कापूस, सोयाबीनच्या फ्युचर्स भावात वाढ

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

या सप्ताहात सोयाबीन व गवार बीचे भाव मोठ्या प्रमाणावर (अनुक्रमे ३.८ व ४.३ टक्क्यांनी) चढले. मका, साखर व हळद यांचे भाव उतरले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत कापूस, मका, साखर, सोयाबीन, हळद व गवार बी यांचे भाव वाढतील. अधिक रब्बी उत्पादनाच्या अपेक्षेने गहू व हरभरा यांचे भाव उतरतील. या मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर (१४ जानेवारी रोजी) गवार बीच्या १० टनाच्या करारासाठी एनसीडीइएक्समध्ये ऑप्शन व्यवहार सुरू होत आहेत. जानेवारीपासून ते फेब्रुवारी २०१८, मार्च २०१८ व एप्रिल २०१८ डिलिवरीसाठी सुरू झाले आहेत. पुढील व्यवहारांची कार्यक्रम पत्रिकासुद्धा प्रकाशित झाली आहे. शेतमालाच्या फ्युचर्समध्ये हे क्रांतिकारी पाऊल उचलले गेले आहे. गवार बीनंतर सोयाबीनसारख्या इतर शेतमालाचे ऑप्शन व्यवहारसुद्धा सुरू होतील अशी अपेक्षा आहे. ऑप्शन व्यवहार कसे करावेत व त्यांचे फायदे कसे मिळवावेत, याविषयी पुढील सप्ताहात एका विशेष लेखात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. सोयाबीन आत्ता स्पॉटमध्ये न विकता मे फ्युचर्समध्ये विकला तर ४.२ टक्क्यांनी अधिक भाव (रु. ३,४३८) मिळेल. मका व गवार बीचे भाव एप्रिलमध्ये २.७ व ३.५ टक्क्यांनी अधिक (अनुक्रमे रु. १,३३४ व रु. ४,५०४) मिळतील. कापसाचे भाव मार्चमध्ये ४.७ टक्क्यांनी अधिक मिळतील (रु. २०,६००). गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मका खरीप मक्याच्या (फेब्रुवारी २०१८) किमती या सप्ताहातसुद्धा ०.५ टक्क्यांनी घसरून रु. १,३२० वर आल्या आहेत. स्पॉट किमती (निझामाबाद) रु. १,२९९ वर आल्या आहेत. एप्रिल २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,३३४ वर आल्या आहेत. हमी भाव रु. १,४२५ आहे. रबी मक्याची एप्रिल २०१८ च्या डिलिवरीची फ्युचर्स किंमत रु. १,१६५ आहे. रब्बी पिकाच्या अपेक्षेने किमती हमीभावाच्या खाली राहण्याचा संभव आहे.

साखर साखरेच्या (फेब्रुवारी २०१८) किमती डिसेंबर महिन्यात रु. ३२७१ च्या आसपास होत्या. या सप्ताहात त्या १ टक्क्यांनी घसरून रु. ३,१७५ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,२३४ वर आल्या आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जुलै (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. ३,२६९ वर आल्या आहेत. सध्या साठा पुरेसा आहे. नवीन हंगामाचे उत्पादन आता सुरू झाले आहे. १९ डिसेंबर रोजी केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार या वर्षी भारतातील साखरेचे उत्पादन २४९ लाख टन होईल. (गेल्या वर्षीचे उत्पादन : २५० लाख टन). मात्र गेल्या वर्षीचा साठा लक्षात घेता या वर्षी पुरेसा पुरवठा होईल व साखरेचे भाव स्थिर राहतील. त्यामुळे शासनाची साठ्यावरील व विक्रीवरील बंधने आता काढून टाकण्यात आली आहेत.

सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (फेब्रुवारी २०१८) किमती या सप्ताहात त्या ३.८ टक्क्यांनी वाढून रु. ३,२५३ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती ४.५ टक्क्यांनी वाढून रु. ३,२९८ वर आल्या आहेत. मे २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,४३८ वर आल्या आहेत. हमीभाव (बोनससहित) रु. ३,०५० आहे. खाद्य तेल-उद्योगाची मागणी वाढत आहे. शासनाने हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. पुढील वर्षी सोया पेंडीच्या निर्यातीत वाढ होऊन ती २० लाख टनावर जाईल असा अंदाज केला गेला आहे (मागील वर्षीची निर्यात : १५ लाख टन). त्यामुळे पुढील काही महिने किमतींत वाढीचा कल राहण्याचा संभव आहे.

हळद हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती या सप्ताहात त्या २.८ टक्क्यांनी घसरून रु. ७,५८२ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,६४० वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ३.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ७,८९२). वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. मात्र देशांतर्गत मागणी वाढती आहे. पुढील काही दिवसांत किमती वाढण्याचा संभव आहे.

गहू गव्हाच्या (फेब्रुवारी २०१८) किमती या सप्ताहात त्या रु. १,६८९ वर स्थिर आहेत. स्पॉट किमती (दिल्ली) रु. १,८०० वर आल्या आहेत. एप्रिल २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ५.७ टक्क्यांनी कमी आहेत (रु. १,६९७). पुढील वर्षाचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मर्यादित घसरण अपेक्षित आहे. शासनाचा हमी भाव (बोनससहित) रु. १,७३५ आहे.

गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (फेब्रुवारी २०१८) किमती या सप्ताहात ४.३ टक्क्यांनी वाढून रु. ४,३६९ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,३५० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा एप्रिल २०१८ मधील फ्युचर्स किमती ३.५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,५०४). मागणी वाढती आहे; किमतीतील तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे.

हरभरा हरभऱ्याच्या फ्युचर्स (मार्च २०१८) किमती वाढत होत्या (रु. ३,७१६ ते ३,८२४). या सप्ताहात त्या रु. ३,८०८ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,००० वर आल्या आहेत. उत्पादनवाढीच्या अपेक्षेने मे २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा १.१ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ३,८९२). शासनाचा हमीभाव (बोनससहित) रु. ४,४०० आहे. एप्रिलनंतर भाव घसरू नयेत यासाठी शासनाचे प्रयत्न राहतील. आयात शुल्क त्यामुळे ३० टक्के लावण्यात आले आहे. विक्रीवरील स्पेशल मार्जिनसुद्धा वाढवले आहे.

कापूस कापसाच्या फ्युचर्स (फेब्रुवारी २०१८) किमती या सप्ताहात ०.३ टक्क्यांनी वाढून रु. २०,३५० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १९,६८० वर आल्या आहेत. मे २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा २.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २०,१००). कपाशीचा एप्रिल २०१८ डिलिवरी भाव (NCDEX) प्रति २० किलोसाठी रु. ९७३ आहे. प्रथम अंदाजानुसार या वर्षी कापसाचे उत्पादन घसरून ३२.३ दशलक्ष गाठीवर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन: ३३.१ दशलक्ष गाठी). मागणी चांगली आहे. लांबवरचा कल वाढता आहे. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किमत प्रति १४० किलोची गाठी). arun.cqr@gmail.com  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com