कापूस, सोयाबीन, हळद, गवार बीच्या भाववाढीचे संकेत

शेतीमालाचा वायदे बाजार
शेतीमालाचा वायदे बाजार

या सप्ताहात सोयाबीनचे भाव मोठ्या प्रमाणात चढले. तितक्याच प्रमाणात साखरेचे भाव उतरले. गवार बी खेरीज इतरांचे भावसुद्धा उतरले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत कापूस, सोयाबीन, हळद व गवार बी यांचे भाव वाढतील. अधिक रब्बी उत्पादनाच्या अपेक्षेने गहू व हरभरा यांचे भाव उतरतील. सोयाबीन आत्ता स्पॉटमध्ये न विकता मे फ्युचर्समध्ये विकला तर २ टक्क्यांनी अधिक भाव (रु. ३,६८५) मिळेल. मका (खरीप) व गवार बीचे भाव एप्रिलमध्ये १.८ व १.५ टक्क्यांनी अधिक (अनुक्रमे रु. १,३०३ व रु. ४,६०९) मिळतील. कापसाचे भाव मार्च मध्ये ३.६ टक्क्यांनी अधिक मिळतील (रु. २०,९५०). गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मका खरीप मक्याच्या (फेब्रुवारी २०१८) किमती डिसेंबर महिन्यात सतत घसरत होत्या. (रु. १,३७० ते रु. १,३३१). या सप्ताहातसुद्धा त्या १.४ टक्क्यांनी घसरून रु. १,२९० वर आल्या आहेत. स्पॉट किमती (निझामाबाद) रु. १,२८० वर आल्या आहेत. एप्रिल २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,३०३ वर आल्या आहेत. हमी भाव रु. १,४२५ आहे. रबी मक्याची एप्रिल २०१८ च्या डिलिवरीची फ्युचर्स किमत रु. १,१६५ आहे. रबी पिकाच्या अपेक्षेने किमती हमी भावाच्या खाली राहण्याचा संभव आहे.

साखर साखरेच्या (फेब्रुवारी २०१८) किमती डिसेंबर महिन्यात रु. ३२७१ च्या आसपास होत्या. गेल्या सप्ताहात त्या २.४ टक्क्यांनी घसरून रु. ३,१०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ८.४ टक्क्यांनी घसरून रु. २९०१ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,०७६ वर आल्या आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जुलै (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. ३,०४२ वर आल्या आहेत. सध्या साठा पुरेसा आहे. नवीन हंगामाचे उत्पादन आता सुरू झाले आहे. १९ डिसेंबर रोजी केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार या वर्षी भारतातील साखरेचे उत्पादन २४९ लाख टन होईल. (गेल्या वर्षीचे उत्पादन: २५० लाख टन). मात्र गेल्या वर्षीचा साठा लक्षात घेता या वर्षी पुरेसा पुरवठा होईल व साखरेचे भाव स्थिर राहतील. त्यामुळे शासनाची साठ्यावरील व विक्रीवरील बंधने आता काढून टाकण्यात आली आहेत.

सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (फेब्रुवारी २०१८) किमती १४ डिसेंबरपासून सतत वाढत आहेत. (रु. ३,०७७ ते रु. ३,१४९). गेल्या सप्ताहाच्या तुलनेने या सप्ताहातसुद्धा त्या ६.७ टक्क्यांनी वाढून रु. ३,५३७ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती ७.९ टक्क्यांनी वाढून रु. ३,६१४ वर आल्या आहेत. मे २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,६८५ वर आल्या आहेत. हमी भाव (बोनस सहित) रु. ३,०५० आहे. आंतरराष्ट्रीय उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक आवक पण कमी झालेली आहे. खाद्य तेल-उद्योगाची मागणी वाढत आहे. शासनाने हमी भावाने सोयाबीन खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. पुढील वर्षी सोया पेंडीच्या निर्यातीत वाढ होऊन ती २० लाख टनावर जाईल असा अंदाज केला गेला आहे (मागील वर्षीची निर्यात: १५ लाख टन). त्यामुळे पुढील काही महिने किमतींत वाढीचा कल राहण्याचा संभव आहे.

हळद हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती डिसेंबरमध्ये वाढत होत्या (रु. ७,३६० ते ७,९५०). या सप्ताहात त्या १.६ टक्क्यांनी घसरून रु. ७,४८२ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,५६० वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ३.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ७,७५८). वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. देशांतर्गत मागणी वाढती आहे. पुढील काही दिवसांत वाढत्या आवकेमुळे किमती घसरण्याची शक्यता आहे.

गहू ११ डिसेंबरपासून गव्हाच्या (फेब्रुवारी २०१८) किमती वाढत होत्या. (रु. १,६७४ ते रु. १,७३३). या सप्ताहात त्या २.३ टक्क्यांनी घसरून रु. १,६७३ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (दिल्ली) रु. १,८०१ वर आल्या आहेत. एप्रिल २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ५.९ टक्क्यांनी कमी आहेत (रु. १,६९५). पुढील वर्षाचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मर्यादित घसरण अपेक्षित आहे. शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. १,७३५ आहे.

गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (फेब्रुवारी २०१८) किमती १२ डिसेंबर पासून वाढत होत्या (रु. ३,८६४ ते रु. ४,१८५). या सप्ताहात त्या ४.१ टक्क्यांनी वाढून रु. ४,४९५ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,५३९ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा एप्रिल २०१८ मधील फ्युचर्स किमती १.५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,६०९). मागणी वाढती आहे; किमतीतील तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे.

हरभरा १४ डिसेंबरनंतर हरभऱ्याच्या फ्युचर्स (मार्च २०१८) किमती वाढत होत्या (रु. ३,७१६ ते ३,८२४). या सप्ताहात त्या १.८ टक्क्यांनी घसरून रु. ३,७५७ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ३,८८६ वर आल्या आहेत. उत्पादन वाढीच्या अपेक्षेने मे २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमती पेक्षा ०.४ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ३,८५१). शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. ४,४०० आहे. एप्रिल नंतर भाव घसरू नयेत, यासाठी शासनाचे प्रयत्न राहतील. आयात शुल्क त्यामुळे ३० टक्के लावण्यात आले आहे. विक्रीवरील स्पेशल मार्जिनसुद्धा वाढवले आहे.

कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (फेब्रुवारी २०१८) किमती डिसेंबर महिन्यात वाढत होत्या (रु. १९,३७० ते रु. २०,६३०). या सप्ताहात त्या ०.६ टक्क्यांनी वाढून रु. २१,०२० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २०,२१३ वर आल्या आहेत. मे २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २०,९५०). कपाशीचा एप्रिल २०१८ डिलिवरी भाव प्रति २० किलोसाठी रु. ९८५ आहे. प्रथम अंदाजानुसार या वर्षी कापसाचे उत्पादन घसरून ३२.३ दशलक्ष गाठीवर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन: ३३.१ दशलक्ष गाठी). मागणी चांगली आहे. लांबवरचा कल वाढता आहे. (सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किमत प्रति १४० किलोची गाठी).   arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com