कापसाच्या फ्युचर्स किमतीत वाढीचा कल

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

या सप्ताहात कापूस, सोयाबीन व हळदीच्या किमतींत घट झाली. इतरांचे भाव वाढले. सर्वात अधिक घट हळदीमध्ये (३.५ टक्के) होती. सर्वात अधिक वाढ हरभऱ्यात झाली (३.३. टक्के). सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन, खरीप मका व कापूस वगळता इतरांचे भाव वाढतील. या सप्ताहात मान्सूनने चांगली प्रगती केली. त्यामुळे १ जूनपासून १५ ऑगस्टपर्यंत झालेला पाऊस सरासरीपेक्षा ९ टक्क्यांनी कमी आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस मुख्यत्वे आसाम, झारखंड, गुजराथ, सौराष्ट्र, मराठवाडा व रायलसीमा येथे झालेला आहे. पुढील सप्ताहात गुजराथ व सौराष्ट्र येथे चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. १० ऑगस्ट रोजी अमेरिकन शेती खात्याने पुढील वर्षासाठी (२०१८-१९) जागतिक उत्पादनाचे सुधारित अंदाज प्रसिद्ध केले. या अंदाजानुसार २०१७-१८ च्या तुलनेने २०१८-१९ मध्ये गहू व कापूस यांच्या जागतिक उत्पादनात घट संभवते; मका व तेलबिया (सोयाबीन सह) यांच्यात वाढ अपेक्षित आहे. भारतातही गहू, कापूस व मका यांच्या उत्पादनात घट तर तेलबियात वाढ होईल असा अंदाज केला गेला आहे. भारतातील सोयाबीनमधील वाढ २९.३ टक्क्याने होईल अशी अपेक्षा आहे. चांगल्या पावसामुळे पुढील वर्षी मागणीसुद्धा वाढेल असा अंदाज आहे. आयात कमी करणे व निर्यातीला उत्तेजन देणे हे भारतातील शासनाचे प्रमुख धोरण राहील. बाजार भाव हमी भावापेक्षा अधिक राहावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील. सोयाबीन पेंडच्या निर्यातीवरील सवलत वाढवलेली आहे. हळदीच्या चीन व बांगलादेशमधील निर्यातीतसुद्धा वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते. मका रबी मक्याच्या (सप्टेंबर २०१८) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या (रु. १,२०८ ते रु. १,३०३). या सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी वाढून रु. १,३२१ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,२५० वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,३६१ वर आहेत. मागणी वाढती आहे. खरीप मका (सांगली) चा नोव्हेंबर २०१८ डिलिवरी भाव १,३३१ आहे. नवीन हमी भाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). अजून या डिलिवरीसाठी फारसे व्यवहार होत नाहीत. साखर साखरेच्या (सप्टेंबर २०१८) किमती जुलै महिन्यात घसरत होत्या (रु. ३,३७५ ते रु. ३,१८४). या सप्ताहात त्या रु. ३,१६९ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१६५ वर आल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. मार्च (२०१९) च्या फ्युचर्स किमती रु. ३,१६९ वर आल्या आहेत. साखरेतसुद्धा फारसे व्यवहार होत नाहीत. सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जुलै महिन्यात १६ तारखेपर्यंत घसरत होत्या (रु. ३,५४३ ते रु. ३,३०७). नंतर त्या रु. ३,३३७ ते रु. ३,४२९ दरम्यान राहिल्या. या सप्ताहात त्या २.२ टक्क्यांनी घसरून रु. ३,३१७ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,४५३ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८, जानेवारी २०१९ व फेब्रुवारी २०१९ च्या किमती अनुक्रमे रु. ३,३६१, रु. ३,४०७ व रु. ३,४५३ आहेत. नवीन हमी भाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). ऑक्टोबरनंतर सोयाबीन हमी भावाच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे. हळद हळदीच्या फ्युचर्स (सप्टेंबर)घसा जुलै महिन्यातील किमती १२ तारखेपर्यंत घसरत होत्या (रु. ७,२५० ते रु. ६,९६६). नंतर त्या वाढून रु. ७,४०० पर्यंत गेल्या. या सप्ताहात त्या ३.५ टक्क्यांनी घसरून रु. ७,०३० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,१३१ वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ७,२८२). आता आवक कमी होऊ लागली आहे. स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. मात्र, पाऊस चांगला होत असल्याने या वर्षी उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. गहू गव्हाच्या (सप्टेंबर २०१८) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या (रु. १,८६२ ते रु. १,९९८). या सप्ताहात त्या रु. १,९८८ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,९६२ वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,०२२). पुढील दिवसात मर्यादित वाढ अपेक्षित आहे. गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या. (रु. ४,०५५ ते रु. ४,४५२). या सप्ताहात त्या २.४ टक्क्यांनी वाढून रु. ४,४६९ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती २.८ टक्क्यांनी वाढून रु. ४,३९८ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा डिसेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती २.५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,५१०). हरभरा हरभऱ्याच्या फ्युचर्स (सप्टेंबर २०१८) किमती जुलै महिन्यात १२ तारखेपर्यंत वाढत होत्या (रु. ३,६२८ ते रु. ४,४०८). नंतर त्या रु. ४,०९२ रु. ४,२९२ या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या ३.३ टक्क्यांनी वाढून रु. ४,३३१ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,२८२ वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा २.५ टक्क्यांनी अधिक आहेत. (रु. ४,३८८). आयातीवरील वाढत्या नियंत्रणामुळे व वाढत्या मागणीमुळे हरभऱ्यात वाढ अपेक्षित आहे. कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या. (रु. २२,८१० ते रु. २४,१२०). या सप्ताहात १ टक्क्यांनी घसरून त्या २३,७४० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २३,४२३ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. २३,१२० आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी अजूनतरी कापसाखाली लागवड कमी आहे. त्यामुळे किमतींत वाढीचा कल राहील. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किंमत प्रती १४० किलोची गाठी). arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com