agriculture story in marathi, feed and shelter management of calf | Agrowon

वासरांसाठी योग्य अाहार, संगोपन पद्धती
डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. वैभव कदम
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

वासराचा जन्म झाल्यानंतर त्याचा श्‍वासोच्छ्वास सुरू आहे किंवा नाही पाहावे. वासराची नाळ योग्य अंतरावर कापावी. वासरांना त्यांच्या वजनाच्या १/१० इतका चीक दिवसातून विभागून पाजावा. जन्मल्यापासूनच गायी/म्हशीपासून वेगळे करून आणि कृत्रिम पद्धतीने वासराचे संगोपन करणे फायद्याचे ठरते.

वासराचा जन्म झाल्यानंतर त्याचा श्‍वासोच्छ्वास सुरू आहे किंवा नाही पाहावे. वासराची नाळ योग्य अंतरावर कापावी. वासरांना त्यांच्या वजनाच्या १/१० इतका चीक दिवसातून विभागून पाजावा. जन्मल्यापासूनच गायी/म्हशीपासून वेगळे करून आणि कृत्रिम पद्धतीने वासराचे संगोपन करणे फायद्याचे ठरते.

वासराची काळजी वासरु गर्भाशयात असतानाच सुरू करावी लागते. जन्म होण्याच्या अगोदर वासरू त्याच्या आईच्या गर्भाशयात असते. तिथे त्याची गर्भरूपात हळूहळू वाढ होत असते. गाईचा गाभण काळ सरासरी २८० दिवस तर म्हशीचा ३१० दिवस असतो. गर्भाची वाढ गर्भधारणा झाल्यापासून पहिले सहा महिने अतिशय मंद गतीने होत असते. परंतु गर्भारपणाच्या सहाव्या, अठव्या आणि नवव्या महिन्यात मात्र गर्भाची वाढ अतिशय झपाट्याने होते.
या काळात गर्भाच्या योग्य वाढीसाठी गाईला किंवा म्हशीला उत्तम प्रतीचा हिरवा चारा व चांगल्या प्रकारचा खुराक द्यावा लागतो. शेवटच्या तीन महिन्यांत पुरेशा प्रमाणात कॅल्शियम, स्फुरद आणि जीवनसत्त्व "ड' मिळाले नाही, तर जन्मलेले वासरू अशक्त दिसते. त्याचप्रमाणे गाईला हिरवा चारा मिळाला नाही, तर जीवनसत्त्व "अ'ची कमतरता भासते. त्यामुळे जन्मलेले वासरू आंधळे असू शकते. अथवा पुढे त्यास रातांधळेपणा होऊ शकतो.

वासरू जन्मल्यानंतर घ्यावयाची काळजी
१. वासराचा श्वासोच्छ्वास तपासणे

 • वासराचा जन्म झाल्यानंतर त्याचा श्‍वासोच्छ्वास सुरू आहे किंवा नाही पाहावे. वासरू श्‍वासोच्छ्वास करीत नसेल तर त्वरिच त्याच्या नाका तोंडातील बळस (चिकट पदार्थ) बोटाने काढून टाकावा. म्हणजे नाकपुड्या स्वच्छ व मोकळ्या होतात.
 • नाकातील बळस निघून श्‍वासोच्छ्वास सुरळीत होण्यासाठी वासराचे मागचे पाय पकडून उलटे पकडावे व हवेत एका हातातून दुसऱ्या बाजूस असे हलवावे. जर वासरू श्‍वासोच्छ्वास करू शकत नसेल, तर त्याला कृत्रिम पद्धतीने श्‍वासोच्छ्वास द्यावा. पाठीवर झोपवून त्याचे पुढील पाय मागे पुढे करावेत. आणि त्याच्या छातीवर दोन्ही हाताच्या तळव्याने थोडासा दाब द्यावा व चोळावे. असे केल्याने वासराचा श्‍वासोच्छ्वास चांगल्या पद्धतीने सुरू होतो.

२. वासराचे अंग कोरडे करणे
जन्मलेल्या वासराच्या अंगावर चिकट व पातळ असा पदार्थ चिकटलेला असतो. वासराचा जन्म झाल्याबरोबर गाय वासराचे अंग चाटून स्वच्छ करते. किंवा एक स्वच्छ कपडा घेऊन वासराचे अंग कपड्याने घासून स्वच्छ व कोरडे करावे. असे केल्याने वासराची रक्ताभिसरण क्रिया योग्यरीत्या सुरू राहते. वासराला थंडी वाजणार नाही.

३. वासराची नाळ कापणे
जन्मतः वासराची नाळ ओली असते. नाळ न ओढता हळूच बेंबीपासून २ इंच लांबीवर स्वच्छ अशा कात्रीने/ब्लेडने कापून काढावी. उरलेल्या २ इंचांवर निर्जंतुक दोरा/धागा बांधावा आणि दुमडलेल्या भागावर आयोडीन लावावे त्यानंतर नाळ निर्जंतूक कात्रीने/ब्लेडने कापून घ्यावी. नाळ वाळून आपोआप गळते. सुरवातीला नाळ ओली असल्याने त्यामधून रोगाजंतू वासराच्या शरीरात प्रवेश करतात व वासरू आजारी पडते.

४. वासराला गाईचा चीक पाजणे

 • वासराला गाईला पहिला चीक जन्मल्यानंतर पहिल्या दोन तासाच्या आत पाजावा. कारण या काळात चिकातील संरक्षक तत्त्वे लवकर शोषली जातात. चिकामुळे वासराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
 • वासरांना त्यांच्या वजनाच्या १/१० इतका चीक दिवसातून विभागून पाजावा.
 • वासरू जन्मल्यानंतर एक ते दीड तासात उभे राहून चीक पिण्याचा प्रयत्न करते. वासरू गाईच्या सडातील चीक पिऊ शकत नसेल तर चीक काढून घेऊन वासराला पाजावा.
 • चिकामध्ये अ जीवनसत्त्वाचे प्रमाण सामान्य दुधापेक्षा १० ते १५ पट अधिक असते. चिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण सामान्य दुधापेक्षा ५ ते ७ पट अधिक असते. खनिज द्रव्ये, तांबे, लोह, मॅग्नेशियम अणि कॅल्शिअसमचे प्रमाण अधिक असते.
 • वासरांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार करणाऱ्या अवयवांची वाढ झालेली नसते. त्यामुळे त्यांच्या शरीरात रोगप्रतिकार शक्ती पुरेशी तयार होत नाही.
 • वासरांना पहिल्या तीन महिन्यांसाठी पुरेशी रोगप्रतिकाशक्ती केवळ चिकामधूनच मिळते. त्यामुळे पुरेसा चीक निश्‍चित पाजावा.

वासरांच्या संगोपनपद्धती
१. पारंपरिक संगोपन अथवा मातृत्व पद्धत
वासराला जन्मल्यापासून आईचे दूध पिण्यास गाईसोबत सोडतात. गायीचे दूध काढण्याच्या वेळी वासरू सोडतात. वासरू सोडण्यामुळे गाय पान्हा सोडते. वासराला थोडा वेळ गाईचे दूध पिऊ देतात आणि लगेच बाजूला करून वासराला बांधून ठेवतात. त्यानंतर दूध दोहन पूर्ण केले जाते. यानंतर परत वासरास मोकळे सोडून दूध पिऊ दिले जाते. यामध्ये बहुतेक वासरांसाठी एका सडातील दूध ठेवले जाते आणि तीन सडांतील दूध पूर्णपने काढले जाते. या पद्धतीमध्ये स्वच्छ दूध उत्पादनात अडथळा येतो.
दूध जास्त पिल्यामुळे वासराला अपचनाचा त्रास होतो. दूध कमी पिल्यामुळे वासरू उपाशी राहते. वासरू नसल्यास गाई दूध देत नाहीत. वासराला पुरेसे दूध मिळते का नाही याचा अंदाज या पद्धतीमध्ये येत नाही.

२. दाई पद्धत

 • वासराला जन्मल्यापासूनच गायी/म्हशीपासून वेगळे करून आणि कृत्रिम पद्धतीने म्हणजे बाटलीने किंवा तोटी असलेल्या छोट्या भांड्याने दूध पाजतात.
 • या पद्धतीत वासराला आवश्‍यकतेनुसारच दूध पाजता येते.
 • स्वच्छ दूधनिर्मिती करता येते.
 • वासरू नसले तरी गाई दूध देतात. अपचन होत नाही.
 • आर्थिकदृष्ट्या ही पद्धत परवडणारी आहे.
 • या पद्धतीत वासरे चांगली वाढतात. निरोगी राहतात. फक्त एकच काळजी घ्यावी लागते आणि ती म्हणजे दूध पाजतेवेळी दुधाचे तापमान वासराच्या शरीराएवढे ठेवून पाजावे.
 • स्वच्छतेचे काटेकोर पालन करणे आवश्‍यक आहे.
 • दूध पाजून झाल्यानंतर लगेच भांडे गरम पाण्याने स्वच्छ धुऊन कोरडे करावे. त्यामुळे भांड्यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होणार नाही.
 • वासराचे तोंड दूध पाजतेवेळी चिकट झाल्यास पाण्याने स्वच्छ करावे. अन्यथा चिकटपणामुळे मुंग्या तोंडावर फिरतात.
 • दूध वरून पाजतेवेळी वासराला ठसका लागणार नाही याची काळजी घ्यावी. कारण दूध पाजतेवेळी जर ठसका लागला तर दूध फुफ्फुसामध्ये जाऊन फुफ्फुसदाह होण्याची शक्‍यता असते.
 • जन्मल्यानंतर वासरांना नंबर द्यावेत. त्यासाठी अनेक पद्धती आहेत. वासराच्या गळ्यात पत्र्याचा बिल्ला तयार करून दोरीत बांधावा. याशिवाय वासराच्या कानाच्या आतील भागावर नंबरचा बिल्ला मारावा.
 • वासराची शिंगे काढावीत. शींगकळ्या जाळण्यासाठी कॉस्टिक पोटॅश किंवा कॉस्टिक सोड्याच्या कांड्या शिंगकळीवर फिरवल्यास कळी जळून जाते. शिंगे काढल्यामुळे भविष्यात होणाऱ्या इजा, शिंगाचा कर्करोग या समस्या टाळता येतात.

संपर्क ः डॉ. वैभव कदम, ९०९६५८२००४
(पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

इतर कृषिपूरक
पशुसल्लावाढत्या तापमानात जनावरांच्या आहार...
प्रजननक्षमता सक्षम करण्यासाठी...सुयोग्य व समतोल आहारातून जनावरांना ऊर्जा, प्रथिने...
जनावरांमध्ये प्रसूतीनंतर येणाऱ्या समस्याजनावर गाभण असताना व विताना जर व्यवस्थित लक्ष दिले...
प्रक्रियेमुळे वाढेल ऊस वाढ्याची...वाढ्यातील आॅक्झलेट या घटकामुळे जनावराच्या शरीरात...
वर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी ः मुरघासपावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर हिरव्या चाऱ्याचे...
चाराटंचाई काळात जनावरांसाठी हाय फायबर...चाराटंचाईच्या काळात फक्त जनावरे जगवणे महत्त्वाचे...
जनावरांना खाद्यामार्फत जास्तीची ऊर्जा...जनावरांनी खाल्लेल्या आहारापासून शरीरास लागणारी...
चाऱ्याच्या उपलब्धतेनुसार जनावरांचे पोषणवयस्क व दुधाळ जनावरांना केवळ चारा व कडबा खाण्यास...
प्रक्रियेतून सकस चाऱ्याची निर्मितीचाराप्रक्रियेमुळे जनावरांचे पचन सुधारून शरीरात...
नवजात वासरांचे पोषणनवजात वासरे कालवडींचे वैज्ञानिक पद्धतीने पालन...
गायी, म्हशींतील प्रजनन व्यवस्थापनगायी, म्हशी नियमित माजावर येण्यासाठी योग्य समतोल...
सुक्या चाऱ्याची निर्मिती, साठवणूक,...अधिक वैरणीचा मुरघास करून किंवा सुकवून साठवून...
पशूसल्ला    थंड वातावरणामुळे जनावरांच्या...
उसाच्या वाढ्याची पौष्टिकता वाढवाजनावरांच्या आहारात सतत वाढ्याचा समावेश केल्यामुळे...
पशू आजारांवर प्राथमिक उपचारासाठी औषधी...जनावरांच्या आजारामुळे मिळणाऱ्या कमी उत्पादनामुळे...
मुक्त संचार गोठ्यामध्ये गव्हाण,...मुक्त संचार गोठ्यात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता...
शस्त्रक्रियेमुळे बरी होते जनावरांतील...आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही शेतीची बरीचशी कामे...
गोठ्याचे कुंपण, बांधकामावर नको जास्त...गोठा बांधकामाचे नियोजन करताना लोखंडी वस्तू...
जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी कमी...कमी खर्चाचा मुक्त संचार गोठा करताना आपल्याकडे...
रेशीम कीटक संगोपनगृहात राखा योग्य...थंडीमध्ये वाढ झाल्यामुळे रेशीम कीटकांच्या...