एकसारख्या वैशिष्ट्यपूर्ण चवीचे तिरुपती अन् बंदर लाडू

एकसारखी अाणि वैशिष्टपूर्ण चव असणाऱ्या तिरुपती लाडू आणि बंदर लाडू अशा दोन लाडूंना भारतात जीआय मिळाला आहे.
एकसारखी अाणि वैशिष्टपूर्ण चव असणाऱ्या तिरुपती लाडू आणि बंदर लाडू अशा दोन लाडूंना भारतात जीआय मिळाला आहे.

दीपावली हा उत्सव जसा दिव्यांचा उत्सव म्हणून साजरा केला जातो तसाच तो मिष्टान्नाचासुद्धा उत्सव आहे. घरोघरी दिवाळी फराळ केला जातो. महाराष्ट्रात तर जवळपास सगळ्याच घरी वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनविले जातात. एकसारखी अाणि वैशिष्टपूर्ण चव असणाऱ्या तिरुपती लाडू आणि बंदर लाडू अशा दोन लाडूंना भारतात जीआय मिळाला आहे. आजच्या भागात या लाडूंबद्दल जाणून घेऊयात.   तिरुपती लाडू

  • भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील तीर्थक्षेत्रांमध्ये तिरुपती हे तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. देशातील लाखो भक्त तिरुपती देवस्थानाला भेट देत असतात.
  • या सर्व भक्तांना देवस्थानातर्फे लाडूचा प्रसाद दिला जातो. हा लाडू बुंदीपासून बनविला जातो. सदर लाडवांची बुंदी बनविण्यासाठी विशेष हरभरा डाळीच्या पिठाचा वापर केला जातो.
  • ही बुंदी बनविण्यासाठी गायीच्या दुधापासून बनवलेल्या तुपाचा वापर केला जातो तसेच साखर, काजू, बदाम, वेलची, बेदाणे, बदाम या वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांचा वापर केला जातो. त्यामुळे हे लाडू गोड आणि चविष्ट बनतात.
  • हे लाडू लहान आणि मोठे अशा दोन प्रकारचे बनविले जातात. लहान लाडूचे वजन साधारण १७४ ग्रॅम तर मोठया आकाराच्या लाडूचे वजन ७०० ग्रॅम असते.
  • तिरुपती लाडूचा आकार आणि चव वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्राचीन काळापासून हा लाडू प्रसाद म्हणून तिरुपती मंदिरातून देण्यात येतो. ह्या लाडूचे उत्पादन केवळ तिरुपती तिरुमला देवस्थानच होते. दुसरीकडे कोठेही या लाडूचे उत्पादन घेतले जात नाही.
  • हा लाडू दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, पौष्टिकतेच्या व चवीच्या बाबतीत अद्वितीय आहे. ह्याचे सर्व श्रेय हा लाडू बनविणाऱ्या समूहाला जाते.
  • हा लाडू केवळ वेंकटेश्वराच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना प्रसाद म्हणून दिला जातो. १३० कामगार एका दिवसाला एक लाख लाडू बनवितात.
  • जीआय नोंदणी

  • तिरुमला तिरुपती देवस्थान यांनी या लाडूच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे जीआय नोंदणीसाठी ३१ मार्च २००८ मध्ये जीआय रजिस्ट्रीकडे अर्ज सादर केला होता. या नोंदणीसाठी देवस्थानला अथक प्रयत्न करावे लागले.
  • या लाडूतील अद्वितीयपणा सिद्ध झाल्यानंतर जीआय रजिस्ट्रीने ०४ सप्टेंबर २००९ ला जीआय प्रमाणपत्र दिले. अशा प्रकारे तिरुपती लाडूला जीआय मानांकन मिळाले.
  • तिरुपती लाडूच्या जी आय नोंदणीचा फायदा विशेष करून लाडूसाठी लागणाऱ्या गुणवत्तापूर्वक शेती माल देणाऱ्या शेतकऱ्यांना झाला, त्यांना कायम स्वरूपी हक्काची बाजारपेठ मिळाली आणि आपला शेत माल प्रसादासाठी वापरला जातोय याचे भाग्यही लाभले.  
  • बंदर (मछलीपट्टनम) लाडू

  • आंध्र प्रदेशमधील बंदर (मछलीपट्टनम) लाडू त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे प्रसिद्ध आहेत. हा लाडू बनविण्याची पद्धत (पाककृती) पारंपरिक आहे. हे लाडू आंध्र प्रदेशमधील कृष्णा जिल्ह्यातील मछलीपट्टनम या शहरात पारंपरिक पद्धतीने बनविले जातात.
  • मछलीपट्टनम हे शहर समुद्र किनाऱ्यावर वसलेले असल्यामुळे प्राचिन काळापासून हे शहर बंदर या नावाने ओळखले जाते. युरोपियन व्यापाऱ्यांनी १६ व्या शतकात हे बंदर तयार केले होते. तसेच मसुला किंवा मछलीपट्टनम हे शहर ब्रिटिश राजवटीत मद्रास मध्ये होते. त्यानंतर १६५६ मध्ये आंध्र प्रदेशमध्ये समाविष्ट करण्यात आले.
  • बंदर लाडू बनविण्यासाठी सेंद्रिय हरभरा डाळीचे पीठ, गूळ आणि तूप या मूळ पदार्थांचा वापर केला जातो. तसेच काजू, वेलची, बदाम यांचाही वापर केला जातो.
  • मछलीपट्टनम या शहरात साधरणतः शंभर वर्षांहून अधिक काळापासून हे लाडू बनविले जातात. या ठिकाणी बुंदेली समाज जास्त प्रमाणात आहे. याचा वेगवेगळे गोड पदार्थ बनविणे हा पारंपरिक व्यवसाय आहे.
  • हे लाडू बनविण्यासाठी लागणारा सर्व कच्चा माल स्थानिक लोकांकडूनच घेतला जातो. त्यामुळे या लाडूंची गुणवत्ता कायम राखली जाते.
  • बुंदेली समाजाचे लोक येथील स्थानिक लोकांना बंदर लाडू पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कला शिकवितात. बंदर शहराबरोबर कृष्णा जिल्ह्यातील इतर शेजारील गावांमध्येही हे लाडू बनविले जातात.
  • जीअायसाठी प्रयत्न

  • बृन्दावंपुरा बंदर लाडू उत्पादक कल्याण संघटना यांनी या लाडूच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे जीआय नोंदणीसाठी २९ जुलै २०१३ मध्ये जीआय रजिस्ट्रीकडे अर्ज सादर केला होता.
  • या लाडूतील अद्वितीयपणा सिद्ध झाल्यानंतर जीआय रजिस्ट्रीने २६ एप्रिल २०१७ ला जीआय प्रमाणपत्र दिले.  
  • जो कोणी व्यापारी किंवा व्यक्ती या लाडूंच्या नावाने ग्राहकांची फसवणूक करेल त्यांच्यावर जीआयच्या कायद्यानुसार कायदेशीर कारवाई या दोन्ही संस्था आता करू शकतात.
  • मार्केटिंगबाबत सजग होण्याची अावश्यकता

  • या दोन्ही लाडूंना जीआय मानांकन मिळाल्यामुळे ना केवळ ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणुकिला आळा बसला तर स्थानिक शेतकऱ्यासाठी हक्काची बाजारपेठ मिळाली.
  • भारतात मिठाईचे आणि पदार्थ प्रक्रियेचे मोठे मार्केट आहे. पण योग्य मार्केटिंग धोरण अजून अस्तित्वात नाही. लोणावळा चिक्की, सातारा कंदी पेढा किंवा कुंथलगिरी पेड्यासारख्या अनेक पदार्थांना अजून जी आय मिळाला नाहीये.
  • या पदार्थांसारखे नकली पदार्थ जागो जागी विक्रीस येऊ लागले आहेत. जसे तिरुपती लाडूच्या जी आयमुळे नकली पदार्थांवर रोख आणला तसेच चिक्की व पेढ्याच्या बाबतीतही होईल. त्यामुळे  गुणवत्तापूर्वक उत्पादनाला योग्य मोबदला आणि हक्काची बाजारपेठ मिळेल आणि ग्राहक वर्गालासुद्धा दर्जेदार पदार्थ मिळतील.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com