सुगंधी, अधिक गोडव्याची लाल केळी, नंजनगुड केळी

सुगंधी, अधिक गोडव्याची लाल केळी, नंजनगुड केळी
सुगंधी, अधिक गोडव्याची लाल केळी, नंजनगुड केळी

भारतातील विविध राज्यांत उत्पादित होणाऱ्या एकूण सहा केळींच्या पारंपरिक जातींना त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे जीआय मानांकन मिळाले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील जळगावची केळी, कर्नाटकमधील कमलापूर लाल केळी आणि नंजनगुड केळी आहे. आजच्या भागात कर्नाटकमधील जीआय मानांकन मिळाल्या कमलापूर लाल केळी व नंजनगुड केळीविषयी जाणून घेऊया.   सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आणि वर्षभर उपलब्ध होणाऱ्या केळी उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो, तर चीन दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. युगांडा, फिलिपिन्स, ब्राझील, इंडोनेशिया, कोलंबिया या देशांतही केळीचे उत्पादन घेतले जाते. केळीच्या जागतिक उत्पादनापैकी भारतात २० टक्के उत्पादन होते. भारतात आंब्यानंतर केळीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. भारतामध्ये महाराष्ट्र, गुजरात, आसाम, केरळ, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, ओडिशा, कर्नाटक, तमिळनाडू आणि गोवा या राज्यांत मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते.

कर्नाटकमध्ये केळीचे उत्पादन म्हैसूर, चामराजनगर आणि गुलबर्गा या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने घेतले जाते. म्हैसूर आणि चामराजनगर जिल्ह्यामध्ये नंजनगुड केळीचे उत्पादन विशेषकरून घेतले जाते तर गुलबर्गा या जिल्ह्यातील कमलापूर या ठिकाणी लाल केळीचे उत्पादन घेतले जाते. या दोन्ही केळींचे वैशिष्ट्य वेगवेगळे आहेत. यांच्यातील वैशिष्ट वेगळे असण्याचे कारण या जिल्ह्यातील माती, पाणी, हवामान आणि जमिनीचा पोत हे आहे.

कमलापूर लाल केळीची वैशिष्ट्ये

  • कमलापूरमध्ये पिकणारी आणि लाल रंगामुळे या केळीला कमलापूर लाल केळी या नावाने ओळखले जाते. सुगंध आणि गोडपणा यामुळे ही केळी विशेष अाहे. या केळीत गोडवा अधिक आहे.
  • केळीचे उत्पादन पारंपरिक व सेंद्रिय पद्धतीने घेतले जाते. उपयोग विविध व्याधींवर औषधी म्हणूनही केला जातो.
  • येथील स्थानिक लोकांच्या माहितीच्या आधारे ही केळी विषमज्वर असणाऱ्या रुग्णाला विशेष करून लहान मुलांना दिल्याने त्या रुग्णाला होणाऱ्या त्रासापासून आराम मिळतो. तसेच क्षयरोग आणि त्यामुळे येणारा अशक्तपणा, मधुमेह, डायरिया, अपचन या आजारावरसुद्धा गुणकारी ठरते.
  • कमलापूरमध्ये पांढरी चिकन माती आहे. या मातीला येथील स्थानिक भाषेत हलुबिलापू असे म्हणतात. अशा प्रकारची माती फक्त कमलापूर याच भागात आढळते.
  • या मातीत असणारे घटक लाल केळीच्या वाढीसाठी पूरक आहेत. लागवड कमलापूर याच भागात केली जाते.
  • हैदराबादच्या निजामाने हैदराबादमध्ये या लाल केळीचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला त्यात अपयश आले. हेच जीआयचे महत्त्व आहे, की त्या त्या ठिकाणचा पदार्थ त्या त्या ठिकाणीच येतो.
  • नंजनगुड केळीची वैशिष्ट्ये

  • नंजनगुड या केळीचे उत्पादन प्रामुख्याने म्हैसूर, चामराजनगर या जिल्ह्यांत घेतले जाते. या केळीची लागवड म्हैसूर जिल्ह्यातील नंजनगुड या तालुक्यातील दहा गावात, तर चामराजनगर जिल्ह्यातील काही गावामध्ये केली जाते. हे दोन्ही जिल्हे कर्नाटकातील दक्षिण भागातील कमी पावसाच्या प्रदेशात येतात.
  • या ठिकाणची जमीन सुपीक आणि काळी चिकन मातीयुक्त आहे. या मातीत केळीच्या योग्य वाढीसाठी गरजेचे असणारे पौष्टिक घटक मुबलक प्रमाणात आहेत.
  • केळीचे उत्पादन पारंपरिक आणि सेंद्रिय पद्धतीने केले जाते. त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या जमिनीची सुपीकता वर्षानुवर्षे टिकून आहे. त्यामुळे केळीची चव स्वादिष्ट आणि अद्वितीय आहे.
  • कर्नाटकमध्ये जवळ जवळ वेगवेगळ्या २० जातीच्या केळींचे उत्पादन घेतले जाते, परंतु या सगळ्यात नंजनगुड केळी सरस ठरते.
  • अशा या दोन्ही अद्वितीय गुणधर्म असणाऱ्या केळीना जीआय मानांकन मिळणे गरजेचे होते. तसेच या केळी उत्पादनावर अवलंबून असणारे शेतकरी यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून कर्नाटकाच्या फलोत्पादन विभागाने जीआय रजिस्ट्रीकडे अर्ज सदर केला होता.
  • शेतकऱ्यांच्या मदतीने अनेक बाबींचा पाठपुरावा केल्यानंतर फलोत्पादन विभागाला कमलापूर लाल केळी व नंजनगुड केळी यांना जीआय मानांकन मिळविण्यात यश आले.
  • संपर्क ः गणेश हिंगमिरे, ९८२३७३३१२१ (लेखक जी अाय विषयातील तज्ज्ञ व अांतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते अाहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com