उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन

भुईमूगामध्ये शेंगा पोसण्यासाठी जिप्सम वापरणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते.
भुईमूगामध्ये शेंगा पोसण्यासाठी जिप्सम वापरणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते.

उन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात. या पिकातील खत व्यवस्थापनाची माहिती घेऊ.   नत्र, स्फुरद व पालाश ह्या मुख्य अन्नद्रव्यांसोबतच लोह, मंगल, जस्त, तांबे, मोलाब्द आणि बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकाच्या वाढीमध्ये महत्त्वाची असतात. रासायनिक खते ही पिकास जलद उपलब्ध होतात, परंतु कमी कालावधीत संपुष्टात येतात. सेंद्रिय खते ही पिकास कमी प्रमाणात, परंतु दीर्घकाळ जमिनीत अन्नद्रव्ये पुरवठा करतात. त्यामुळे खत व्यवस्थापन करताना सेंद्रिय व रासायनिक खतांचे योग्य संतुलन ठेवणे आवश्यक आहे. उन्हाळी भुईमूग :

  • जमिनीचा पोत सुधारण्यासाठी हेक्टरी ५ टन (१०-१२ गाड्या) चांगले कुजलेले शेणखत अथवा कंम्पोस्ट खत शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी द्यावे. भुईमूग पिकाच्या मुळांवरील गाठींमध्ये असलेल्या जिवाणूंच्या वाढीसाठी सेंद्रिय खते मदत करतात.
  • शक्यतोवर रासायनिक खताची मात्रा ही माती परीक्षण करूनच द्यावी.
  • पेरणीवेळी हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद द्यावे. जमिनीत पालाशाची कमतरता असल्यास १२ किलो पालाश द्यावा. त्याकरिता एकरी ५० किलो अमोनिअम सल्फेट किंवा २२ किलो युरीया अधिक १२५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व २० किलो म्यूरेट ऑफ पोटॅश द्यावे. यात अमोनियम सल्फेटमधून २०.५% नत्राव्यतिरीक्त २४% गंधकसुद्धा पिकांस मिळते. तसेच सिंगल सुपर फॉस्फेटमधून १६% स्फुरदाव्यतिरीक्त १२% गंधक व २१% कॅल्शिअम पिकास मिळते. गंधक तेलबिया पिकांसाठी अत्यंत आवश्यक आहे.
  • जिप्समचा वापर : पीक ५०% फुलोरावस्थेत असताना हेक्टरी ४०० ते ५०० किलो जिप्सम तासाच्या दोन्ही बाजूला सरळ ओळींमध्ये टाकून द्यावा. जिप्सम जमिनीवर टाकून दिले तर हरकत नाही. त्यानंतर होणाऱ्या आंतरमशागतीने किंवा पाण्याच्या पाळीने ते आऱ्यांच्या व शेंगांच्या संपर्कात येईल. भुईमूग पीक वाढणाऱ्या आऱ्या व शेंगाद्वारे कॅल्शिअम व गंधक शोषून घेते. जिप्सममधून २४% कॅल्शिअम व १८% गंधक पिकास मिळते. हे शेंगा पोसण्यासाठी आवश्यक असलेले हे दोन्ही घटक जिप्सममधून उपलब्ध होतात. म्हणून जिप्सम वापरणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. सूक्ष्म अन्नद्रव्ये ः

  • भुईमुगास मुख्य अन्नद्रव्यांसोबत झिंक, बोरॉन, लोह आणि मॅग्नेशियम सारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. त्यांच्या पूर्ततेकरिता एकरी १० किलो झिंक सल्फेट व बोरॅक्स २ किलो द्यावे.
  • उभ्या पिकात सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढळल्यास त्याची पूर्तता फवारणीद्वारे करावी.
  • जस्त : पिकाला जस्ताची कमतरता भासल्यास- झाडांची पाने लहान राहतात, पानांच्या शिरांमधील भाग पिवळा होतो व नंतर पाने वाळल्यासारखी दिसतात. जमिनीत जस्त कमी असल्यास १० किलो प्रति हेक्टरी झिंक सल्फेट वर्षातून एकदा पेरणीच्या वेळी जमिनीत मिसळावे. उभ्या पिकात कमतरता आढळल्यास २.५ किलो झिंक सल्फेट प्रति ५०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. लोह : लोहाची कमतरता असल्यास भुईमुगाची वाढ खुंटते, पाने पिवळी व त्यानंतर पांढरी पडतात. भुईमुगात लोहरहित रोग (Iron chlorosis) हा महाराष्ट्रातील चुनखडीयुक्त काळ्या जमिनीत आढळतो. सिंचनासाठी बायकार्बोनेटयुक्त पाण्याचा वापर, जमिनीत उपजत लोहाची कमतरता (४ पीपीएम पेक्षा कमी), जमिनीत स्फुरद, मॅंगनीज व जस्ताचे जास्त प्रमाण यापैकी कोणत्याही एका कारणामुळे पिकास लोहाची कमतरता भासते. पूर्ततेसाठी हेक्टरी २.५ किलो फेरस सल्फेट, १ किलो चुना आणि २.५ किलो युरिया प्रति ५०० लिटर पाणी या प्रमाणे पिकावर फवारणी करावी. बोरॉन : हलक्या व मध्यम जमिनीत बोरॉन या सूक्ष्मद्रव्याचा भुईमुगाच्या पिकासाठी वापर करावा. त्यामुळे उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते. वर्षातून एकदा एकरी दोन किलो या प्रमाणात पेरणीपूर्वी जमिनीत मिसळल्यास बोरॉनची कमतरता राहत नाही. उन्हाळी सूर्यफूल :

  • सूर्यफूल या पिकाला रासायनिक खताची शिफारसीत मात्रा ही जातीपरत्वे वेगळी आहे.
  • जातनिहाय नत्र, स्फुरद, पालाशची मात्रा किलो प्रति हेक्टरी पुढील प्रमाणे ः मॉडर्न (४०:४०:००), तर टीएएस ८२ व पीकेव्ही एसएच २७ (८०:६०:००).
  • शिफारशीत मात्रेपैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे. उरलेले नत्र पेरणीपासून ३०-३५ दिवसांनी कळी अवस्थेत द्यावे. रासायनिक खतांची मात्रा शक्यतोवर मिश्रखतातून न देता सरळ खतातून द्यावी. त्यासाठी युरिया किंवा अमोनियम सल्फेट आणि सिंगल सुपर फॉस्फेट वापरावे.
  • सूर्यफूल हे नत्र, स्फुरद, पालाश या रासायनिक खतासोबत शेणखतास चांगला प्रतिसाद देते. जमीन तयार करताना पूर्वमशागतीच्या वेळेला ५-६ टन कुजलेले शेणखत हेक्टरी टाकावे. सूर्यफुलास कॅल्शिअम (जिप्सम २० किलो प्रती हेक्टर.) व मॅग्नेशिअम (मॅग्नेशिअम सल्फेट १० किलो प्रती हेक्टर) या प्रमाणे द्यावे. पीक फुलोऱ्यात असताना ०.२% बोरॅक्स (२ ग्रॅम बोरॅक्स प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी केल्यास दाणे भरण्याचे प्रमाण वाढते. फुलोऱ्याचे प्रमाण वाढते.
  • उन्हाळी तीळ :

  • पेरणीपूर्वी हेक्टरी १५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे.
  • माती परीक्षणानुसार तीळ या पिकास पेरणीच्या वेळेस अर्धे नत्र १२.५ किलो प्रति हेक्टर व पूर्ण स्फूरद २५ किलो प्रति हेक्टर देऊन उरलेल्या नत्राची मात्रा १२.५ किलो प्रति हेक्टर या प्रमाणे पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावी.
  • एकेटी-६४ या वाणाकरिता रासायनिक खताची मात्रा ४० किलो नत्र व २५ किलो स्फुरद प्रति हेक्टर एवढी द्यावी.
  • झिंक व सल्फर या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास, पेरणीच्या वेळेस झिंक सल्फेट जमिनीत २० किलो प्रति हेक्टर या प्रमाणे द्यावे. उत्पादनात वाढ होते.
  • उन्हाळी मका : एकूण १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ३० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. यापैकी ४० ‍किलो नत्र आणि संपूर्ण स्फूरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. उरलेल्या नत्रापैकी हेक्टरी ४० किलो नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी व उर्वरीत ४० किलो नत्र पेरणीनंतर ५० दिवसांनी द्यावे. उन्हाळी मूग : खरीप किंवा रब्बी हंगामातील पिकास शेणखत दिले असल्यास उन्हाळी मुगास पुन्हा सेंद्रिय खत देण्याची गरज नाही. या पिकास रासायनिक खताची मात्रा २० किलो नत्र व ४० किलो पालाश प्रति हेक्टरी याप्रमाणे पेरणीच्या वेळेस द्यावे. पीक फुलोऱ्यावर असताना आणि शेंगा भरण्याच्या स्थितीत डीएपीचे २% द्रावण पिकावर फवारल्यास फुले येण्यास मदत होते. शेंगाचे दाणे भरण्यास मदत होते. श्रीमती सारिका नारळे, ९४०४१९४२८९ (श्रीमती नारळे या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये कृषी सहाय्यक असून, डॉ. हनुमान गरूड हे वरिष्ठ संशोधन सहयोगी आहेत. ) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com