातील जखमा लवकर बऱ्या होण्यास मदत होते.
 
संपर्क ः डॉ. गजेंद्र भंगाळे, ९०४९७७५९७०
डॉ. रवींद्र जाधव, ९४०५३५५८१६
(पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

 

 

इतर कृषिपूरक
पशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...
जनावरांना द्या पुरेसा आहार, पाणीजनावरांना आपण गरजेनुसार पाणी देण्याऐवजी आपल्या...
दूध गुणवत्तावाढीसाठी सुप्त कासदाह टाळादुधाळ जनावरांमध्ये साधारणपणे १० ते १२ टक्के या...
सक्षम करा दुग्धव्यवसाय डेअरी हा व्यवसाय म्हणून पाहावा. त्याचे अर्थकारणही...
वाढत्या तापमानात गाई, म्हशींचे आरोग्य...सध्या काही भागांत प्रमाणापेक्षा उष्ण तापमान व...
खाऱ्या पाण्याचा जनावरांच्या आरोग्यावर...खारे पाणी जनावरांची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता...
भारतातील आधुनिक मधमाश्‍या पालनाचा इतिहासजागतिक मधमाश्‍या दिन विशेष भारतीय उपखंड हे...
तुती लागवडीत आच्छादन करा, संरक्षित पाणी...तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन...
शेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...
बैलामधील खांदेसूजीवर उपायउन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी, तसेच पावसाळ्याच्या...
कोकण कन्याळ शेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील...
शेळ्यांसाठी चारासाधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा...
लेप्टोस्पिरोसिसपासून जनावरांची काळजी...निरोगी जनावरांचा बाधित जनावरांशी संबंध, गोठ्यातील...
योग्य वेळी लसीकरण करा, आजार टाळाजनावरांतील आजारांच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शक...
नर रेडकांच्या संगोपनातून वाढवा नफा नर रेडकांचा व्यवस्थित सांभाळ करून, त्यांना योग्य...
पशू उपचारासाठी औषधी वनस्पती ठरताहेत...भारतात पुरातन काळापासून मानवी तसेच पशू उपचारासाठी...
जनावरांचे लसीकरण महत्त्वाचेपशुधन, पाळीव प्राणी व वन्यजीवांपासून अनेक रोग...
शेळ्यांची निवडशे ळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार...
पशुआहारावरील खर्च कमी करण्याचे उपायउन्हाळ्यात गाई, म्हशी व इतर जनावरांची भूक कमी...
जनावरातील मुतखड्यावर उपचारजनावरात मुतखडा झाल्यावर तो शस्त्रक्रियेने बरा...