कापूस, सोयाबीनच्या फ्युचर्स भावात वाढ

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

या सप्ताहात साखर, गहू व हरभरा यांचे भाव वाढले. हळद, गवार बी व सोयाबीन यांचे भाव उतरले. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत कापूस, सोयाबीन, हळद व गवार बी यांचे भाव वाढतील.   सोयाबीन आत्ता स्पॉटमध्ये न विकता जून फ्युचर्समध्ये विकला तर २.४ टक्क्यांनी अधिक भाव (रु. ३,९२६) मिळेल. गवार बीचे भाव मे मध्ये २ टक्क्यांनी अधिक (रु. ४,४९०) मिळतील. कापसाचे भाव जूनमध्ये ५.५ टक्क्यांनी अधिक मिळतील (रु. २०,५००). गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मका रबी मक्याच्या (एप्रिल २०१८) किमती जानेवारी महिन्यात रु. ११४५ ते रु. ११८५ दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या रु. १,१५९ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,२१३ वर आल्या आहेत. मे २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,१५२ वर आल्या आहेत. रब्बी मक्याची (एरोड) जून २०१८ च्या डिलिव्हरीची फ्युचर्स किंमत रु. १,३९३ आहे. हमी भाव रु. १,४२५ आहे. नवीन आवकेच्या अपेक्षेने किमती कमी होण्याची शक्यता आहे.

साखर साखरेच्या (मार्च २०१८) किमती जानेवारी महिन्यात उतरत होत्या (रु. ३,२७२ ते रु. २,९५५). या सप्ताहात ९.२ टक्क्यांनी वाढून त्या रु. ३,३६१ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,२५६ वर आल्या आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जुलै (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. ३,३६१ वर आल्या आहेत. नवीन हंगामाचे उत्पादन आता सुरू झाले आहे. १९ डिसेंबर रोजी केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार या वर्षी भारतातील साखरेचे उत्पादन २४९ लाख टन होईल. (गेल्या वर्षीचे उत्पादन: २५० लाख टन). साखरेचे भाव काही प्रमाणात चढण्याची शक्यता आहे.

सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (मार्च २०१८) किमती जानेवारी महिन्यात वाढत होत्या. (रु. ३,१८० ते रु. ३,८४९). गेल्या सप्ताहाच्या तुलनेने या सप्ताहात त्या ०.७ टक्क्यांनी उतरून रु. ३,८०६ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती २.५ टक्क्यांनी घसरून रु. ३,८३३ वर आल्या आहेत. जून २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,९२६ वर आल्या आहेत. हमी भाव (बोनस सहित) रु. ३,०५० आहे. आंतरराष्ट्रीय व देशातील उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक आवक पण कमी झालेली आहे. खाद्यतेल-उद्योगाची मागणी वाढत आहे. शासनाने हमी भावाने सोयाबीन जरी खरेदी करण्याची तयारी दर्शवली असली तरी या वर्षी ती वेळ येणार नाही. पुढील वर्षी सोया पेंडीच्या निर्यातीत वाढ होऊन ती २० लाख टनांवर जाईल, असा अंदाज केला गेला आहे (मागील वर्षीची निर्यात : १५ लाख टन). शासनाचे सोया पेंडीच्या निर्यातीला उत्तेजन देण्याचे धोरण आहे. त्यामुळे पुढील काही महिने किमतीत वाढीचा कल राहण्याचा संभव आहे.

हळद हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती जानेवारीमध्ये घसरत होत्या (रु. ७,७९२ ते ७,१०४). या सप्ताहात त्या ४.३ टक्क्यांनी घसरून रु. ६,९५० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,०१७ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ७,९१६). वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. देशांतर्गत मागणी वाढती आहे. पुढील काही दिवसांत वाढत्या आवकेमुळे किमती घसरण्याची शक्यता आहे.

गहू ११ जानेवारीपासून गव्हाच्या (एप्रिल २०१८) किमती रु. १,६८६ ते रु. १,७३३ च्या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या ६.१ टक्क्यांनी वाढून रु. १,७८७ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,७२५ वर आल्या आहेत. जून २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा २.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १,७६२). पुढील वर्षाचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एप्रिलपासून मर्यादित घसरण अपेक्षित आहे. शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. १,७३५ आहे.

गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (मार्च २०१८) किमती जानेवारी महिन्यात वाढत होत्या (रु. ४,२०६ ते रु. ४,७०८). या सप्ताहात त्या १.२ टक्क्यांनी घसरून रु. ४,४०५ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,४०३ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतीपेक्षा मे २०१८ मधील फ्युचर्स किमती २ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४९०). मागणी वाढती आहे; किमतीतील तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे.

हरभरा जानेवारी महिन्यात हरभऱ्याच्या फ्युचर्स (मार्च २०१८) किमती रु. ३,६७७ व रु. ३,८५६ च्या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या ३.४ टक्क्यांनी वाढून रु. ३,९६३ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,०४० वर आल्या आहेत. जून २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमती एवढ्याच आहेत (रु. ४,०४०). शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. ४,४०० आहे. एप्रिल नंतर भाव घसरू नयेत यासाठी शासनाचे प्रयत्न राहतील. आयात शुल्क त्यामुळे ३० टक्के लावण्यात आले आहे. विक्रीवरील स्पेशल मार्जिनसुद्धा वाढवले आहे. किमतीत मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत.

कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (मार्च २०१८) किमती जानेवारी महिन्यात रु. २०,२९० व रु. २१,३८० दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या रु. २०,१७० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १९,४२९ वर आल्या आहेत. जून २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ५.५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २०,५००). आंतरराष्ट्रीय मागणी कमी आहे. कपाशीचा एप्रिल २०१८ डिलीवरी भाव (एनसीईएक्स) प्रति २० किलोसाठी रु. ९४५ आहे. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किंमत प्रती १४० किलोची गाठी).   arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com