द्राक्ष पिकाची गरज ओळखून पाणी व्यवस्थापनाक

द्राक्ष पिकाची गरज ओळखून पाणी व्यवस्थापनाक
द्राक्ष पिकाची गरज ओळखून पाणी व्यवस्थापनाक

शेतकरी : हेमंत पिंगळे, लखमापूर, ता. दिंडोरी, जि. नाशिक   गेल्या १७ वर्षांपासून मी द्राक्ष शेती करत असून, निश्चित उत्पादनासाठी सातत्याने नवे प्रयोग करताे. द्राक्ष पिकामध्ये अन्य सर्व व्यवस्थापन काळजीपूर्वक होत असले तरी पाणी व्यवस्थापनाकडे अनेक वेळा दुर्लक्ष होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पाणी व्यवस्थापनाकडे गांभीर्याने पाहू लागलो.  

बागेतील पाण्याची गरज ः बऱ्याच वेळा बागेला पाणी किती द्यावे, हा प्रश्न माझ्यासमोर असे. ठिबक असले तरी द्राक्ष वेलीच्या मुळांचे कार्यक्षेत्र पूर्ण भिजवण्याविषयी कायम जागरूक राहतो. विजेच्या भारनियमनामुळे सिंचनाचे वेळापत्रक पाळण्यात अडचणी येत. त्यावर मात करण्यासाठी संपूर्ण क्षेत्रासाठी ॲटोमायझेशन करून घेतले. बागेत दिलेले पाणी झिरपून आणि पाझरून पसरते. सुरवातीला कमी डिस्चार्जचे ड्रीपर वापरले होते. त्याद्वारे पाणी अतिशय सावकाश मुळांच्या कार्यक्षेत्रामध्ये पसरत असे. मात्र, अधिक खोलीपर्यंत पोचत नव्हते. साहजिकच एक, दोन वर्षे कमी उत्पादनाचा फटका सहन करावा लागला.  एकाच क्षेत्रामध्येही जमिनीचे प्रकार वेगवेगळे असू शकतात. आमच्या बागेतही कुठे काळी, तर कुठे मुरमाड असा प्रकार होता. त्यासाठी प्रत्येक ओळीसाठी दोन लॅटरल लावले आहेत. मुळाचे कार्यक्षेत्र व्यवस्थित व वेळेमधे भिजवण्याचा विचार करून प्लॉटनुसार ड्रिपरचा डिस्चार्ज निवडला आहे. बागेमध्ये वाफसा स्थिती ठेवण्याला प्राधान्य असते. विश्रांती काळात मोकळे पाणी भरणे ः द्राक्षाची काढणी होईपर्यंत बाग प्रामुख्याने ठिबक सिंचनावर सांभाळलेली असते. विश्रांतीच्या काळात बागेस मोकळे पाणी दिले जाते. त्यामुळे एप्रिल छाटणीवेळी बाग एकसारखी फुटण्यास मदत होत असल्याचा अनुभव आहे. 

एप्रिल छाटणीनंतर पाणी नियोजन सर्व क्षेत्र इनलाइन ड्रीपर व अॅटोमायजेशनअंतर्गत आहे. त्यावर द्राक्ष वेलीचे वय, वाढीची अवस्था यानुसार काटेकोर पाणी नियोजन करतो. पिकामध्ये मशागतीची कामे करतानाही आवश्यकतेनुसार जागरूकतेने पाणी कमी, अधिक केले जाते. बाग एकसारखी फुटण्यासाठी ः एप्रिल छाटणीवेळी बाग एकसारखी फुटून यावी, यासाठी खरड छाटणीपासून ३ ते ५ पानांच्या अवस्थेपर्यंत बागेत भरपूर पाणी दिले जाते. या काळात तापमान वाढलेले असल्याने पाणी कमी पडल्यास फुटीच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. गर्भधारणा आणि पाणी नियोजन ः सर्व बागा रुटस्टॉकवर असल्याने सबकेन करावी लागतात. सबकेन फुटून येईपर्यंत बागेत गरजेनुसार पाणी दिले जाते. सबकेननंतर पाणी अतिशय कमी केले जाते. कारण  जास्त पाण्यामुळे फुटीचा जोर वाढून गर्भधारणा कमी होणे किवा  पेऱ्यातील अंतर वाढणे असे प्रकार घडू शकतात. शेंडा टॅपिंगनंतर पाणी व्यवस्थापन ः सबकेन काडी ९ /१० पानावरती शेंडा बंद केला जातो. त्यामुळे काडीची जाडी चांगली मिळते. पुढे पाऊस पडेपर्यंत बागेत गरजेनुसार पाणी दिले जाते. त्यातून चांगला घड तयार होऊन पोसला जातो.                 संपर्क : हेमंत पिंगळे, ९८५०२२६६७१  (शब्दांकन : संदीप मोगल, लखमापूर)                   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com