गहू, हरभऱ्याच्या भावावर ठेवा लक्ष

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

या सप्ताहात रब्बी मका, गवार बी व हरभरा वगळता सर्वच शेतीमालांचे भाव उतरले. या तीन पिकातील झालेली वाढसुद्धा नगण्य होती. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत कापूस, सोयाबीन, हळद व गवार बीचे भाव वाढतील. अधिक रब्बी उत्पादनाच्या अपेक्षेने गहू व हरभरा यांचे भाव उतरतील. गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मका खरीप मक्याच्या (फेब्रुवारी २०१८) किमती या सप्ताहात ०.३ टक्क्यांनी घसरून रु. १,३२७ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (निझामाबाद) रु. १,३१५ वर आल्या आहेत. एप्रिल २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,३४० वर आल्या आहेत. हमी भाव रु. १,४२५ आहे. रबी मक्याची एप्रिल २०१८ च्या डिलिवरीची फ्युचर्स किंमती रु. १,१८१ आहे. रबी पिकाच्या अपेक्षेने किमती हमी भावाच्या खाली राहण्याचा संभव आहे.

साखर साखरेच्या (फेब्रुवारी २०१८) किमती या सप्ताहात त्या १.९ टक्क्यांनी घसरून रु. ३,२०७ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,२७० वर आल्या आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जुलै (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. ३,२०७ वर आल्या आहेत. सध्या साठा पुरेसा आहे. नवीन हंगामाचे उत्पादन आता सुरु झाले आहे. १९ डिसेंबर रोजी केंद्र शासनाने प्रसिध्द केलेल्या अंदाजानुसार या वर्षी भारतातील साखरेचे उत्पादन २४९ लाख टन होईल.

सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (फेब्रुवारी २०१८) किमती या सप्ताहात त्या रु. ३,१३५ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,१५६ वर आल्या आहेत. मे २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,३३८ वर आल्या आहेत. हमी भाव (बोनस सहित) रु. ३,०५० आहे. खाद्य तेल-उद्योगाची मागणी वाढत आहे. अर्जेन्टिना मधील हवा सुधारत आहे. त्यामुळे तेथील उत्पादन पूर्ववत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अमेरिकेतील भाव सुद्धा कमी झालेले आहेत. शासनाने हमी भावाने सोयाबीन खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. पुढील वर्षी सोया पेंडीच्या निर्यातीत वाढ होऊन ती २० लाख टनांवर जाईल असा अंदाज केला गेला आहे (मागील वर्षीची निर्यात : १५ लाख टन). त्यामुळे पुढील काही महिने किमतींत वाढीचा कल राहण्याचा संभव आहे.

हळद हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती या सप्ताहात रु. ७,८०२ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,७९० वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ८,०१४). वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. मात्र देशांतर्गत मागणी वाढती आहे. पुढील काही दिवसांत किमती वाढण्याचा संभव आहे.

गहू ११ डिसेंबरपासून गव्हाच्या (फेब्रुवारी २०१८) किमती या सप्ताहात २.६ टक्क्यांनी घसरून रु. १,६८८ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (दिल्ली) रु. १,८०६ वर आल्या आहेत. एप्रिल २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ६.५ टक्क्यांनी कमी आहेत (रु. १,६८९). पुढील वर्षाचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मर्यादित घसरण अपेक्षित आहे. शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. १,७३५ आहे.

गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (फेब्रुवारी २०१८) किमती १२ डिसेंबरपासून वाढत होत्या. या सप्ताहातसुद्धा त्या रु. ४,१९० वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,१६८ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा एप्रिल २०१८ मधील फ्युचर्स किमती ३.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३२८). मागणी वाढती आहे; किमतीतील तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे.

हरभरा १४ डिसेंबर नंतर हरभऱ्याच्या फ्युचर्स (मार्च २०१८) किमती या सप्ताहात रु. ३,७९४ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,१२९ वर आल्या आहेत. उत्पादन वाढीच्या अपेक्षेने मे २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमती पेक्षा १.८ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ३,८७६). शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. ४,४०० आहे. एप्रिल नंतर भाव घसरू नयेत यासाठी शासनाचे प्रयत्न राहतील. आयात शुल्क त्यामुळे ३० टक्के लावण्यात आले आहे. विक्रीवरील स्पेशल मार्जिनसुद्धा वाढवले आहे.

कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (फेब्रुवारी २०१८) किमती डिसेंबर महिन्यात वाढत होत्या. या सप्ताहात त्या रु. २०,२८० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १९,६७६ वर आल्या आहेत. मे २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा २.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २०,१००). कपाशीचा एप्रिल २०१८ डिलीवरी भाव प्रति २० किलोसाठी रु. ९८६ आहे. प्रथम अंदाजानुसार या वर्षी कापसाचे उत्पादन घसरून ३२.३ दशलक्ष गाठीवर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन: ३३.१ दशलक्ष गाठी). मागणी चांगली आहे. लांबवरचा कल वाढता आहे. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रति १४० किलोची गाठी).   arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com