जनावरांच्या खाद्यामध्ये अचानक बदल करणे टाळा

पूर्ण वाढ झालेलाच हिरवा चारा एक दिवस सुकवून जनावरांना खाऊ घालावा,
पूर्ण वाढ झालेलाच हिरवा चारा एक दिवस सुकवून जनावरांना खाऊ घालावा,

कोवळा चारा, निकृष्ट दर्जाचा चारा किंवा बुरशीची वाढ झालेला चारा जनावरांना खाऊ घातला जाऊ शकतो किंवा उत्तम प्रतीचा चारासुद्धा अचानक खाऊ घालण्यास सुरवात केल्यास जनावरांत पोटफुगी, अपचन, हगवण, विषबाधा असे आजार होऊ शकतात. हे सर्व टाळण्यासाठी जनावरांच्या चाऱ्यातील बदल हे काळजीपूर्वक केले पाहिजे तसेच चाऱ्याच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले पाहिजे.   टंचाईच्या काळात चारा उपलब्धता कमी असते. उपलब्ध होईल तो चारा जनावरांना खाऊ घालून जगविण्याचे प्रयत्न केले जातात. अशा वेळेस जनावरांच्या चाऱ्यामध्ये अचानक बदल केल्यामुळे पुढील परिणाम दिसून येतात. १. पोटफुगी टंचाई काळात अनेकवेळा चारा पूर्ण वाढ होण्यापूर्वीच जनावरांना खाऊ घातला जातो. कोवळ्या चाऱ्यात पचनीय तंतुमय पदार्थांचे तसेच पाण्याचे प्रमाण अधिक असते त्यामुळे जनावरांच्या पोटामध्ये त्याची जलद किण्वन प्रक्रिया होऊन मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या वायूंची निर्मिती होते. त्यातच प्रथिनांचे प्रमाण अधिक असलेला चारा असल्यास या तयार झालेल्या वायूंचे फेसासारखे बुडबुडे तयार होतात. अशा प्रकारात हे वायू पोटातून बाहेर पडू न शकल्याने पोटफुगी होऊ शकते. पोटफुगी टाळण्यासाठी पूर्ण वाढ झालेलाच चारा एक दिवस सुकवून जनावरांना खाऊ घालावा, नवीन चारा पूर्वीच्या चाऱ्यात थोडा थोडा मिसळून हळूहळू प्रमाण वाढवत नेऊन चारा बदलावा. पोटफुगी झाल्यास त्यावरील औषधे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने तोंडाद्वारे द्यावीत. प्रथोमोपचार म्हणून तेल आणि खाण्याचा सोडा पाजावा परंतु हे पाजताना जनावरांना ठसका लागणार नाही याची काळजी घ्यावी. २. हगवण निकृष्ट दर्जाचा चारा खाल्ल्यामुळे तसेच उन्हाळ्यात पाण्याची कमतरता झाल्यावर जनावरे डबक्यातील व इतरत्र साठलेले खराब पाणी पितात, त्यातून विविध जिवाणू, विषाणू व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन हगवण लागते, प्रादुर्भाव अधिक झाल्यास रक्तिहगवण होऊ शकते. शेण पातळ होते, त्याला खूप घाण वास येतो, जनावर मलुल होते, त्वचा शुष्क होते, डोळे खोल जातात वेळेत उपचार न मिळाल्यास जनावर दगावू शकते. हे टाळण्यासाठी जनावरांना उत्तम प्रतीचा, काळा न पडलेला चारा खाऊ घालावा, शुद्ध पाणी पाजावे. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करावेत. ३. किरळ लागणे व विविध विषबाधा कोवळी ज्वारीची धाटे तसेच अपूर्ण वाढ झालेल्या ज्वारीच्या कडब्यात असलेल्या हायड्रोसायनिक ॲसिडमुळे जनावरांमध्ये विषबाधा होते, त्याला किरळ लागणे असे म्हणतात. तसेच चारा उपलब्ध नसल्याने अनेकवेळा जनावरे चरताना विषारी वनस्पती खातात, निकृष्ठ प्रतीचा बुरशी वाढलेला चारा, विविध कीटकनाशके फवारलेले पिकांचे अवशेष, फळबागांचे छाटणी केलेली पाने जनावरांना खाऊ घातली जातात. यातून विविध प्रकारच्या विषबाधा होतात. तोंडाला फेस येणे, शरीर थरथरणे, खूप घाम येणे, शरीराचे तापमान कमी होणे, बेशुद्धी किंवा फिट येणे यांसारखे विषबाधेची लक्षणे दिसताच जनावरांचा चारा बदलावा, प्रथोमोपचार म्हणून कोळश्याची भुकटी करून पाजावे व पुढील तात्काळ उपचारासाठी पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा. ४. अखाद्य वस्तू खाणे चारा पोटभरून न मिळाल्यास व फॉस्फरसची शरिरात कमतरता झाल्यास जनावरे अखाद्य वस्तू जसे कापड, दोरी खातात, माती किंवा दगड चाटतात. यामुळे पचनात अडथळा निर्माण होऊ शकतो तसेच यातून तार, खिळे यांसारखे टोकदार वस्तू पोटात गेल्यास व वेळेत शस्त्रक्रिया करून ते बाहेर न काढल्यास जनावर दगावू शकते. हे टाळण्यासाठी योग्य प्रमाणात चारा उपलब्ध करावा, तसेच क्षार मिश्रणाचा पुरवठा करावा. पशुवैद्यकाकडून फॉस्फरसची इंजेक्शन द्यावीत. ५. अॅसिडोसीस किंवा पोटातील वाढलेली आम्लता टंचाई च्या काळात व चारा छावण्यात अनेक वेळा ऊसाचा वापर चारा म्हणून केला जातो. उसामध्ये सहज पचणारी साखर मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळे जनावराच्या पोटात जीवाणूकडून पचन होताना त्याचे वेगवेगळ्या आम्लात अर्थात अॅसिडमध्ये रुपांतर होत असते. यामुळे जनावरांमध्ये अॅसिडोसीस हा आजार होऊ शकतो. पचन बिघडणे, हगवण तसेच दुग्धोत्पादन कमी होणे असे लक्षणे यात दिसतात. त्याच बरोबर कमी प्रमाणातील अॅसिडोसीस चा त्रास अनेक दिवस होत राहिल्यास जनावरांच्या तब्येतीवर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात, तसेच जनावरे लंगडणे, कासेचे आजार ही होऊ शकतात. अॅसिडोसीस टाळण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन दिवस २५ ते ५० ग्रॅम खाण्याचा सोडा खाऊ घालावा. तसेच पशुवैद्यकांच्या सल्ल्याने रुमेन बफर वापरावेत. प्रक्रिया केलेला चारा व मुरघास खाऊ घालताना घ्यावयाची काळजी प्रत्येक तंत्रज्ञान वापरताना योग्य रीतीने न वापरल्यास त्याचे काही तोटे होऊ शकतात म्हणून प्रक्रिया केलेला चारा व मुरघास खाऊ घालताना खालील प्रमाणे काळजी घ्यावी.

  • प्रक्रिया केलेला चारा व मुरघास खाऊ घालताना अचानक न देता रोजच्या चाऱ्यात मिसळून हळूहळू प्रमाण वाढवत न्यावे, ५ ते ७ दिवसांनी पूर्ण प्रमाणात घालण्यास सुरवात करावी.
  • बुरशी आली असल्यास किंवा रंग काळपट झाला असल्यास जनावरांना खाऊ घालू नये.
  • मुरघास एकदा उघडल्यावर तो संपेपर्यंत त्यातील कमीत कमी अर्धा ते एक फुट वरचा थर रोज खाऊ घालावाच
  • युरिया प्रक्रिया केलेला चारा खाऊ घालण्यापूर्वी थोडावेळ पसरवून ठेवून त्यातील अमोनियाचा वास जाऊ द्यावा.
  • प्रक्रिया केलेला चारा व मुरघास काढल्यावर पुन्हा व्यवस्थित झाकून ठेवावा, जेणेकरून त्यात इतर कीटक किंवा विषारी प्राणी जाणार नाहीत.
  • सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या वासरांची रवंथ करण्याची क्षमता पूर्ण विकसित झालेली नसते त्यामुळे त्यांना प्रक्रिया केलेला चारा व मुरघास खाऊ घालू नये.
  • संपर्क ः डॉ. सचिन रहाणे, ७०३८५३५१८१ (पशुधन विकास अधिकारी (गट अ), पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १, कोतीज, ता. कडेगाव, जि. सांगली) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com