हळद वगळता सर्व शेतमालाचे भाव तेजीत

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

या सप्ताहात साखर, सोयबीन व हळद वगळता सर्व पिकांचे भाव वाढले. या पिकांत झालेली घटसुद्धा अल्प होती. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत हळद वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील. यापुढे खरीप पिकांची आवक सुरू होईल. यामुळे या पिकांच्या भावात तात्पुरती घट होईल. मात्र या वर्षी उत्पादनात वाढ होण्याची शक्यता नसल्याने व स्थानिक आणि निर्यात मागणीत होणारी वाढ लक्षात घेता त्यानंतर किमती वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आयात कमी करणे व निर्यातीला उत्तेजन देणे हे भारतातील शासनाचे प्रमुख धोरण राहील. बाजार भाव हमी भावापेक्षा अधिक राहावेत, यासाठी शासन प्रयत्नशील राहील. सोयाबीन पेंडच्या निर्यातीवरील सवलत वाढवलेली आहे. हळदीच्या चीन व बांगलादेशामधील निर्यातीतसुद्धा वाढ होईल अशी अपेक्षा आहे. अमेरिका व चीन यांच्यामध्ये व्यापार संघर्ष वाढत आहे. भारतास त्याचा फायदा होऊ शकेल अशी अपेक्षा आहे. हरभऱ्याची निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्न होतील. शासनाने तेलबिया व डाळी हमीभावाने खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांचाही भाव वाढण्यावर परिणाम होईल. जागतिक पातळीवर गहू, तांदूळ व कापूस यांच्या उत्पादनांत या वर्षी घट संभवते. खनिज तेलाच्या किमतींत सुद्धा वाढ होतेय. या सर्व घटनांमुळे या वर्षी बहुतेक सर्व शेती मालाचे भाव तेजीत असतील. गेल्या सप्ताहातील एनसीडीएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मका रब्‍बी मक्याच्या (डिसेंबर २०१८) किमती ऑक्टोबर महिन्यात वाढत होत्या (रु. १,३८७ ते रु. १,४९३). या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी वाढून रु. १,५२८ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,५१९ वर आल्या आहेत. खरीप मक्याच्या (डिसेंबर २०१८) किमतीसुद्धा ऑक्टोबर महिन्यात वाढत होत्या (रु. १,४६३ ते रु. १,५६०). खरीप मका (सांगली) चा डिसेंबर २०१८ डिलिवरी भाव १.३ टक्क्यांनी वाढून रु. १,५९१ वर आला आहे. नवीन हमी भाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). मागणी चांगली आहे. भाव वाढण्याची शक्यता आहे.

साखर साखरेच्या (डिसेंबर २०१८) किमती ऑक्टोबर महिन्यात १९ तारखेपर्यंत रु. ३०९२ पर्यंत घसरल्या. त्यानंतर त्या वाढत आहेत. या सप्ताहात त्या रु. ३,०९४ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,०७१ वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. साखरेत फारसे व्यवहार होत नाहीत.

सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (डिसेंबर २०१८) किमती ऑक्टोबर महिन्यात वाढत होत्या (रु. ३,२३३ ते रु. ३,३७८). या सप्ताहात त्या ०.३ टक्क्यांनी कमी होऊन रु. ३,४३९ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमतीमात्र २.१ टक्क्यांनी वाढून रु. ३,४२२ वर आल्या आहेत. नवीन हमी भाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). या वर्षी उत्पादन जरी वाढणार असले तरी निर्यात मागणी अनुकूल राहील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या महिन्यात किमती हमी भावाच्या आसपास किंवा अधिक राहण्याची शक्यता आहे. १३ नोव्हेंबर रोजी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च व एप्रिल डिलिवरी साठी अनुक्रमे रु. ३,४९०, ३,५४६, ३,६१८ व ३,६९० भाव होते. पुढील काही दिवस भाव वाढण्याची शक्यता आहे.

हळद हळदीच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१८)च्या किमती ऑक्टोबर महिन्यात १६ तारखेपर्यंत घसरत होत्या (रु. ६,८३६ ते रु. ६,४९६). नंतर त्या वाढत आहेत. या सप्ताहात त्या रु. ६,६२४ वर आल्या आहेत. आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,१९१ वर आल्या आहेत. मे २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ५.७ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ६,७८०). स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. पुढील काही दिवस भाव वाढण्याची शक्यता आहे.

गहू गव्हाच्या (डिसेंबर २०१८) किमती ऑक्टोबर महिन्यात घसरत होत्या (रु. २,०७९ ते रु. २,०४०). या सप्ताहात त्या ०.६ टक्क्यांनी वाढून रु. २,०७६ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. २,०६१ वर स्थिर आहेत. फेब्रुवारी २०१९ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ५.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु.२,१६६). पुढील काही दिवस मर्यादित वाढ अपेक्षित आहे. नवीन हमी भाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता).

गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१८) किमती ऑक्टोबर महिन्यात वाढत होत्या (रु. ४,३११ ते रु. ४,८४४). या सप्ताहात त्या १.७ टक्क्यांनी वाढून रु. ४,७७९ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,७५० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा फेब्रुवारी २०१९ मधील फ्युचर्स किमती ३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,८९४). किमतींत वाढ अपेक्षित आहे.

हरभरा हरभऱ्याच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१८) किमती ऑक्टोबर महिन्यात घसरत होत्या. (रु. ४,२४६ ते रु. ३,९८१). गेल्या सप्ताहात त्या विक्रमी १०.८ टक्क्यांनी वाढून रु. ४,४२१ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २.७ टक्क्यांनी वाढून रु. ४,५४३ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती ७.३ टक्क्यांनी वाढून रु. ४,५६० वर आल्या आहेत. मार्च २०१९ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमती एव्हड्याच आहेत. (रु. ४,५६१). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन हमी भाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता). अपुऱ्या पावसामुळे हरभऱ्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.

कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१८) किमती ऑक्टोबर महिन्यात २२ ऑक्टोबरपर्यंत वाढत होत्या (रु. २२,०८० ते रु. २२,९८०). नंतर त्या काहीशा घसरल्या. या सप्ताहात त्या ०.६ टक्क्यांनी वाढून रु. २२,५०० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २२,०८० वर आल्या आहेत. फेब्रुवारी २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २२,९४० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. गुजरातमधील कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आवक उशिरा होईल असा अंदाज आहे. पुढील वर्षी चीन भारतावर अधिक अवलंबून असेल असा अंदाज आहे. किमती वाढण्याची शक्यता आहे. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किंमत प्रती १४० किलोची गाठ).   arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com