गहू, हरभऱ्याच्या फ्युचर्स किमतींचा उतरता कल

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

या सप्ताहात कापसाचे व सोयाबीनचे भाव वाढले, इतरांचे भाव उतरले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत कापूस, मका, सोयाबीन व गवार बीचे भाव वाढतील. साखरेचे भाव वाढत्या गळीतामुळे कमी होतील. अधिक रब्बी उत्पादनाच्या अपेक्षेने गहू व हरभरा यांचे भाव उतरतील. एक डिसेंबरपासून एनसीडीईएक्समध्ये एप्रिल २०१८ डिलिव्हरीसाठी खरीप मका, रब्बी मका, गहू व गवार बी यांचे, मे २०१८ डिलिव्हरीसाठी सोयाबीन व हरभरा यांचे, जुलै २०१८ डिलिव्हरीसाठी हळदीचे, तर जुलै २०१९ डिलिव्हरीसाठी साखरेचे व्यवहार सुरू झाले. एमसीएक्समध्येसुद्धा मे २०१८ डिलिव्हरीसाठी कापसाचे व्यवहार चालू झाले.

मका खरीप मक्याच्या (जानेवारी २०१८) किमती नोव्हेंबर महिन्यात सतत घसरत होत्या (रु. १,३८९ ते रु. १,३५९). या सप्ताहात त्या रु. १,३५९ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (निझामाबाद) रु. १,३५२ वर आल्या आहेत. मार्चमधील फ्युचर्स किमती रु. १,३७३ वर आल्या आहेत.

हमी भाव गेल्या वर्षी रु. १,३६५ होता. या वर्षी तो रु. १,४२५ वर नेला आहे. २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी खरीप मक्याचे उत्पादन घसरून १८.७३ दशलक्ष टनांवर होणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन : १९.२४ दशलक्ष टन). मागणी चांगली आहे. खरीप पिकाच्या पुढील काही महिन्यांतील आवकेमुळे किमती हमीभावाच्या खाली राहण्याचा शक्यता आहे.

साखर साखरेच्या (जानेवारी २०१८) किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या. (रु. ३,३१० ते रु. ३,२१६). या सप्ताहात त्या रु. ३,२३१ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,४२५ वर आल्या आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जुलैच्या (२०१८) फ्युचर्स किमती रु. ३,२१६ वर आल्या आहेत. सध्या साठा पुरेसा आहे. नवीन हंगामाचे उत्पादन आता सुरू झाले आहे. २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी भारतातील उसाचे उत्पादन वाढून ते ३३७.३ दशलक्ष टनांवर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन : ३०६.७ दशलक्ष टन).

सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (जानेवारी २०१८) किमती १५ नोव्हेंबरपासून सतत वाढत आहेत. (रु. २,८८३ ते रु. ३,१३८). गेल्या सप्ताहाच्या तुलनेने या सप्ताहात त्या २.१ टक्क्यांनी वाढून रु. ३,११९ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,०५२ वर आल्या आहेत. एप्रिल २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,३२१ वर आल्या आहेत. हमीभाव (बोनससहित) गेल्या वर्षी रु. २,७७५ होता. या वर्षी तो रु. ३,०५० वर नेला आहे.

खाद्य तेल-उद्योगाची मागणी वाढत आहे. अर्जेन्टिनामधील कोरडी हवा तेथील उत्पादनावर विपरीत परिणाम करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अमेरिकेतील भावसुद्धा वाढले आहेत. शासनाने हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. सोया पेंडीच्या निर्यातीतसुद्धा वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे पुढील काही महिने किमतींत वाढीचा कल राहण्याचा संभव आहे.

हळद हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती १५ नोव्हेंबरपासून वाढत होत्या (रु. ६,९८८ ते ७,८०८). याही सप्ताहात त्या रु. ७,३६० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,६७७ वर आल्या आहेत. जून २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १.३ टक्क्याने कमी आहेत (रु. ७,५७३). वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. मात्र निर्यात्त व देशांतर्गत मागणी वाढती आहे. पुढील काही दिवसांत किमती वाढण्याची शक्यता आहे.

गहू नोव्हेंबर महिन्यात गव्हाच्या (जानेवारी २०१८) किमती घसरत होत्या.(रु. १,७९७ ते रु. १,६९१). या सप्ताहात त्या रु. १,६८६ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (दिल्ली) रु. १,८१३ वर आल्या आहेत. मार्च २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा २ टक्क्यांनी कमी आहेत. (रु. १,७७६). पुढील वर्षाचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मर्यादित घसरण अपेक्षित आहे. शासनाचा हमीभाव (बोनससहित) रु. १,७३५ आहे.

गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (जानेवारी २०१८) किमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या (रु. ३,६६६ ते रु. ३,९७४). या सप्ताहात त्या रु. ३,९११ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ३,९१० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा मार्च २०१८ मधील फ्युचर्स किमती ५.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,१३२). आवक वाढती आहे. मात्र मागणीसुद्धा वाढती आहे. किमतींत वाढ अपेक्षित आहे.

हरभरा नोव्हेंबर महिन्यात हरभऱ्याच्या फ्युचर्स (जानेवारी २०१८) किमती वाढत होत्या (रु. ४,५४७ ते ४,९५०). या सप्ताहात त्या ८.५ टक्क्यांनी घसरून रु. ४,४६२ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,४६१ वर उतरल्या आहेत. उत्पादनवाढीच्या अपेक्षेने एप्रिल २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ७.२ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ४,१३०). शासनाचा हमीभाव (बोनससहित) रु. ४,४०० आहे.

कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (जानेवारी २०१८) किमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या (रु. १८,२४० ते रु. १८,९१०). या सप्ताहात त्या ३.१ टक्क्यांनी वाढून रु. १९,२१० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १८,५०७ वर आल्या आहेत.

एप्रिल २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ०.५ टक्क्याने अधिक आहेत (रु. १८,६००). प्रथम अंदाजानुसार या वर्षी कापसाचे उत्पादन घसरून ३२.३ दशलक्ष गाठीवर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन : ३३.१ दशलक्ष गाठी). मागणी चांगली आहे. लांबवरचा कल वाढता आहे. (सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किमत प्रति १४० किलोची गाठी).   arun.cqr@gmail.com  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com