मसाल्याची राणी वेलचीवर जीआयची मोहोर

अलेप्पी हिरवी वेलची,
अलेप्पी हिरवी वेलची,

वेलचीला आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान आहे. केरळमधील अलेप्पी हिरवी वेलची, कर्नाटकमधील कुर्ग हिरवी वेलची आणि सिक्कीममधील सिक्कीम मोठी वेलचीला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाल्यामुळे अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. आजच्या भागात जीआय मानांकन मिळालेल्या केरळमधील अलेप्पी हिरवी वेलचीविषयी जाणून घेऊयात.

  • भारत हा वेलचीचा प्रमुख उत्पादक आणि ग्राहक असून जागतिक उत्पादनात दुसऱ्या स्थानावर आहे. तर ग्वाटेमालाचा पहिला क्रमांक लागतो.
  • भारतामध्ये प्रामुख्याने केरळ, कर्नाटक, तमिळनाडू आणि महाराष्ट्रात कोकण तसेच इतर काही भागात वेलचीचे उत्पादन घेतले जाते. वेलचीचे भारतात घेतल्या जाणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी साधारणतः ८९ टक्के उत्पादन एकट्या केरळ राज्यात घेतले जाते.
  • वैशिष्ट्यपूर्ण अलेप्पी हिरवी वेलची

  • मुख्यत: अलप्पुझा (जुने नाव अलेप्पी) या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. या जिल्ह्यात उत्पादित होणारी वेलची विशिष्ट आहे. येथील वेलची काही बाबतीत भारतात इतर ठिकाणी उत्पादित होणाऱ्या वेलचीपेक्षा सरस आहे. ही वेलची अलेप्पी हिरवी वेलची या नावाने ओळखली जाते.
  • अलेप्पी हिरवी वेलचीचे उत्पादन पारंपरिक पद्धतीने घेतले जाते. या वेलचीला वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे २००८ मध्ये भौगोलिक मानांकन मिळाले आहे. यासाठी कोचिन येथील स्पाइसेस बोर्डने जीआय मानांकन मिळविण्यासाठी अर्ज सादर केला होता.
  • या भागात उत्पादित होणाऱ्या वेलचीला जीआय मानांकन मिळाल्यामुळे भारतातच नव्हे तर जगभरातून मागणी वाढली आहे.  
  • अलेप्पी वेलचीची शेती

  • अलप्पुझा जिल्ह्यातील शेतकरी अलेप्पी हिरवी वेलचीची पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने शेती करतात. या भागात उत्पादित होणारी अलेप्पी हिरवी वेलची शेकडो वर्ष जुनी जात असेल असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
  • या वेलचीचा हिरवा रंग, आकार, सुगंध, चव आणि येथील शेतकऱ्यांकडून ग्राहकाला मिळणारी गुणवत्तेची हमी यामुळे ही वेलची इतर वेलचीपेक्षा सरस ठरते. या वेलचीचे वजन आणि आकारानुसार वेगवेगळे सहा गटात वर्गीकरण केले अाहे.
  • स्पाइसेस बोर्डाच्या माहितीनुसार या वेलचीच्या बियांमध्ये इतर वेलचीच्या तुलनेत तेलाचे प्रमाण अधिक (७.५ ते ११.०३ टक्के) आहे.
  • स्टीम डिस्टिलेशन तंत्रज्ञानाद्वारे तेल तयार केले जाते. या तेलालाही आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक मागणी आहे.
  • ही वेलची वैशिष्ट्यपूर्ण असण्याचे मुख्य कारण येथील वातावरण आणि येथील शेतकऱ्यांची शेती करण्याची खास पद्धत हे आहे.
  • अलेप्पी हिरवी वेलचीची लागवड डोंगराळ भागात केली जाते. समुद्रसपाटीपासून ८०० ते १३०० मीटर उंचीवर हे पीक घेतले जाते.
  • अलप्पुझा जिल्ह्यातील हवामान उबदार आणि दमट हवामान आहे. येथे सेंद्रिय घटक असणारी चिकन माती आढळते.
  • अाैषधी म्हणूनही उपयुक्त

  • दक्षिण आशियात हिरवी वेलची ही पारंपरिक भारतीय गोड पदार्थांत आणि चहात वापरली जाते तर अरब देशांत ती ‘गव्हा’ या वेलचीच्या कडक कॉफीसाठी पाहुण्यांचे स्वागत पेय म्हणून वापरली जाते. तसेच उत्तर युरोपात ती गोड पदार्थांतील एक आवश्यक घटक आहे.
  • अलेप्पी हिरवी वेलचीची औषधी स्वरूपात दात व हिरड्यांवरील उपचारात, पचनासंबंधीच्या विकारात, घसादुखीवर आणि त्वचेच्या विकारांवर गुणकारी ठरते.
  • अलेप्पी हिरवी वेलचीला जीआय मानांकन मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये या वेलचीचे स्थान अधिक मजबूत झाले आहे. आपल्या मालाची योग्य आणि सुनियोजित जाहिरात केली तर आपले उत्पादन यशाचे उंच शिखर गाठू शकते हे येथील शेतकऱ्यांनी इतरांना दाखवून दिले आहे.
  • नुकतेच स्पाइसेस बोर्डने जीआय मानांकन मिळालेल्या उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याना जीआय टॅग लावून आपल्या मालाची विक्री करा असे आवाहन केले आहे. यामुळे उत्पादनांना योग्य भाव मिळेल, असा विश्वास निर्माण झाला आहे.
  • संपर्क ः गणेश हिंगमिरे, ९८२३७३३१२१ (लेखक जीआय विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व राष्ट्रीय पुरस्कार विजेते अाहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com