पाच मिनिटांत एका एकरवर फवारणी ! व्हिडिअोसुद्धा..

एकलहरे (जि. नाशिक) ः येथील अजित खर्जुल यांनी विकसित केलेल्या ड्रोनद्वारे धोंडगव्हाण (ता. चांदवड) येथील सुकदेव जाधव यांच्या कांदा पिकावर फवारणी चाचणी केली.
एकलहरे (जि. नाशिक) ः येथील अजित खर्जुल यांनी विकसित केलेल्या ड्रोनद्वारे धोंडगव्हाण (ता. चांदवड) येथील सुकदेव जाधव यांच्या कांदा पिकावर फवारणी चाचणी केली.

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले पाहिजे, असे जो तो म्हणत असतो. आपल्या समस्या दुसऱ्यासमोर मांडताना दुसऱ्याने त्या सोडवल्या पाहिजेत, अशा दृष्टिकोन सर्वसामान्यांचा असतो. मात्र, अजित खर्जूल यानी ते स्वतःच प्रत्यक्षात आणण्याचा ध्यास घेतला. अडचणी आल्या तरी न डगमगता जिद्दीने फवारणीसाठीचा ड्रोन तयार केला आहे. केवळ पाच मिनिटांत एका एकर क्षेत्रावर अचूक फवारणी शक्य होते.   केवळ समाजमाध्यमांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान पाहण्याऐवजी आपल्या शेतात प्रत्यक्ष का वापरू नये, असा विचार त्यांच्या मनात आला. परदेशातून ड्रोन आयात करणे, त्याची परवानगी मिळवणे या दिशेने विचार केला तर सामान्य शेतकऱ्यांना ते परवडणारे नसल्याचे स्पष्ट झाले. मग सुरू झाला प्रवास, स्वतःच फवारणीसाठीचे ड्रोन तयार करण्याचा. ही गोष्ट आहे एकलहरे (ता. जि. नाशिक) येथील सामान्य कुटुंबातील अजित बबनराव खर्जुल या तरुण शेतकऱ्याची. ड्रोन निर्मितीसाठी अगदी व्याजानेही पैसे घेत आपला ध्यास पूर्ण केला.   अजित खर्जुल यांनी तयार केला फवारणीसाठी ड्रोन (Video : Subhash Purkar) अजित खर्जुल यांचे शिक्षण फक्त दहावी. त्यांच्याकडे पाच एकर शेती असून, गत १२ वर्षांपासून शेती करताना द्राक्ष आणि कांदा पीक घेतात. शेतीसाठी उपयुक्त म्हणून पुढे त्यांनी मुक्त विद्यापीठातून कृषी पदविकाही घेतली. रोगांपासून द्राक्ष बागेचे संरक्षण करणे ही अत्यंत अटीतटीची बाब असते. अर्ली छाटणीच्या काळातही १५ ते २० सप्टेंबरपर्यंत पाऊस येत असतो. अशा स्थितीमध्ये बागेतून ट्रॅक्टर चालणे अवघड होते. मग फवारणीची अडचण निर्माण होते. त्यातून ड्रोनद्वारे फवारणीची कल्पनेचा पाठपुरावा सुरू केला. वेगवेगळी आरेखने तयार केली. त्यानुसार काही भाग नाशिक येथील औद्योगिक वसाहतीतून बनवून घेतले, तर काही आधुनिक तंत्रज्ञानयुक्त भाग विदेशातून मागवून घेतले. त्यातही ॲल्युमिनिअम, ग्लास फायबर, कार्बन फायबर अशा विविध घटकांच्या चाचण्या केल्या. अडिच वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून वजनाला हलके तरीही टिकाऊ, सक्षम असे ड्रोन तयार केले. सुरवातीला स्वतःच्या शेतात सोयाबीन आणि गहू पिकामध्ये चाचण्या घेतल्या. सध्या द्राक्ष, डाळिंब बागेमध्ये धुरळणीच्या चाचण्या घेण्याचे काम सुरू आहे. क्षमता

  • खर्जूल यांनी सध्या पाच व दहा लिटर क्षमतेचे ड्रोन तयार केले.
  • ड्रोनची क्षमता वाढवण्यासाठी मोटर आणि प्रोपेलरची संख्या वाढवली जाते.
  • एकदा चार्ज केल्यानंतर १५ मिनिटेपर्यंत फवारणी करते.
  • एक एकर क्षेत्रासाठी द्रावणाच्या प्रमाणानुसार पाच मिनिटांपर्यंत फवारणी होते.
  • अशी होते फवारणी

  • ड्रोनमध्ये फवारणीचा सर्व कार्यक्रम साठवला आहे. रिमोट किंवा मोबाईलद्वारे सूचना देऊन ड्रोनचे नियंत्रण करता येते. किंवा जीपीएस प्रणालीद्वारे शेताचे चार कोपरे मार्क करून दिले जातात, त्याच्या आत ड्रोन फवारणी पूर्ण करते.
  • क्षेत्र मोठे असल्यास फवारणीचे द्रावण संपल्यानंतर परत जागेवर येते. त्यात द्रावण भरून दिल्यानंतर उर्वरीत फवारणी कोणतीही सूचना न देता पूर्ण करते. असे पुन्हा-पुन्हा करता येते.
  • फायदे

  • अचूक, समप्रमाणात फवारणी होते.
  • मानवी हस्तक्षेप नसल्याने कीडनाशकांच्या विषारीपणांचे परिणाम शेतकऱ्यांवर होणार नाहीत.
  • पिकांच्या उंचीनुसार फवारणीसाठी आपोआप जुळवून घेतो.
  • कमी वेळात फवारणी होत असल्याने वातावरणात बदल होत असतानाही त्वरित फवारणी पूर्ण करता येते.
  • द्रावण फवारणीचा दर आपल्या गरजेनुसार कमी जास्त करता येतो.
  • एका चार्जिंगमध्ये १५ मिनिटे चालते. तेवढ्या वेळात तीन एकरपर्यंतची फवारणी पूर्ण करता येते.
  • पारंपरिक पद्धतीने शेती करण्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञान शेतात वापरण्याचे स्वप्न होते. यंत्राच्या निर्मितीचा खर्च वाढत गेल्याने अगदी कर्ज काढावे लागले तरी डगमगलो नाही. स्वतःवर विश्‍वास ठेवला म्हणूनच फवारणीचा ड्रोन बनवू शकलो. सध्या त्याच्या चाचण्या द्राक्ष, डाळिंब पिकामध्ये घेऊन अधिक अचूकता आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संपर्क : अजित खर्जुल, ९९२२२२९५५५  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com