सोयाबीन, कापसाच्या किंमतीत वाढीचा कल

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

या सप्ताहातसुद्धा सोयाबीनचे भाव मोठ्या प्रमाणात चढले. जानेवारी महिन्यात सोयाबीनमधील एकूण वाढ १८ टक्क्यांची झाली. तशीच तेजी गवार बी ने अनुभवली. या महिन्यात गवार बी चे भाव १० टक्क्यांनी वाढले. साखरेत मात्र मंदी आली. साखरेचे भाव जानेवारी महिन्यात १० टक्क्यांनी तर कापसाचे भाव १ टक्क्याने घसरले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यात कापूस, हळद व गवार बी यांचे भाव वाढतील. अधिक रबी उत्पादनाच्या अपेक्षेने गहू व हरभरा यांचे भाव उतरतील सोयाबीन आत्ता स्पॉटमध्ये न विकता मे फ्युचर्समध्ये विकला तर जवळ जवळ तोच भाव (रु. ३,८४१) मिळेल. मका (खरीप) व गवार बीचे भाव एप्रिलमध्ये १.५ व ३ टक्क्यांनी अधिक (अनुक्रमे रु. १,२८९ व रु. ४,७३८) मिळतील. कापसाचे भाव मार्चमध्ये ७.६ टक्क्यांनी अधिक मिळतील (रु. २०,९५०). गेल्या सप्ताहातील एनसीडीएक्स व एमसीएक्स मधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मका खरीप मक्याच्या (फेब्रुवारी २०१८) किमती डिसेंबर महिन्यात सतत घसरत होत्या. (रु. १,३७० ते रु. १,३३१). या सप्ताहातसुद्धा त्या १.१ टक्क्यांनी घसरून रु. १,२७६ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (निझामाबाद) रु. १,२७१ वर आल्या आहेत. एप्रिल २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,२८९ वर आल्या आहेत. हमी भाव रु. १,४२५ आहे. रबी मक्याची एप्रिल २०१८ च्या डिलिवरीची फ्युचर्स किमत रु. १,१८५ आहे. रबी पिकाच्या अपेक्षेने किमती हमी भावाच्या खाली राहण्याचा संभव आहे.

साखर साखरेच्या (फेब्रुवारी २०१८) किमती डिसेंबर महिन्यात रु. ३२७१ च्या आसपास होत्या. गेल्या सप्ताहात त्या ८.४ टक्क्यांनी घसरून रु. २,९०१ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा १ टक्क्याने घसरून रु. २,८७४ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,०६८ वर आल्या आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जुलै (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. २,९५५ वर आल्या आहेत. सध्या साठा पुरेसा आहे. नवीन हंगामाचे उत्पादन आता सुरू झाले आहे. १९ डिसेंबर रोजी केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार या वर्षी भारतातील साखरेचे उत्पादन २४९ लाख टन होईल. (गेल्या वर्षीचे उत्पादन: २५० लाख टन). मात्र गेल्या वर्षीचा साठा लक्षात घेता या वर्षी पुरेसा पुरवठा होईल व साखरेचे भाव स्थिर राहतील. त्यामुळे शासनाची साठ्यावरील व विक्रीवरील बंधने आता काढून टाकण्यात आली आहेत.

सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (फेब्रुवारी २०१८) किमती १४ डिसेंबरपासून सतत वाढत आहेत. (रु. ३,०७७ ते रु. ३,१४९). गेल्या सप्ताहाच्या तुलनेने या सप्ताहातसुद्धा त्या ५ टक्क्यांनी वाढून रु. ३,७१३ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती ६.८ टक्क्यांनी वाढून रु. ३,८५८ वर आल्या आहेत. मे २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,८४१ वर आल्या आहेत. हमी भाव (बोनस सहित) रु. ३,०५० आहे. आंतर- राष्ट्रीय व देशातील उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक आवक पण कमी झालेली आहे. खाद्य तेल-उद्योगाची मागणी वाढत आहे. शासनाने हमी भावाने सोयाबीन जरी खरेदी करण्याची तयारी दर्शवली असली तरी या वर्षी ती वेळ येणार नाही. पुढील वर्षी सोया पेंडीच्या निर्यातीत वाढ होऊन ती २० लाख टनावर जाईल असा अंदाज केला गेला आहे (मागील वर्षीची निर्यात : १५ लाख टन). त्यामुळे पुढील काही महिने किमतींत वाढीचा कल राहण्याचा संभव आहे.

हळद हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती डिसेंबरमध्ये वाढत होत्या (रु. ७,३६० ते ७,९५०). या सप्ताहात त्या २.६ टक्क्यांनी घसरून रु. ७,२९० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,३४३ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ७,४९८). वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. देशांतर्गत मागणी वाढती आहे. पुढील काही दिवसांत वाढत्या आवकेमुळे किमती घसरण्याची शक्यता आहे.

गहू ११ डिसेंबरपासून गव्हाच्या (फेब्रुवारी २०१८) किमती वाढत होत्या. (रु. १,६७४ ते रु. १,७३३). या सप्ताहात त्या १.२ टक्क्यांनी घसरून रु. १,६५८ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (दिल्ली) रु. १,७९० वर आल्या आहेत. एप्रिल २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ६.१ टक्क्यांनी कमी आहेत (रु. १,६८१). पुढील वर्षाचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मर्यादित घसरण अपेक्षित आहे. शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. १,७३५ आहे.

गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (फेब्रुवारी २०१८) किमती १२ डिसेंबरपासून वाढत होत्या (रु. ३,८६४ ते रु. ४,१८५). या सप्ताहात त्या २.९ टक्क्यांनी वाढून रु. ४,६२७ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,६०० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा एप्रिल २०१८ मधील फ्युचर्स किमती ३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,७३८). मागणी वाढती आहे; किमतीतील तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे.

हरभरा १४ डिसेंबरनंतर हरभऱ्याच्या फ्युचर्स (मार्च २०१८) किमती वाढत होत्या (रु. ३,७१६ ते ३,८२४). या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी वाढून रु. ३,७८९ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ३,८७० वर आल्या आहेत. मे २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमती पेक्षा ०.१ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ३,८६७). शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. ४,४०० आहे. एप्रिलनंतर भाव घसरू नयेत, यासाठी शासनाचे प्रयत्न राहतील. आयात शुल्क त्यामुळे ३० टक्के लावण्यात आले आहे. विक्रीवरील स्पेशल मार्जिनसुद्धा वाढवले आहे. किमतीत मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत.

कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (फेब्रुवारी २०१८) किमती डिसेंबर महिन्यात वाढत होत्या (रु. १९,३७० ते रु. २०,६३०). या सप्ताहात त्या ४.३ टक्क्यांनी घसरून रु. २०,११० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १९,४७० वर आल्या आहेत. मे २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ७.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २०,९५०). कपाशीचा एप्रिल २०१८ डिलीवरी भाव प्रति २० किलोसाठी रु. ९८५ आहे. प्रथम अंदाजानुसार या वर्षी कापसाचे उत्पादन घसरून ३२.३ दशलक्ष गाठीवर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन: ३३.१ दशलक्ष गाठी). मागणी चांगली आहे. लांबवरचा कल वाढता आहे. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १४० किलोची गाठी). arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com