मका, हळद वगळता इतर शेतमालाच्या भावात वाढ

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस व गवार बी यांचे भाव उतरले. मक्याचे व साखरेचे भाव स्थिर राहिले. हळदीचे भाव वाढले. गव्हातील वाढ हंगामी स्वरूपाची आहे. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत खरीप मका व हळद वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील. सध्या खरीप पिकांची आवक सुरू झाली आहे. आयात कमी करणे व निर्यातीला उत्तेजन देणे हे भारतातील शासनाचे प्रमुख धोरण आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक राहावेत यासाठी शासन प्रयत्नशील आहे. हळदीच्या चीन व बांगला देशमधील निर्यातीतसुद्धा वाढ होईल अशी अपेक्षा आहे. हरभऱ्याची निर्यात व स्थानिक मागणी वाढत आहे. शासनाने तेलबिया व डाळी हमीभावाने खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे, त्याचाही भाव वाढण्यावर परिणाम होईल. खनिज तेलाच्या किमतींत आता घट होतेय, त्यामुळे गवार गमच्या निर्यातीवर विपरीत परिणाम होईल या भीतीने गवार बीच्या किमती गेल्या महिन्यात कमी होत होत्या. तोच कल या सप्ताहात दिसत आहे. गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते. मका खरीप मक्याच्या (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात रु. १६०० च्या आसपास स्थिर होत्या. या सप्ताहात त्यांत बदल झाला नाही. स्पॉट किमती (सांगली) ६ टक्क्यांनी वाढून रु. १८२८ वर आल्या आहेत. हमीभाव रु. १७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १४२५ होता). बाजारातील किमती आता हमीभावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. रब्बीचे उत्पादन चांगले होईल अशी अपेक्षा आहे. साखर साखरेच्या (मार्च २०१९) किमती नोव्हेंबरमध्ये घसरत होत्या (रु. ३१६१ ते रु. ३०१०). या सप्ताहात त्या रु. २९९५ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. २९९३ वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. साखरेत फारसे व्यवहार होत नाहीत; पण एकूण कल घसरणीचा आहे. सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. ३५१५ ते रु. ३३७७). या सप्ताहात त्या रु. ३३६२ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३४३० वर आल्या आहेत. नवीन हमीभाव रु. ३३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३०५० होता). या वर्षी उत्पादन जरी वाढणार असले, तरी निर्यात मागणी अनुकूल राहील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या महिन्यात किमती हमीभावाच्या आसपास किंवा अधिक राहण्याची शक्यता आहे. ११ डिसेंबर रोजी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे डिलिवरीसाठी अनुक्रमे रु. ३३६२, ३४०३, ३४४०, ३४७० व ३५०४ भाव होते. हळद हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९)च्या किमती नोव्हेंबर महिन्यात रु. ६४४८ व रु. ६७८६ या दरम्यान चढ-उतार अनुभवत होत्या. या महिन्यात त्या वाढत आहेत. या सप्ताहात त्या गेल्या सप्ताहाच्या तुलनेने ३.३ टक्क्यांनी वाढून रु. ६७७६ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७०४८ वर आल्या आहेत. जून २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ३.४ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ६८०८). स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. गहू गव्हाच्या (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या (रु. २०६४ ते रु. २१४०). या सप्ताहात त्या १ टक्क्याने वाढून रु. २१२१ वर आल्या आहेत. जून २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २२१५). पुढील काही दिवस मर्यादित वाढ अपेक्षित आहे. नवीन हमीभाव रु. १८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १७३५ होता). गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. ४६९७ ते रु. ४३५४). या सप्ताहात त्या ३.२ टक्क्यांनी घसरून रु. ४२६७ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४२८३ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा मार्च २०१९ मधील फ्युचर्स किमती २.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४३७९). खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर पुढील घट किंवा वाढ अवलंबून आहे. हरभरा हरभऱ्याच्या फ्युचर्स (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या. (रु. ४०७७ ते रु. ४७०४). या सप्ताहात त्या ०.२ टक्क्यांनी वाढून रु. ४४९३ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४४१५ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा एप्रिल २०१९ मधील फ्युचर्स किमती ४.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४६२१). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन हमीभाव रु. ४६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४४०० होता). अपुऱ्या पावसामुळे हरभऱ्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. मागणी मात्र वाढती आहे. रब्बीची आवक सुरू झाल्यावर बाजारभाव हमीभावाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या. (रु. २२,९३० ते रु. २१,७१०). या सप्ताहात त्या २.९ टक्क्यांनी घसरून रु. २१,८०० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २१,३५२ वर आल्या आहेत. मार्च २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २२,३०० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखालील लागवड कमी आहे. गुजरातमधील कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. लांबवरचा कल वाढता आहे. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किंमत प्रती १७० किलोची गाठ). arun.cqr@gmail.com 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com