परिस्थितीशी हार न मानता शेतीसह आयुष्यही फुलवले 

शेतीतून प्रगती आज तीन मुलींची लग्ने थाटामाटात करूनदेण्यापर्यंतचे यश कोद्रे दांपत्याने मिळवले आहे.पापड तयार करण्याचे यंत्र व पीठ दळण्यासाठी छोटी चक्की घेतली आहे. गायीसोबत म्हैस घेतली.घरी बियाणे बॅंकही तयार केली आहे
गुणवंत व नंदा कोद्रे दांपत्याची भाजीपाला शेती
गुणवंत व नंदा कोद्रे दांपत्याची भाजीपाला शेती

घरची चांगली आर्थिक स्थिती भक्कम असेल, तर पुढील पिढीला करावा लागणारा संघर्ष कमी असतो.  पण शून्यातून विश्व तयार करण्यासाठी अनेकांना जिवाचे रान करावे लागते. तांदूळवाडी (ता. जि. लातूर) येथील कोद्रे दांपत्याने जिवापाड कष्ट घेत शेतीसह विविध व्यवसायांचा आधार घेतला. परिस्थितीपुढे हार मानली नाही. आज केवळ अडीच एकर शेती असूनही जिद्दीने आपले अर्थकारण सुधारत आयुष्य सुखी- समाधानी करण्याचा प्रयत्न केला आहे.  दररोज हातपाय नाही हलवले तर एकवेळची चूलही पेटणार नाही, अशी परिस्थिती असते. दररोज वेगवेगळी आव्हाने पेलायला त्यांना सज्ज राहावे लागते. त्यातही शेती अत्यंत कमी, पाणीटंचाई अशा समस्या असतील तर मग बोलायलाच नको. शेतातील इंचन इंच जागेतून उत्पन्न घेण्याची त्यांची धडपड सुरू असते; पण सर्व संघर्षातून आशावादी राहाणाऱ्या, हेही दिवस बदलतील, अशी भावना ठेवून असणाऱ्या, अपयशाची तमा न बागळता प्रयत्नशील राहणाऱ्यांची यशकथा होते.  कोद्रे दांपत्याचा संघर्ष  लातूरपासून सुमारे सोळा किलोमीटरवर असलेल्या तांदूळवाडी येथील गुणवंत व नंदा या कोद्रे दांपत्याच्या जिद्दीची अशीच कहाणी आहे. गुंफावाडी येथील नंदा यांचे तांदूळवाडी येथील गुणवंत यांच्याशी लग्न झाले. नव्याचे नऊ दिवस संपते ना संपते नंदा यांना शेतीच्या कामाला जुंपावे लागले. खुरपणी, धस्कटे वेचणे, खत, बी पेरणे, जळणफाटा, वैरण यात आला दिस मावळायचा. शेती केवळ अडीच एकर. त्यातून सारा उदरनिर्वाह करणे शक्य नव्हते. मग गुणवंत सालगडी म्हणून तब्बल सोळा वर्षे दुसऱ्यांच्या शेतात राबले. घरच्या शेतीतही दोघांनी शेतात एकही मजूर न ठेवता भाडेतत्त्वावर बैल घेत  शेती केली.  उत्पन्नाचे स्राेत वाढवले  कष्ट आणि ओढाताण सुरूच होती. सात मुलींची शैक्षणिक व कौटुंबिक जबाबदारी दांपत्यापुढे होती. मग नंदा यांनी पापड, नकुले, रेवड्या, शेवया व्यवसाय सुरू केला. शिलाई यंत्राद्वारे कपडे शिवून देण्याचे काम केले. एक-दोन वर्षे नव्हे तर हा व्यवसाय बारा वर्षे केला. आता मुली हे काम करतात. शेतातच घर थाटले. शेतातली कामे सकाळपासून अंधार पडेपर्यंत करता येऊ लागली. दरम्यानच्या काळात नंदा गावातील महिला बचत गटात सामील झाल्या.  शेतीचा विकास  शेताशेजारून कॅनॉल गेल्याने ‘लिफ्ट’द्वारे पाणी घेता येईना. मोटा घेणे गरजेचे होते. मग गावरान कोंबडीपालन सुरू केले. त्यांची संख्या वाढवत शंभरवर गेली. बाभूळ, बेल, आंबा, रामफळ, सीताफळ अशी झाडे होती; पण पुढे भांडवलासाठी पैशाची निकड होती. बोअर घेऊन मोटर घेण्यासाठी सगळ्या कोंबड्या विकाव्या लागल्या. त्यानंतर भाजीपाला शेती सुरू केली. आज दीडएकर ऊस, अर्धा एकर सोयाबीन व उर्वरित जागेत वांगी, भेंडी, टोमॅटो, कोबी, मेथी, पालक, कोथिंबीर, चुका, शेपू, चवळी, दोडके, कारले अशी भाजीपाला पिके आलटून पालटून घेण्यात येतात. हंगामनिहाय जवस, कारळे, तीळ अशी पिकेही घेत उत्पन्नाला हातभार लागू लागला.  सेंद्रिय शेतीवर भर  भाजीपाला शेतीचा खर्च कमी करण्यासाठी कृषी विभागाच्या ‘आत्मा’ योजनेंतर्गत सेंद्रिय शेतीवर भर दिला. घराच्या एका गायीच्या शेणापासून स्लरी, जीवामृत, बीजामृत तयार करण्यास सुरवात केली. दशपर्णी अर्क, गांडूळखत, व्हर्मीवॉश आदींचा वापर सुरू केला.  बाजारात थेट विक्री  गुणवंत शेतीची जबाबदारी पाहतात; तर नंदा एकाड एक दिवस आठवडे बाजारात जाऊन मालाची थेट विक्री करतात. लातूरव्यतिरिक्त अन्य ठिकाणी गुणवंत यांची त्यांना सोबत असते. हंगामात दररोज सुमारे ५० किलोपर्यंत माल विक्रीसाठी नेला जातो. त्यातून सुमारे एक हजार, बाराशे रुपये हाती येतात.  गुणवंत लातूर येथील एका दुग्धव्यवसाय कंपनीत रात्रीची नोकरीही करतात.  मुलाची कसर मुलींनी भरून काढली  घरी मुलींनी शाळा, महाविद्यालय सांभाळून कुरडया, ज्वारी, तांदळाच्या पापड्या, रेवड्यानिर्मितीला मदत केली. आई-वडिलांना त्या प्रत्येक कामात मदत करतात. खुरपणी, भाजीपाला काढणी, पाणी देणे, चारापाणी, वैरण, कापणी अशा सर्व कामांत त्या तरबेज झाल्या आहेत. दांपत्याला मुलाची कमतरता कधीच भासत नाही.  शेतीतून प्रगती  आज तीन मुलींची लग्ने थाटामाटात करून देण्यापर्यंतचे यश कोद्रे दांपत्याने मिळवले आहे. पापड तयार करण्याचे यंत्र व पीठ दळण्यासाठी छोटी चक्की घेतली आहे. गायीसोबत म्हैस घेतली. घरी बियाणे बॅंकही तयार केली आहे. दरम्यान, स्वयंशिक्षण प्रयोगाच्या सौ. अनिता साबळे यांनी परिसरातील महिलांना एकत्र करून अनन्या शेतकरी महिला बचत गटाची स्थापना केली.  मुलीच्या लग्नासाठीही नंदा यांनाही गटातून मदत घेतली. पुढे वेळेवर परत केली.  अर्थकारण सुधारले  शेतात बांधावर व गोठ्याशेजारी शेवगा, सीताफळ, रामफळ, आंबा, आवळा, लिंबोणी, बेल, जांभूळ, पपई, कडीपत्ता अशी झाडे लावली आहेत. त्यातून उत्पन्न घेतले जातेय. नंदा यांनी मांजरा कृषी विज्ञान केंद्रातर्फे सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण घेतले आहे. यंदा त्यांनी बारा हजार रुपयांची बेलपत्री लातुरात नेऊन श्रावण महिन्यात विकली. भाजीपाला शेती, शिलाई, लघुउद्योग, डाळ, पापड, बियाणे आदींच्या विक्रीतून चांगले उत्पन्न मिळते. त्याव्यतिरिक्त ऊस, सोयाबीन, मूग, उडीद, कांदे यातूनही काही रक्कम शिल्लक पडते. सर्व मिळून आता अर्थकारण सुधारले आहे. शेतात एकाही मजुराचा आधार घेण्याची वेळ आलेली नाही. अल्पभूधारक असले तरी परिस्थितीपुढे हार न मानता धीराने तोंड देत तसेच एक पैसाही कर्ज न काढता या दांपत्याने आपले आयुष्य उभे केले आहे. हरहुन्नरी जिगरबाज पत्नीची साथ असल्यानेच  गुणवंत यांनाही शेतीचा भार हलका करणे शक्य झाले आहे. पूर्वी शेतातले पत्र्याचे झोपडे होते.  आता गावात दोन खोल्यांचे टुमदार घर बांधले आहे. तांदूळवाडीतील महिला विविध प्रशिक्षणांसाठी वा सहलीसाठी दौरे करतात. अनुभव घेऊन स्वतः बदल घडवून घराला पुढे नेण्याचे व मुलांना शिकवून चांगले संस्कार घडवण्याचे काम करताहेत. 

(लेखक लातूर येथील निवृत्त कृषी अधिकारी आहेत.)

संपर्क- गुणवंत कोद्रे-  ९९२१५४११६३ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com