स्पॉट किमतींच्या तुलनेत कापसाच्या भावात वाढ

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

एक फेब्रुवारीपासून एनसीडीईएक्समध्ये जून २०१८ डिलिव्हरीसाठी रब्बी मका (एरोड, गुलाब बाग), गहू (कोटा) व गवार बी यांचे, तर जुलै २०१८ डिलिव्हरीसाठी सोयाबीन व हरभरा यांचे व्यवहार सुरू झाले. एमसीएक्समध्ये जुलै २०१८ डिलिव्हरीसाठी कापसाचे व्यवहार सुरू झाले. या सप्ताहात हरभरा वगळता सर्वच पिकांचे भाव घसरले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत कापूस, सोयाबीन व गवार बी यांचे भाव वाढतील.

सोयाबीन आत्ता स्पॉटमध्ये न विकता जून फ्युचर्समध्ये विकला, तर ४.१ टक्क्यांनी अधिक भाव (रु. ३,७०६) मिळेल. गवार बीचे भाव मेमध्ये ३.३ टक्क्यांनी अधिक (रु. ४,५६४) मिळतील. कापसाचे भाव जूनमध्ये ८.८ टक्क्यांनी अधिक मिळतील (रु. २१,१३०). गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतींतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते.

मका रबी मक्याच्या (मार्च २०१८) किमती जानेवारी महिन्यात रु. ११४५ ते रु. ११८५ दरम्यान होत्या. या सप्ताहातसुद्धा त्या १,१६२ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,२५३ वर आल्या आहेत. मे २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,१३० वर आल्या आहेत. रबी मक्याची (एरोड) जून २०१८ च्या डिलिवरीची फ्युचर्स किमत रु. १,३८२ आहे. हमी भाव रु. १,४२५ आहे नवीन आवकेच्या अपेक्षेने किमती कमी होण्याची शक्यता आहे.

साखर साखरेच्या (मार्च २०१८) किमती जानेवारी महिन्यात उतरत होत्या (रु. ३,२७२ ते रु. २,९५५). या सप्ताहात त्या रु. २,९५२ वर आल्या होत्या. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,०६९ वर आल्या आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जुलै (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. २,९५२ वर स्थिर आहेत. सध्या साठा पुरेसा आहे. नवीन हंगामाचे उत्पादन आता सुरू झाले आहे. १९ डिसेंबर रोजी केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार या वर्षी भारतातील साखरेचे उत्पादन २४९ लाख टन होईल. (गेल्या वर्षीचे उत्पादन : २५० लाख टन). मात्र गेल्या वर्षीचा साठा लक्षात घेता या वर्षी पुरेसा पुरवठा होईल व साखरेचे भाव स्थिर राहतील. त्यामुळे शासनाची साठ्यावरील व विक्रीवरील बंधने आता काढून टाकण्यात आली आहेत.

सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (मार्च २०१८) किमती जानेवारी महिन्यात वाढत होत्या. (रु. ३,१८० ते रु. ३,८४९). गेल्या सप्ताहाच्या तुलनेने या सप्ताहात मात्र त्या ५.२ टक्क्यांनी घसरून रु. ३,५६८ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती ७.७ टक्क्यांनी घसरून रु. ३,५६० वर आल्या आहेत. जून २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,७०६ वर आल्या आहेत. हमी भाव (बोनस सहित) रु. ३,०५० आहे. आंतरराष्ट्रीय व देशातील उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक आवक पण कमी झालेली आहे. खाद्य तेल-उद्योगाची मागणी वाढत आहे. शासनाने हमीभावाने सोयाबीन जरी खरेदी करण्याची तयारी दर्शवली असली तरी या वर्षी ती वेळ येणार नाही. पुढील वर्षी सोया पेंडीच्या निर्यातीत वाढ होऊन ती २० लाख टनांवर जाईल असा अंदाज केला गेला आहे (मागील वर्षीची निर्यात : १५ लाख टन). त्यामुळे पुढील काही महिने किमतींत वाढीचा कल राहण्याचा संभव आहे.

हळद हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती जानेवारीमध्ये घसरत होत्या (रु. ७,७९२ ते ७,१०४). या सप्ताहात त्या रु. ७,११२ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,३४२ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ०.२ टक्क्याने अधिक आहेत (रु. ७,३५८). वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. देशांतर्गत मागणी वाढती आहे. पुढील काही दिवसांत वाढत्या आवकेमुळे किमती घसरण्याची शक्यता आहे.

गहू ११ जानेवारीपासून गव्हाच्या (एप्रिल २०१८) किमती रु. १,६८६ ते रु. १,७३३ च्या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या १ टक्क्याने घसरून रु. १,६६४ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,६४२ वर आल्या आहेत. जून २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा २.४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १,६८२). पुढील वर्षाचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मर्यादित घसरण अपेक्षित आहे. शासनाचा हमीभाव (बोनससहित) रु. १,७३५ आहे.

गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (मार्च २०१८) किमती जानेवारी महिन्यात वाढत होत्या (रु. ४,२०६ ते रु. ४,७०८). या सप्ताहात त्या ३.५ टक्क्यांनी घसरून रु. ४,५२५ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,५१३ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा मे २०१८ मधील फ्युचर्स किमती ३.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,५६४). मागणी वाढती आहे; किमतीतील तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे.

हरभरा जानेवारी महिन्यात हरभऱ्याच्या फ्युचर्स (मार्च २०१८) किमती रु. ३,६७७ व रु. ३,८५६ च्या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या रु. ३,८३८ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ३,९५४ वर आल्या आहेत. जून २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ०.९ टक्क्याने अधिक आहेत (रु. ३,९८९). शासनाचा हमीभाव (बोनससहित) रु. ४,४०० आहे. एप्रिलनंतर भाव घसरू नयेत यासाठी शासनाचे प्रयत्न राहतील. त्यामुळे आयात शुल्क ३० टक्के लावण्यात आले आहे. विक्रीवरील स्पेशल मार्जिनसुद्धा वाढवले आहे. किमतीत मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत.

कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (मार्च २०१८) किमती जानेवारी महिन्यात रु. २०,२९० व रु. २१,३८० दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या रु. २०,००० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १९,४२५ वर आल्या आहेत. जून २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ८.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २१,१३०). कपाशीचा एप्रिल २०१८ डिलिव्हरी भाव (NCDEX) प्रति २० किलोसाठी रु. ९६८ आहे. प्रथम अंदाजानुसार या वर्षी कापसाचे उत्पादन घसरून ३२.३ दशलक्ष गाठींवर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन : ३३.१ दशलक्ष गाठी). मागणी चांगली आहे. लांबवरचा कल वाढता आहे. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किंमत प्रति १४० किलोची गाठी).   arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com