टंचाई टाळण्यासाठी चाऱ्याचे नियोजन अावश्‍यक

टंचाईकाळात प्रक्रियायुक्त चारा पुरविल्यास दूध उत्पादन टिकून जनावरांच्या पोषणतत्त्वांची गरज पूर्ण होते.
टंचाईकाळात प्रक्रियायुक्त चारा पुरविल्यास दूध उत्पादन टिकून जनावरांच्या पोषणतत्त्वांची गरज पूर्ण होते.

भविष्यातील चाराटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध क्षेत्रावर चारा लागवड, चाऱ्याचा काटकसरीने वापर, चाऱ्याचा साठा, हायड्रोपोनिक्‍स चारा अाणि चारा प्रक्रिया इ. पर्याय उपलब्ध अाहेत. असा चारा टंचाईकाळात पुरविल्यास निश्‍चितच दूध उत्पादन टिकून जनावरांच्या पोषणतत्त्वांची गरज पूर्ण करता येईल.   १. उपलब्ध क्षेत्रावर चारा लागवड किमान ३-४ महिने पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असेल तर डीएचएन-६, धारवाड नेपियर, सीओ-४, कडवळ, या चारा पिकांची लागवड करावी. मुरघास स्वरूपात साठवून ठेवावा किंवा ५० टक्के फुलोऱ्यात आलेला चारा कापून सावलीत वाळवून त्याचा साठा करावा. अशा चाऱ्याला "हे' असे म्हणतात. या चाऱ्याची पौष्टिकता हिरव्या चाऱ्याच्या जवळपासच असते. २. उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने वापर काटकसरीने वापर म्हणजे जनावराचे कुपोषण करून चारा साठवणे नव्हे, तर सध्याची जनावराची शारीरिक गरज पूर्ण होईल एवढाच चारा जनावरांना देणे. जनावरांचे अतिपोषण टाळावे. विनाकारण नियमित चारा टाकून वाया न घालवता जनावराच्या दूध उत्पादन व शरीरपोषणासाठी लागणाऱ्या पोषणतत्त्वांची गरज पूर्ण होईल एवढाच चारा त्यांना द्यावा. उर्वरित चारा साठा करावा, जो भविष्यात उपयोगात येईल. चारा नियोजनासाठी आहारतज्ज्ञांशी संपर्क करून त्यांच्या सल्ल्यानुसार जनावरांना आहार द्यावा. चारा वाया जाऊ नये म्हणून चाऱ्यावर प्रक्रिया करून, चारा कुट्टी करूनच जनावरांना द्यावा, जेणेकरून चाऱ्याची बचत होऊन भविष्यात संगोपनासाठी त्याचा वापर करता येईल. उत्पादक नसलेली किंवा भविष्यातही उत्पादक न होणारी जनावरे न सांभाळता त्यांच्यावर चारा वाया न घालवता उत्पादनक्षम जनावरांचेच संगोपन करावे. ३. चाऱ्याचा साठा उपलब्ध सर्व प्रकारची गुळी (सोयाबीन/ गहू/ भात/ तूर), कडबा, वाळलेले गवत, वाळलेले पाचट, वाळलेले उसाचे वाढे याचा सुयोग्य साठा करावा. ज्या ज्या ठिकाणाहून शेतातील दुय्यम पदार्थ आणून साठा करता येईल तेथून आणून साठा करावा. उपलब्ध चाऱ्याचे ब्लॉक बनवावेत. चाऱ्याचा साठा कोरड्या ठिकाणी उंचावर करावा, जेणेकरून चारा ओलसर होऊन बुरशी तयार होणार नाही व असा चारा वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. ४. हायड्रोपोनिक्‍स चारा कमी पाणी व मातीविना चारा उत्पादनासाठी हायड्रोपोनिक्‍स तंत्रज्ञानाद्वारे चारा उत्पादन करावे. यामध्ये कमी पाण्यात जास्त चारा उत्पादन करणे शक्‍य होते. हायड्रोपोनिक्‍सद्वारे उत्पादित चाऱ्यात प्रथिनांचे प्रमाण मुबलक असते. दहा-बारा दिवसांत १ किलो बियांपासून १० किलो चारा मिळतो. कमी जागेत जास्त चारा उत्पादन होते. ५. पर्यायी चाऱ्याचे नियोजन उपलब्ध चारा संपल्यानंतर बगॅस, मळी, युरिया, गुळी/ भुसकट, कमी प्रतीचा चारा साठा करून त्यावर योग्य ती प्रक्रिया करून त्याचा जनावरांच्या आहारात वापर केल्यास चाराटंचाईवर मात करून जनावरांचे व्यवस्थित संगोपन करता येते. अ) चाऱ्याची चव वाढवून चारा खाण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रक्रिया ः

  • एक किलो मीठ १० लिटर पाण्यात विरघळून १०० किलो वाळल्या चाऱ्यावर फवारावे आणि २ ते ३ तासाने जनावरांना खाण्यास द्यावे.
  • १० ते १५ लिटर मळी १०० किलो वाळला चारा/ गुळी यावर फवारावी व १२ ते १४ तास ठेवून खाण्यास द्यावे.
  • १० लिटर पाण्यात १ किलो मीठ व १ किलो गूळ मिसळून १०० किलो वाळला चारा/ गुळीवर फवारून १२ ते २४ तास झाकून ठेवून जनावरांना खाण्यास द्यावे.
  • ब) चाऱ्याची चव, खाण्याचे प्रमाण, पचनीयता, पोषणमूल्ये वाढवण्यासाठी प्रक्रिया

  • एक किलो युरिया १०० लिटर पाण्यात मिसळून १०० किलो निकृष्ट चाऱ्यावर/ गुळीवर फवारावे. २ ते ३ तासांनंतर चारा खाऊ घालावा.
  • मळी १० किलो किंवा ५ किलो गूळ, १ किलो मीठ, १ किलो क्षार मिश्रण, २ ते ४ किलो युरिया, ४० ते ५० लिटर पाण्यात मिसळून द्रावण बनवावे. द्रावण १०० किलो गुळी/ निकृष्ट चाऱ्यावर सर्वसमान फवारावे व असा चारा २१ दिवस हवाबंद झाकून ठेवावा व २१ दिवसांनंतर जनावरांना खाण्यास द्यावा.
  • क) दररोज युरिया-मळीची प्रक्रिया करून चारा वापरण्यासाठी ः दोन लिटर पाण्यात २ किलो युरिया मिसळावा. या द्रावणामध्ये १० किलो मळी मिसळावी. या द्रावणामध्ये १ किलो मीठ व १ किलो क्षार मिश्रण मिसळून मातीपासून बनविलेल्या भांड्यात ठेवावे. प्रक्रिया पद्धत ः वरील ७५० ग्रॅम द्रावण घेऊन ७५० मिली पाण्यात मिसळून द्रावण बनवून ५-१० किलो कुट्टीवर फवारावे. फवारल्यानंतर चारा वर-खाली करावा व राहिलेले द्रावण परत फवारावे. या प्रक्रियेत पहिले १५ दिवस केवळ ५०० ग्रॅम (वरील बनविलेले) द्रावण घ्यावे. नंतर हळूहळू प्रमाण वाढवून ७५० ग्रॅमपर्यंत घ्यावे. एका दिवसात ७५० ग्रॅमपेक्षा जास्त द्रावण फवारलेला चारा (५ - १० किलो चाऱ्यावर) जनावरास खाण्यास देऊ नये. ड) बगॅसवर युरिया-मळी प्रक्रिया ः - थोडे पाणी घेऊन त्यात १ किलो युरिया मिसळावा. युरियाचे द्रावण १०० किलो मळीमध्ये मिसळावे. १०० किलो बगॅस प्लॅस्टिक, फरशी/ कॉंक्रीटवर पसरावे व वरील निम्मे द्रावण यावर सर्व ठिकाणी फवारावे. नंतर बगॅस खाली-वर करून परत उर्वरित निम्मे द्रावण बगॅसवर फवारावे. अर्धा ते १ तास थांबून ते जनावरांना खाण्यास द्यावे.

  • युरिया-मळी-बगॅस खाद्य २ ते ३ किलो प्रती जनावरांस कडब्यासोबत द्यावे.
  • १० लिटर पाण्यात १ किलो मीठ, २ किलो युरिया मिसळावा. या द्रावणात १० ते १५ किलो मळी मिसळावी. बगॅसचा जमिनीवर १०-१५ इंचाचा थर करावा. या बगॅसवर अधूनमधून क्षार व जीवनसत्त्व मिश्रण थोडे-थोडे टाकावे. खालची बाजू वर करून उर्वरित द्रावण फवारावे. या प्रक्रियेत बगॅस एकूण ८०-८५ किलो घ्यावे. हे प्रक्रिया केलेले बगॅस ३-४ किलो मोठ्या जनावरास द्यावे.
  • युरिया प्रक्रिया केलेले खाद्य खाऊ घालताना घ्यावयाची काळजी

  • युरिया प्रक्रिया केलेला चारा, बगॅस सहा महिने वयाच्या आतील जनावरांना खाऊ घालू नये.
  • चारा खायला देतेवेळी/दिल्यानंतर जनावरांची तहान वाढते, तेव्हा मुबलक पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावे.
  • युरियाचे प्रमाण ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त वाढवू नये.
  • चाऱ्यावर प्रक्रिया पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी.
  • संपर्क : डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ९४२३८७०८६३ (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)    

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com