अधिक उत्पादनामुळे गहू, हरभरा फ्युचर्स भावात घसरण

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

या सप्ताहात खरीप मका व साखर वगळता सर्वच शेतीमालाचे भाव वाढले. इतरांचे भाव उतरले. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका, सोयाबीन व गवार बीचे भाव वाढतील. अधिक रब्बी उत्पादनाच्या अपेक्षेने साखर, हळद, गहू व हरभरा यांचे भाव उतरतील. गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते. मका खरीप मक्याच्या (जानेवारी २०१८) किमती नोव्हेंबर महिन्यात सतत घसरत होत्या. (रु. १,३८९ ते रु. १,३५९). या सप्ताहातसुद्धा त्या ०.६ टक्क्यांनी घसरून रु. १,३३४ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (निझामाबाद) रु. १,३२६ वर आल्या आहेत. मार्च २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,३४८ वर आल्या आहेत.

हमीभाव रु. १,४२५ आहे. रब्बी मक्याची एप्रिल २०१८ च्या डिलिव्हरीची फ्युचर्स किमत रु. १,२०० आहे. २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी खरीप मक्याचे उत्पादन घसरून १८.७३ दशलक्ष टनावर होणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन: १९.२४ दशलक्ष टन). मागणी कमी झाली आहे. रब्बी पिकाच्या अपेक्षेने किमती हमीभावाच्या खाली राहण्याचा संभव आहे.

साखर साखरेच्या (जानेवारी २०१८) किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या. (रु. ३,३१० ते रु. ३,२१६). या सप्ताहात त्या २.६ टक्क्यांनी घसरून रु. ३,२६७ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,५४४ वर आल्या आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जुलै(२०१८)च्या फ्युचर्स किमती रु. ३,२६७ वर आल्या आहेत. सध्या साठा पुरेसा आहे.

नवीन हंगामाचे उत्पादन आता सुरू झाले आहे. १९ डिसेंबर रोजी केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार या वर्षी भारतातील साखरेचे उत्पादन २४९ लाख टन होईल. (गेल्या वर्षीचे उत्पादन: २५० लाख टन). मात्र गेल्या वर्षीचा साठा लक्षात घेता या वर्षी पुरेसा पुरवठा होईल व साखरेचे भाव स्थिर राहतील. त्यामुळे शासनाची साठ्यावरील व विक्रीवरील बंधने आता काढून टाकण्यात आली आहेत.

सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (जानेवारी २०१८) किमती १५ नोव्हेंबरपासून सतत वाढत आहेत. (रु. २,८८३ ते रु. ३,१३८). गेल्या सप्ताहाच्या तुलनेने या सप्ताहात त्या ०.६ टक्क्यांनी वाढून रु. ३,०७७ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,०८६ वर आल्या आहेत. एप्रिल २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,२४६ वर आल्या आहेत. हमीभाव (बोनस सहित) रु. ३,०५० आहे.

खाद्यतेल उद्योगाची मागणी वाढत आहे. अर्जेंटिनामधील हवा सुधारत आहे. त्यामुळे तेथील उत्पादन पूर्ववत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अमेरिकेतील भावसुद्धा कमी झालेले आहेत. शासनाने हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. सोपाने पुढील वर्षी सोया पेंडीच्या निर्यातीत वाढ होऊन ती २० लाख टनांवर जाईल, असा अंदाज केला आहे (मागील वर्षीची निर्यात: १५ लाख टन). त्यामुळे पुढील काही महिने किमतीत वाढीचा कल राहण्याचा संभव आहे.

हळद हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती १५ नोव्हेंबरपासून वाढत होत्या (रु. ६,९८८ ते ७,८०८). या सप्ताहात त्या २ टक्क्यांनी वाढून रु. ७,५२८ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,६९७ वर आल्या आहेत. जून २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने १.३ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ७,५९४). वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. मात्र निर्यात्त व देशांतर्गत मागणी वाढती आहे. पुढील काही दिवसांत किमती वाढण्याचा संभव आहे.

गहू नोव्हेंबर महिन्यात गव्हाच्या (जानेवारी २०१८) किमती घसरत होत्या. (रु. १,७९७ ते रु. १,६९१). या सप्ताहात त्या १.३ टक्क्यांनी वाढून रु. १,६८२ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (दिल्ली) रु. १,७८५ वर आल्या आहेत. मार्च २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ३.१ टक्क्यांनी कमी आहेत (रु. १,७२९). पुढील वर्षाचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मर्यादित घसरण अपेक्षित आहे. शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. १,७३५ आहे.

गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (जानेवारी २०१८) किमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या (रु. ३,६६६ ते रु. ३,९७४). या सप्ताहात त्या ३.९ टक्क्यांनी वाढून रु. ३,९५० वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ३,९९२ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा मार्च २०१८ मधील फ्युचर्स किमती १.४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,०४७). मागणी वाढती आहे.

हरभरा नोव्हेंबर महिन्यात हरभऱ्याच्या फ्युचर्स (जानेवारी २०१८) किमती वाढत होत्या (रु. ४,५४७ ते ४,९५०). गेल्या सप्ताहात त्या ८.६ टक्क्यांनी घसरल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.४ टक्क्यांनी वाढून रु. ४,०९५ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,१७९ वर आल्या आहेत. उत्पादन वाढीच्या अपेक्षेने एप्रिल २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ३ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ३,८९५). शासनाचा हमीभाव (बोनस सहित) रु. ४,४०० आहे. त्यामुळे हरभऱ्याची घसरण थांबविण्यासाठी शासनाचे प्रयत्न राहतील.

कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (जानेवारी २०१८) किमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या (रु. १८,२४० ते रु. १८,९१०). गेल्या सप्ताहात त्या १.७ टक्क्यांनी वाढल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा १.५ टक्यांनी वाढून रु. १९,८०३ वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १९,०५३ वर आल्या आहेत. एप्रिल २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ०.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १९,२००). प्रथम अंदाजानुसार या वर्षी कापसाचे उत्पादन घसरून ३२.३ दशलक्ष गाठीवर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन: ३३.१ दशलक्ष गाठी). मागणी चांगली आहे. लांबवरचा कल वाढता आहे (सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किमत प्रति १४० किलोची गाठी). arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com