agriculture story in marathi, forward market for agriculture commodities | Agrowon

खरीप मका, हळदीच्या भावात घसरण
डॉ. अरुण कुलकर्णी
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

या सप्ताहात कापूस, रब्बी मका, सोयाबीन व हरभरा यांचे भाव वाढले. इतरांचे कमी झाले किंवा स्थिर राहिले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत खरीप मका व हळद यांचे भाव घसरतील.
 

या सप्ताहात कापूस, रब्बी मका, सोयाबीन व हरभरा यांचे भाव वाढले. इतरांचे कमी झाले किंवा स्थिर राहिले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत खरीप मका व हळद यांचे भाव घसरतील.
 
या सप्ताहात केंद्र शासनाने रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर केले. गेल्या वर्षी गव्हाचा हमीभाव रु. १,७३५ होता. तो या वर्षी (२०१८-१९) रु. १,८४० पर्यंत वाढवला आहे. हरभऱ्याचा हमीभावसुद्धा रु. ४,४०० वरून रु. ४,६२० वर वाढवला आहे. सेबीने परवानगी दिल्यामुळे एनसीडीईएक्समध्ये आता (९ ऑक्टोबरपासून) हरभरा, गवार गम, सोयातेल व सोयाबीन यांच्यात ऑप्शन व्यवहार सुरू झाले आहेत. याचा फायदा आता शेतकऱ्यांना घेता येईल. किमतींच्या चढ-उतारांपासून संरक्षण करून घेणे त्यांना अधिक चांगल्या प्रकाराने उपलब्ध झाले आहे.

नोव्हेंबरपासून खरीप पिकांची आवक सुरू होईल. सध्या सणामुळे सर्वच वस्तूंची मागणी वाढत आहे. आयात कमी करणे व निर्यातीला उत्तेजन देणे हे भारतातील शासनाचे प्रमुख धोरण राहील. बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक राहावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील. सोयाबीन पेंडच्या निर्यातीवरील सवलत वाढवलेली आहे. हळदीच्या चीन व बांगलादेशमधील निर्यातीतसुद्धा वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. अमेरिका व चीन यांच्यामध्ये व्यापार संघर्ष वाढत आहे. भारतास त्याचा फायदा होऊ शकेल अशी अपेक्षा आहे. गेल्या सप्ताहातील एनसीडिएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मका
रब्बी मक्याच्या (नोव्हेंबर २०१८) किमती सप्टेंबर महिन्यात प्रथम घसरत होत्या (रु. १,४२४ ते रु. १,३५७). नंतर त्या वाढत महिनाअखेर रु. १,३९० पर्यंत गेल्या. या सप्ताहात त्या २.७ टक्क्यांनी वाढून रु. १,४१७ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,४०७ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,४४० वर आहेत. खरीप मका (सांगली) याचा नोव्हेंबर २०१८ डिलिव्हरी भाव १,४६० आहे. नवीन हमीभाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). अजून या डिलिव्हरीसाठी फारसे व्यवहार होत नाहीत.

साखर
साखरेच्या (डिसेंबर २०१८) किमती सप्टेंबर महिन्यात वाढत होत्या (रु. ३,०३६ ते रु. ३,१३९). या सप्ताहात त्या रु. ३,१०६ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१०० वर आल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. मे (२०१९) च्या फ्युचर्स किमती रु. ३,१०६ वर आल्या आहेत. साखरेतसुद्धा फारसे व्यवहार होत नाहीत.

सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (नोव्हेंबर २०१८) किमती सप्टेंबर महिन्यात रु. ३,२३३ व रु. ३,३६७ या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या १.३ टक्क्यांनी वाढून रु. ३,२२४ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,१७९ वर आल्या आहेत. नवीन हमीभाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). या वर्षी उत्पादन जरी वाढणार असले तरी निर्यात मागणी अनुकूल राहील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे ऑक्टोबरनंतर सोयाबीन हमीभावाच्या आसपास किंवा अधिक राहण्याची शक्यता आहे. १ ऑक्टोबर रोजी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी व मार्च डिलिव्हरीसाठी अनुक्रमे रु. ३,२७३, ३,३२४, ३,३६७ व ३,४१० भाव होते.

हळद
हळदीच्या फ्युचर्स(नोव्हेंबर)च्या किमती सप्टेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. ६,९२४ ते रु. ६,६५२). या सप्ताहात त्या २.६ टक्क्यांनी घसरून रु. ६,५९० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,८५५ वर आल्या आहेत. एप्रिल २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ९ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ६,५१०). स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. मात्र पाऊस चांगला होत असल्याने या वर्षी उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. पुढील काही दिवसात किमती वाढण्याची अपेक्षा आहे.

गहू
गव्हाच्या (नोव्हेंबर २०१८) किमती सप्टेंबर महिन्यात प्रथम वाढत रु. २,०६० पर्यंत गेल्या; नंतर त्या महिना अखेर रु. २,०४२ पर्यंत आल्या. या सप्ताहात त्या रु. २,०५१ वर स्थिर आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. २,०२१ वर आल्या आहेत. जानेवारी २०१९ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा १.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,०५९). पुढील काही दिवस मर्यादित वाढ अपेक्षित आहे. नवीन हमीभाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता).

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१८) किमती सप्टेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. ४,४८० ते रु. ४,३२५). या सप्ताहात त्या १.६ टक्क्यांनी घसरून रु. ४,२५४ वर स्थिर आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,२२३ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा जानेवारी २०१९ मधील फ्युचर्स किमती १.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,२७१). या वर्षी उत्पादन जरी कमी असले तरी तेल उद्योगाकडून मागणीसुद्धा कमी असेल, अशी भावना आहे.

हरभरा
हरभऱ्याच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१८) किमती सप्टेंबर महिन्यात रु. ३,९७१ व रु. ४,१३६ या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या १.१ टक्क्यांनी वाढून रु. ४,१५७ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,१८९ वर आल्या आहेत. जानेवारी २०१९ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ३.८ टक्क्यांनी अधिक आहेत. (रु. ४,३५०). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सणामुळे या पुढील दिवसात मागणी वाढेल. नवीन हमीभाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता).

कापूस
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१८) किमती सप्टेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. २२,९३० ते रु. २१,८७०). या सप्ताहात त्या १.८ टक्क्यांनी वाढून रु. २२,३४० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २१,९५८ वर आल्या आहेत. जानेवारी २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २२,६४० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. गुजरातमधील कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. चीनने भारताकडून होणारी आयात रद्द केली आहे. त्याचप्रमाणे या वर्षी जागतिक उत्पादन आणि वर्षअखेर साठा वाढणारा असेल, असा अंदाज सप्टेंबर महिन्याच्या यूएसडीए अहवालात व्यक्त केला गेला आहे. (सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किमत प्रती १४० किलोची गाठी).
 
arun.cqr@gmail.com

इतर अॅग्रोमनी
बांबू व्यापाराला चांगली संधीयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा...
भारतातील पाच कडधान्यांच्या हमीभावावर...वॉशिंग्टन : भारतात पाच कडधान्यांना दिल्या...
भारतीय चवीच्या चॉकलेटची वाढती बाजारपेठकार्तिकेयन पलानीसामी आणि हरीश मनोज कुमार या दोघा...
सुधारित पट्टापेर पद्धतीने वाढले एकरी ३१...पारंपरिक पद्धतीने सोयाबीन तूर हे आंतरपीक अनेक...
चीन, अमेरिकेचे कापूस उत्पादन पुढील...जळगाव : देशात ३१ जानेवारीअखेर सुमारे १८० लाख...
कापूस, गवार बी आणि हरभऱ्याचे भाववाढीचे...या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने साखर वगळता...
हरभरा निर्यात, स्थानिक मागणीत वाढ या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका व गहू...
सीताफळाच्या मूल्यवर्धनातून घेतला...`उद्योगाच्या घरी, रिद्धीसिद्धी पाणी भरी`, अशी...
कापसाच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू वगळता...
हलव्याच्या कार्यक्रमाने अर्थसंकल्पाची...नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
कृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य...२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
हरभऱ्याला वाढती मागणी या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू...
भात निर्यातीसाठी मागणीबरोबरच भूराजकीय...भारतीय भात निर्यातदारांच्या वाढीसाठी जागतिक...
मका, साखर, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन...
अर्थमंत्री जेटली १ फेब्रुवारीला...नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार त्यांच्या...
कापूस उद्योगाचे अमेरिका-चीनच्या...जळगाव : चीन व अमेरिकेत मागील नऊ महिन्यांपासून...
सातत्याने ताळेबंद तपासत शेती राखली...जळगाव जिल्ह्यातील नायगाव (ता. मुक्ताईनगर) येथील...
हळदीच्या निर्यात मागणीत वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सर्वच शेती...