वाघ्या घेवड्याचा झाला जीआयरूपी सन्मान

वाघ्या घेवड्याचा झाला जीआयरूपी सन्मान
वाघ्या घेवड्याचा झाला जीआयरूपी सन्मान

भारतात कमी उत्पादनामुळे एकूण मागणीच्या ९० टक्के घेवडा आयात करावा लागतो. ही घेवडा उत्पादकांसाठी अतिशय चिंताजनक बाब आहे. या भागात आपण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात उत्पादन घेतल्या जाणाऱ्या व जीआय मानांकन मिळालेल्या वाघ्या घेवडा या नावाने प्रसिद्ध असलेल्या घेवड्याविषयी जाणून घेऊयात.

सर्वसामान्य जनतेला किंवा शेतकऱ्यांना भारतात किती परदेशी शेतमाल आयात किंवा निर्यात केला जातो याची कल्पना नसते. आपल्याला काही शेतमालाच्या बाबतीत दुसऱ्या देशांवर अवलंबून राहण्याची वेळ येते. याच शेतमालामध्ये उत्तर भारतात राजमा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या घेवड्याचाही समावेश आहे.

स्वदेशी उत्पादनाचा जागर

वाघ्या घेवड्याच्या जीआय नोंदणीने स्वदेशी शेतमालाचा एक प्रकारे जागरच केला आहे. जीआय नोंदणीची प्रक्रिया दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत मान्य झाली होती. त्यावेळेस कोरेगाव भागातील शेतकऱ्यांनी इतर ठिकाणाहून येणारा आणि कोरेगावचा घेवडा पडताळणीसाठी ठेवला होता. त्यावेळी दिल्लीतील व्यापाऱ्यांनी कोरेगावच्या घेवड्याला पसंती दाखवली.

आता जीआय मिळाल्यामुळे दिल्लीतील व्यापारी कोरेगावचा घेवडा सन्मानाने विक्रीस ठेवतील अशी अाशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. घेवड्याला उत्तर भारतात राजमा या नावाने ओळखले जाते.

घेवड्याची शेती

महाजन शेती फार्मचे मालक विश्वनाथ काशिनाथ महाजन यांच्या म्हणण्यानुसार वाघ्या घेवड्याची लागवड पहिल्यांदा साधारणतः १९५० मध्ये उत्तर कोरेगाव तालुक्यात केली जायची. हे पीक पारंपरिक पद्धतीने घेतले जाते. साधारण  ७८ ते ८० दिवसांत ते तयार होते.

घेवड्याच्या दाण्यांचा रंग फिक्कट गुलाबी असून वाघाच्या अंगावर जसे पट्टे असतात तसे पट्टे या घेवड्याच्या दाण्यांवर असतात. म्हणून त्यास वाघ्या घेवडा या नावाने ओळखले जाते. हा घेवडा स्वादिष्ट, पौष्टिक असून, यामध्ये अ आणि ब जीवनसत्त्व तसेच खनिजे, लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, कर्बोदके, प्रथिने भरपूर प्रमाणात आहेत. अशा या वैशिष्टपूर्ण घेवड्याला ‘किंग राजमा’ असेही म्हणतात.

भौगोलीक हवामानाची साथ

घेवड्याच्या उत्पादनासाठी शुष्क हवामानाची गरज असते. अशा हवामानाची परीस्थिती भारताच्या केवळ काही क्षेत्रांमध्येच आहे. वाघ्या घेवड्याचे उत्पादन प्रामुख्याने उत्तर कोरेगाव आणि खटाव तालुक्यात घेतले जाते. कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग हा कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. येथे सरासरी पावसाचे प्रमाण ६०० ते ६५० मी.मी. एवढे आहे.

कोरेगाव जवळून तिलगंगा आणि वासना अशा दोन नद्या वाहतात. खरीप हंगामामध्ये उष्ण आणि कोरडे वातावरण असते. येथील माती मध्यम काळी अाहे. मातीचा पोत मध्यम स्वरूपाचा आहे. या मातीचा सामू (पीएच) ६.५ ते ८ आहे. सातारा जिल्ह्यामध्ये समुद्रसपाटीपासून सरासरी उंची मीटर ४६५० फूट आहे. ‘हार्ट ऑफ द वेस्टर्न महाराष्ट्र’ असेही यास संबोधले जाते. समुद्रसपाटीपासून कोरेगावची उंची सुमारे ४८७७ फूट आहे. वाघ्या घेवड्याची लागवड साधारणपणे एकूण १२७३४ हेक्टर क्षेत्रामध्ये केली जाते. त्यापैकी ९५८१ हेक्टर क्षेत्र कोरेगाव आणि उर्वरित ३१५३ हेक्टर क्षेत्रावर खटाव तालुक्यात आहे. त्याचप्रमाणे एकूण १५२ गावांमध्ये लागवड केली जाते. त्यात कोरेगाव तालुक्यातील १३१ तर २१ खटाव तालुक्यातील गावे आहेत.

असा आहे वाघ्या घेवडा

पौष्टिकतेच्या बाबतीत अव्वल स्थानी असलेला वाघ्या घेवडा एकेकाळी भारतीय सैन्य दलासाठी पर्वणी असायचा. मात्र काळाच्या ओघात इतर देशांतून आलेल्या कमी किंमतीच्या घेवड्याबरोबर या घेवड्याला स्पर्धा करावी लागत आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न सुरू केले. हे करीत असताना त्यांना भौगोलिक मानांकनाचे (जीआय) महत्त्व किती आहे ते उमगले होते.

जीआय मिळविण्यासाठी जय तुळजाभवानी शेतकरी बचत गटाने २६ मार्च २०१४ रोजी ‘जिओग्राफिकल इंडिकेशन रजिस्ट्री’ यांच्याकडे पुणे येथील ‘ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी’ यांच्या मदतीने अर्ज सादर केला. तब्बल दोन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर या घेवड्याचे वेगळेपण सिद्ध करण्यात या बचत गटाला यश आले.

तीस नोव्हेंबर, २०१५ रोजी तशी अधिकृत जर्नलमध्ये नोंदणीही झाली. त्यानंतर चार महिन्यांचा आक्षेप घेण्याचा कालावधी संपल्यानंतर ‘जिओग्राफिकल इंडिकेशन ऑफ गुड्स रजिस्ट्रेशन ॲण्ड प्रोटेक्शन एक्ट यानुसार ३१ मार्च २०१६ रोजी जीआय प्रमाणपत्र देण्यात आले. यासाठी शासनाने जागतिक बँकेकडून एका प्रकल्पाच्या रूपाने आर्थिक मदत मिळवून दिली. अशा प्रकारे कोरेगावच्या वाघ्या घेवड्याचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी जीआयरुपी महत्त्वाचा दागिना मिळविला. जीआय मिळाल्यामुळे नामशेष होत चाललेले हे पीक पुन्हा पुनरुज्जीवत होत आहे.

संपर्क ः गणेश हिंगमिरे, ९८२३७३३१२१ (लेखक जीआय विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व राष्ट्रीय पुरस्कार विजेते अाहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com