सुक्या चाऱ्याची निर्मिती, साठवणूक, प्रक्रिया

जनावराची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी उपलब्ध चाऱ्याची पौष्टिकता व पाचकता वाढविणे आवश्यक आहे
जनावराची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी उपलब्ध चाऱ्याची पौष्टिकता व पाचकता वाढविणे आवश्यक आहे

अधिक वैरणीचा मुरघास करून किंवा सुकवून साठवून ठेवावा. उपलब्ध चारा व शेतातील पिकांचे अवशेष जसे- वाळलेले गवत, गव्हाचे काड, भाताचा पेंढा, तूर व हरभऱ्याचा भुसा, सोयाबीन कुटार, वाळलेली वैरण इत्यादींची योग्य रीतीने साठवणूक करावी. उपलब्ध चाऱ्याची पचनीयता व पौष्टिकता वाढवण्यासाठी त्यावर विविध प्रक्रिया कराव्यात.   दुष्काळी परिस्थितीत चाऱ्याची उपलब्धता कमी होते, तसेच उपलब्ध चाऱ्याची पौष्टिकतासुद्धा कमी होते व चाऱ्याच्या किमती भरमसाट वाढतात, त्यामुळे पशुधन सांभाळणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. पशुधनाच्या उत्पादकतेवर दूरगामी परिणाम होत असतात, अशा परिस्थितीत चाऱ्याचा व पशुखाद्याचा खर्च आटोक्यात ठेवणे जेवढे गरजेचे आहे, तेवढेच त्याची पौष्टिकता वाढविणेसुद्धा अत्यंत गरजेचे असते. सुक्या चाऱ्याची निर्मिती व साठवणूक

  • शेतीतील पिकांच्या वाळलेल्या अवशेषांना सुका चारा म्हणून संबोधले जाते व त्याचाच सर्रास वापर केला जातो; परंतु पीक ५० टक्के फुलोऱ्यात आल्यावर, त्याची कापणी करून त्यातील जास्तीत जास्त पोषक मूल्ये व हिरवा रंग टिकवून ठेवण्यासाठी, सावलीत वाळवलेला चारा म्हणजे सुका चारा होय.
  • पावसाळ्यात उपलब्ध अतिरिक्त चारा जो मुरघास करण्यास योग्य नाही, जसे की द्विदल चारा पिके किंवा पिकांचे अवशेष यांचा सुका चारा तयार करण्यासाठी तो कापून दोन ते तीन दिवस शेतातच पातळ थर देऊन सुकू द्यावा.
  • शेतात चारा सुकताना दोन- तीन वेळा वर- खाली करावा. चाऱ्यातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानंतर असा चारा पातळ थर करून सावलीत जमिनीवर किंवा रॅकवर वाळू घालावा. अशा प्रकारे योग्य रीतीने हिरव्या रंगाचा सुका चारा तयार होईल. त्याच्या गासड्या बांधून किंवा पेंढ्या बांधून साठवणूक करता येईल.
  • यात जास्तीत जास्त पोषक घटक असतील, तसेच चारा साठवताना त्याच्या पानांचा ऱ्हास होणार नाही. लसूणघास, बरसीम अशा द्विदल चाऱ्याचा सुका चारा बनविल्यास पचनीय तंतुमयपदार्थाशिवाय जनावरांसाठी तो प्रथिनांचाही एक उत्तम स्रोत ठरेल, त्यामुळे केवळ दुग्धोत्पादन न वाढता दुधातील स्निग्धांश व एसएनएफमध्येही भरघोस वाढ होते.
  • सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध असलेल्या सर्वच प्रकारच्या सुक्या व निकृष्ट चाऱ्यावर, जसे की गव्हाचे काड/गौंडा, सोयाबीन कुटार, तूर- हरभरा भुसा, वळलेली वैरण/ कडबी, काही प्रसंगी उसाचे चिपाड यांच्यावर खालील प्रक्रिया केल्यास दुष्काळातही पशुधन केवळ जगाविण्यापलीकडे त्याची उत्पादकता टिकून किफायतशीर दुग्धव्यवसाय केला जाऊ शकतो. १) सुक्या तसेच निकृष्ट चाऱ्याचे खाण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रक्रिया

  • सुका तसेच निकृष्ट चारा जनावरे आवडीने खात नाहीत, त्यासाठी अशा चाऱ्याची कुट्टी करून घेऊन, त्यावर १ किलो मीठ १० लिटर पाण्यात विरघळवून १०० किलो चाऱ्यावर फवारावे किंवा त्याची पोषकता, तसेच खाण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी १ किलो मीठ, १ किलो गूळ किंवा मळी १० लिटर पाण्यात विरघळवून १०० किलो चाऱ्यावर फवारावे.
  • असा प्रक्रिया केलेला चारा १२ तासांनी जनावरांना खाऊ घालावा; परंतु उत्पादकतावाढीसाठी किंवा दुष्काळात ती टिकवून ठेवण्यासाठी चारा जनावराच्या केवळ पोटात जाऊन भागत नाही, तर त्याची पौष्टिकता व पाचकतासुद्धा वाढवली पाहिजे.
  • २) पिकांचे निकृष्ट अवशेष सकस करण्यासाठी युरिया प्रक्रिया शेतातील पिकांचे अवशेष हे सर्रास जनावरांना खाऊ घातले जातात किंवा जाळून टाकले जातात. त्यात प्रथिनांचे प्रमाण कमी असते आणि न पचणाऱ्या तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असते. असा चारा पौष्टिक नसतो व पचनासही अवघड असतो; परंतु अशा निकृष्ट चाऱ्यावर साठवताना युरिया व गुळाची प्रक्रिया केल्यास चाऱ्याचा सकसपणा व पचनीयता वाढविता येते. दुष्काळी परिस्थितीशी झगडण्यासाठी तो चारा एक उपयुक्त साधनसामग्री म्हणून वापरता येतो. प्रक्रियेसाठी आवश्यक घटक व त्यांचे प्रमाण

  • वाळलेला चारा (उदा. गव्हाचे काड, वैरण, कडबी यांची कुट्टी, वाळलेले गवत, भाताचा पेंढा, सोयाबीन, हरभरा, तूर यांचे कुटार) ः १०० किलो
  • युरिया ः २ किलो
  • गूळ किंवा मळी ः १ किलो
  • क्षार मिश्रण ः १ किलो
  • खडे मीठ ः १ किलो
  • पाणी ः लिटर
  • महत्त्वाची टीप ः वरील सर्व घटक मोजून घ्यावेत, अंदाजे घेऊ नयेत.
  • प्रक्रियेची कृती

  • वाळलेल्या चाऱ्याची कुट्टी करून घ्यावी.
  • शंभर किलो चाऱ्यासाठी २ किलो युरिया २० लिटर पाण्यात विरघळून घ्यावा.
  • तयार झालेल्या मिश्रणात १ किलो मीठ व १ किलो गूळ मिसळून एकजीव करावे.
  • फरशीवर किंवा टणक जागेवर चाऱ्याच्या कुट्टीचा थर पसरवून त्यावर हे द्रावण शिंपडवून त्यावर क्षार मिश्रण टाकावे. कुट्टी वर-खाली करून चांगले मिसळावे.
  • कुट्टीचा असा मिसळलेला थरावर थर देऊन व्यवस्थित दाबून त्यातील हवा बाहेर काढून टाकावी, त्यावर प्लॅस्टिकचा कागद झाकून त्याला मुरघास बॅगमध्ये भरून हवाबंद करावे.
  • एकदा हवाबंद केलेला ढीग २१ दिवस हलवू किंवा उघडू नये. त्यानंतर प्रक्रिया केलेली वैरण सोनेरी पिवळ्या रंगाची होऊन खाण्यास योग्य तयार होते व तिची पौष्टिकता वाढलेली असते.
  • संपर्क ः डॉ. सचिन रहाणे, ७०३८५३५१८१ (पशुधन विकास अधिकारी तथा सदस्य, चारा साक्षरता अभियान, समन्वय समिती, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com