कापूस, हळद, हरभऱ्याच्या भावात वाढ

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका, सोयाबीन व हरभरा यांचे भाव वाढले. इतर शेतमालाचे भाव घसरले. हळदीतील व गव्हातील घट नवीन पिकाच्या आवकेच्या अपेक्षेने झालेली आहे. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत कापूस, हळद, गवार बी आणि हरभरा यांचे भाव वाढतील.   चालू वर्षी भारतातील सोयाबीन पेंडीच्या निर्यात मागणीत वाढ झाली आहे. इराण मध्येही मागणी वाढत आहे. सोयाबीन असोसिएशनने या वर्षी सोयाबीनचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा ३८ टक्क्याने अधिक असेल असा अंदाज केला आहे. हरभ-याचा व्यापा-यांकढील साठा कमी होत आहे. हरभ-याची निर्यात व स्थानिक मागणी वाढती आहे. मात्र शासनाचा साठा भाव वाढीवर नियंत्रण करेल. पशु-खाद्याची मागणी वाढती आहे. गेल्या सप्ताहातील एनसीडीएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते. मका रबी मक्याच्या (मार्च २०१९) किमती १८ जानेवारीनंतर वाढत होत्या. (रु. १,३०० ते रु. १,४६२) या सप्ताहात त्या ३ टक्क्याने वाढून रु. १,५५० वर आल्या आहेत. स्पॉट किमती (सांगली) रु. २,०५८ वर आल्या आहेत. हमी भाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी भावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. रबी आवकेमुळे किमती उतरतील; पण त्या हमी भावाच्या आसपास राहतील. साखर साखरेच्या (मार्च २०१९) किमती जानेवारी मध्ये घसरत होत्या (रु. ३,०६९ ते रु. ३,०१९). सध्या रु. ३,०२९ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१८० वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. साखरेत फारसे व्यवहार होत नाहीत. सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (मार्च २०१९) किमती जानेवारी महिन्यात वाढत होत्या (रु. ३,२५६ ते रु. ३,८७०). या सप्ताहात त्या १.३ टक्क्यांनी वाढून रु. ३,७९६ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,८५९ वर आल्या आहेत. हमी भाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). १९ फेब्रुवारी रोजी एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर डिलिवरीसाठी अनुक्रमे रु. ३,८४०, ३,८८१, ३,९२२, ३,९६३, ४,००४ व ४,०४५ भाव होते. हळद हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती जानेवारी महिन्यात घसरत होत्या (रु. ६,७५८ ते रु. ६,३९८). या महिन्यातसुद्धा घसरण होत आहे. या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने किमती १.३ टक्क्यांनी घसरून रु. ६,२४८ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,४३४ वर आल्या आहेत. जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६,५५४). स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे; पण आता आवकसुद्धा वाढत आहे. या वर्षी उत्पादन वाढलेले असेल. त्याचा परिणाम किमती कमी होण्यावर होत आहे. गहू गव्हाच्या (मार्च २०१९) किमती गेल्या सप्ताहात ७.२ टक्क्यांनी घसरून रु. १,९६० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ०.८ टक्क्यांनी घसरून रु. १,९४५ वर आल्या आहेत. एप्रिल २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा १२.२ टक्क्यांनी कमी आहेत (रु. १,८३४). रबी पिकाच्या अपेक्षेने पुढील काही दिवस मर्यादित घसरण अपेक्षित आहे. नवीन हमी भाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता). एप्रिल-मे मध्ये बाजार भाव हमी भावापेक्षा जवळ असतील. गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (मार्च २०१९) किमती जानेवारी महिन्यात रु. ४,२४१ व रु. ४,४६३ या दरम्यान चढ-उतार अनुभवत होत्या. गेल्या सप्ताहात त्या १.५ टक्क्यांनी घसरून रु. ४,२३१ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.२ टक्क्यांनी घसरून रु. ४,२२२ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,२६७ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा एप्रिल २०१९ मधील फ्युचर्स किमती १.४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३२८). खनिज तेलाच्या आंतर-राष्ट्रीय किमतींवर पुढील घट किंवा वाढ अवलंबून आहे. हरभरा हरभ-याच्या फ्युचर्स (मार्च २०१९) किमती जानेवारी महिन्यात घसरत होत्या. (रु. ४,४७६ ते रु. ४,२१०). गेल्या सप्ताहाच्या तुलनेने या सप्ताहात त्या १.५ टक्क्याने वाढून रु. ४,२७४ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,१६० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा जून २०१९ मधील फ्युचर्स किमती ५.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४०४). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन हमी भाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता). मागणी वाढती आहे. रबीची आवक सुरू झाल्यावर बाजार भाव हमी भावाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (मार्च २०१९) किमती जानेवारी महिन्यात घसरत होत्या. (रु. २१,५८० ते रु. २१,१४०). या सप्ताहात त्या ०.७ टक्क्यांनी घसरून रु. २०,३९० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २०,२६० वर आल्या आहेत. मे २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २३,००० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. गुजरात मधील कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निर्यात मागणी अजूनही अनिश्चित आहे. यामुळे सध्याची घसरण होत आहे. मात्र निर्यात मागणी वाढली तर हि घसरण थांबू शकेल. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १७० किलोची गाठी).   arun.cqr@gmail.com  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com