कापसाच्या किमतीत वाढीचा कल

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

या सप्ताहात कापूस व हरभरा वगळता सर्वच पिकांत वाढ झाली. सर्वात अधिक वाढ हळदीत (३.२ टक्के) होती. सर्वात अधिक घट कापसात (१.६ टक्के) झाली. सर्व खरीप पिकांचे नजीकचे व्यवहार सध्या ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यांच्या डिलिव्हरीसाठी सुरू झाले आहेत. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन व कापसात घट होईल. इतरांचे भाव वाढतील.   या सप्ताहातसुद्धा माॅन्सूनने चांगली प्रगती केली आहे. १ जूनपासून २४ जुलैपर्यंत झालेला पाऊस सरासरीपेक्षा केवळ २ टक्क्यांनी कमी आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस आता उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान व रायलसीमा येथे झालेला आहे. इतरत्र तो सरासरी इतका किंवा अधिक झाला आहे. पुढील सप्ताहात राजस्थान, मध्य प्रदेश व उत्तराखंड येथे चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. या वर्षी एकूण पाऊस सरासरी गाठेल हा अंदाज बरोबर ठरेल असे दिसते. सर्व खरीप पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र व उत्पादन त्यामुळे वाढेल. पुढील वर्षी मागणीसुद्धा वाढेल असा अंदाज आहे. आयात कमी करणे व निर्यातीला उत्तेजन देणे हे शासनाचे प्रमुख धोरण राहील. बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक राहावेत, यासाठी शासन प्रयत्नशील राहील. सोयाबीन पेंडच्या निर्यातीवरील सवलत वाढवलेली आहे. हळदीच्या चीन व बांगलादेशमधील निर्यातीतसुद्धा वाढ होईल अशी अपेक्षा आहे. गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मका रबी मक्याच्या (ऑगस्ट २०१८) किमती जून महिन्यात घसरत होत्या (रु. १,२५४ ते रु. १,१८३). या सप्ताहात त्या २.१ टक्क्यांनी वाढून रु. १,२९० वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,२०५ वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ मधील फ्यूचर्स किमती रु. १,३५४ वर आहेत. उत्पादन वाढलेले आहे; पण मागणीसुद्धा वाढती आहे. खरीप मका (सांगली) चा नोव्हेंबर २०१८ डिलिव्हरी भाव १,३३१ आहे. नवीन हमीभाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). साखर साखरेच्या (ऑगस्ट २०१८) किमती जून महिन्यात वाढत होत्या (रु. २,८९३ ते रु. ३,११०). या सप्ताहात त्या ०.१ टक्क्यांनी घसरून रु. ३,२१७ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,२०० वर स्थिर आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. डिसेंबर (२०१८) च्या फ्यूचर्स किमती रु. ३,२१७ वर आल्या आहेत. सोयाबीन सोयाबीन फ्यूचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जून महिन्यात वाढत होत्या (रु. ३,३१७ ते रु. ३,४७१). नंतर त्या घसरू लागल्या. या सप्ताहात त्या ०.२ टक्क्यांनी वाढून रु. ३,३५२ पर्यंत आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,५३६ वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८, डिसेंबर २०१८, जानेवारी २०१९ व फेब्रुवारी २०१९ च्या किमती अनुक्रमे रु. ३,३२८, रु. ३,३७८, रु. ३,४०५ व रु. ३,४२४ आहेत. जागतिक व भारताचे या वर्षीचे उत्पादन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवीन हमीभाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). ऑक्टोबरनंतर सोयाबीन हमीभावापेक्षा अधिक राहण्याची अपेक्षा आहे. हळद हळदीच्या फ्यूचर्स (ऑगस्ट २०१८) किमती जून महिन्यात रु. ७,०९२ व रु. ७,५२८ दरम्यान चढउतार अनुभवत होत्या. या सप्ताहात त्या ३.२ टक्क्यांनी वाढून रु. ७,३७४ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,४२० वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ च्या फ्यूचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १.४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ७,५२२). आता आवक कमी होऊ लागली आहे. स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. मात्र, पाउस चांगला होत असल्याने उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. गहू गव्हाच्या (ऑगस्ट २०१८) किमती १३ जूननंतर वाढत होत्या (रु. १,७९१ ते रु. १,८४८). या सप्ताहात त्या २.९ टक्क्यांनी वाढून रु. १,९७२ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,९३७ वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ मधील फ्यूचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा २.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १,९८९). पुढील दिवसात वाढ अपेक्षित आहे. गवार बी गवार बीच्या फ्यूचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जून महिन्यात वाढत होत्या. (रु. ३,७३८ ते रु. ३,९९८). या महिन्यातसुद्धा तोच काल कायम आहे. गेल्या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी वाढून रु. ४,१८१ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.१ टक्क्यांनी वाढून रु. ४,१८६ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती ०.४ टक्क्यांनी वाढून रु. ४,१०२ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा नोव्हेंबर २०१८ मधील फ्यूचर्स किमती २.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,२१८). हरभरा हरभऱ्याच्या फ्यूचर्स (ऑगस्ट २०१८) किमती जून महिन्यात रु. ३,३५३ रु. ३,६३५ यादरम्यान होत्या. गेल्या सप्ताहात त्या ९.१ टक्क्यांनी वाढून रु. ४,२११ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी घसरून रु. ४,१७५ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,२३९ वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ मधील फ्यूचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ०.१ टक्क्यांनी अधिक आहेत. (रु. ४,२४३). आयातीवरील वाढत्या नियंत्रणामुळे व वाढत्या मागणीमुळे हरभऱ्यात वाढ अपेक्षित आहे. कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्यूचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती १२ जूननंतर घसरत आहेत (रु. २४,११० ते रु. २२,८००). गेल्या सप्ताहात मात्र त्या १.३ टक्क्यांनी वाढून रु. २३,७९० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.६ टक्क्यांनी घसरून २३,४०० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २३,०७७ वर आल्या आहेत. नोव्हेंबर व डिसेंबर २०१८ च्या फ्यूचर्स किमती अनुक्रमे रु. २३,०१० व रु. २२,९०० आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी अजूनतरी कापसाखाली लागवड कमी आहे. त्यामुळे किमतींत वाढीचा कल राहील. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किमत प्रति १४० किलोची गाठी). arun.cqr@gmail.com  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com