agriculture story in marathi, gramshiwar, siddhegavhan, rajgurunagar, pune | Agrowon

पायाभूत सुविधांच्या बळावर सिद्धेगव्हाणने साधली प्रगती 
मनोज कापडे
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

आदर्श गावाची प्रेरणा मी हिवरेबाजार येथे जाऊन पोपटराव पवार यांच्याकडून घेतली. गावातील प्रत्येक शेतकरी तसेच रोजगार करणाऱ्या व्यक्तीला उत्पन्नाचे भक्कम साधन मिळवून देणारे उपक्रम भविष्यात सुरू करण्याचा आमचा संकल्प आहे. 
-शशिकांत मोरे, माजी सरपंच 

हिवरेबाजार आणि राळेगणसिद्धी या गावांपासून प्रेरणा घेत राज्यात आदर्श गाव चळवळीतून अनेक गावे पुढे आली. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर (खेड) तालुक्यातील सिद्धेगव्हाण हे त्यापैकीच एक गाव. भीमेच्या काठी वसलेल्या या गावची विकासासाठी धडपड सुरू आहे. डांबरी रस्ते, सौर पथदीप, सर्वत्र स्वच्छता, जलसंधारण, व्यसनमुक्ती, आदी विविध कामांतून गावाने आपली वेगळी ओळख तयार केली आहे. मुख्य म्हणजे या यशस्वी वाटचालीत लोकसहभाह सर्वात महत्त्वाचा ठरला आहे. 

पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर (खेड) तालुक्यातील सिद्धेगव्हाण गाव अनेक विकासकामांच्या बाबतीत पूर्वी पिछाडीवर होते. गावचा कायापालट करण्यासाठी गावकऱ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला तो गावचे माजी सरपंच शशिकांत मोरे- पाटील यांनी. त्यांच्या धडपडीला आमदार दिलीप मोहिते, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पाठिंबा दिला. गावच्या विद्यमान सरपंच सौ. साधनाताई चौधरी आदर्श गावाचा वारसा पुढे चालवित आहेत. 

ओढा झाला जिवंत 
चौदाशे लोकवस्तीच्या सिद्धेगव्हाणचा ओढा सुमारे ९० वर्षांपासून बुजला होता. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेच्या माध्यमातून व तुकाराम जावळे, राकेश माळी, रमेश रमण यांच्या पुढाकारातून श्रमदानासाठी गावकऱ्यांना पुढे आणले गेले. ‘बॅंक ऑफ न्यूयॉर्क’ ने ‘सीएसआर फंड’ देण्याचे मान्य केले. लोकसहभाग व निधी यातून ओढा पुन्हा जिवंत झाला. 

विकासकामांत आघाडी 
गावात ३० वर्षांपूर्वीची जुनी ग्रामंपचायत इमारत होती. शशीभाऊंनी पाठपुरावा केल्यानंतर दहा लाख रुपयांची नवी इमारत उभी राहिली. त्याला सौर पॅनेल लावण्यात आले. ग्रामपंचायत संगणकयुक्त, ‘इलेक्ट्रिक कनेक्शन’ मुक्त होण्यास मदत झाली. गावाच्या पाणीपुरवठ्याची साडेसात एचपी क्षमतेची मोटार सौरऊर्जेवर सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे १५ लाख रुपये खर्च करून गावात ‘सीएसआर फंडा’च्या माध्यमातून ‘रिव्हर्स आॅसमॉसीस’ (आरओ) फिल्टर प्रकल्प उभा राहिला. पाच रुपये प्रतिहंडा दराने गावकऱ्यांना शुध्द पाणी मिळू लागले. 

शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या 
सिद्धेगव्हाणचे ग्रामदैवत भैरवनाथाची ख्याती पंचक्रोशीत आहे. लोकसहभागातून जिर्णोद्धाराची संकल्पना शशिभाऊ यांनी मांडली. ती गावकऱ्यांनी उचलून धरली. त्यातून सुमारे ७० लाख रूपये खर्चून सुंदर मंदीर उभे राहिले. गावातील पडक्या शाळेचा जिर्णोद्धार झाला. वृक्षारोपण, स्वच्छ इमारत, सौरवीज निर्मिती सुविधा, इ-लर्निंग कक्ष, तीन हजार पुस्तकांचे ग्रंथालय आदी सुविधा शाळेला मिळाल्या. शाळेच्या भिंतीवर सुंदर चित्रे व माहिती कोरल्याने भिंती बोलक्या झाल्या. 

ग्रामपंचायतीला आई मानलं 
आम्ही प्रत्येक काम मन लावून केले. ग्रामपंचायतीला आई मानून कारभार केला. सरपंचपद सोडताना सात लाख रुपयांचा निधी शिल्लक होता. एक रुपयाचीही अफरातफर नाही. त्यामुळे चांगले काम केल्याचे खूप समाधान आहे. त्यातूनच राज्याच्या यशवंतराव प्रतिष्ठानचा ग्रामभूषण तसेच यशवंतराव चव्हाण सह्याद्री पुरस्कार हे सन्मान मिळाले. भविष्यात लोकसहभागातून मोठे पर्यटन केंद्र उभारण्याचा मानस आहे. त्यामुळे गावकऱ्यांना रोजगार मिळेल असे शशिभाऊ अभिमानाने सांगतात. ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात आपले सरकार सेवा केंद्राचा फलक लावण्यात आला आहे. त्याशेजारीच लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी कसा संपर्क साधाल याविषयी मार्गदर्शन करणारा फलक आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतविषयक गुणवत्ता धोरणांची माहितीदेखील या ठिकाणी देण्यात आली आहे. 'गावच्या गरजेनुसार काम आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत' असे हे धोरण सांगते. 

विविध व्यवसायांचा उपयोग 
शशिभाऊ म्हणजे विकासाच्या कामांनी झपाटलेला युवा कार्यकर्ता आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शेतकरी कुटुंबातून आलेल्या शशिभाऊंना स्वतःच्या पायावर उभा राहा आणि गावाचेदेखील काम करीत राहा असा कानमंत्र वडिलांनी दिला. महाविद्यालयातील प्राचार्यांनीही मार्गदर्शन केले. 
त्यानुसार भाऊंनी मजुरांचा पुरवठा, ‘वुडन पॅलेट पॅकेजिंग’ पासून ते विविध कंपन्यांना सामुग्री व सेवा पुरविण्याच्या व्यवसायात जम बसविला. कंपन्यांसोबत तयार झालेल्या या संबंधाचा फायदा ग्रामविकासात करून घेण्याचे कसब साधले. वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, जलसंधारण, स्वच्छता, आरोग्य अशा विविध मुद्यांवर गावाने एकत्र काम केले. त्याचीच दखल घेत शशिकांत मोरे यांना पुणे जिल्हा परिषदेने २०१६ मध्ये आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 

कुस्तीत गावची वाढवली शान 
कुस्तीपटू ज्ञानेश्वरी संतोष साबळे म्हणजे सिद्धेगव्हाणची शान. चौदा वर्षे वयोगटात ३९ किलो श्रेणीत ज्ञानेश्वरी आता राज्यस्तरावर चमक दाखवणार आहे. गेल्या आठ वर्षांपासून ती सराव करते आहे. सुमारे पंचवीस वर्षांपासून कुस्ती खेळणारे गावचे आणखी एक भूषण म्हणजे अनिल साबळे. त्यांना २०१४ मध्ये संजीवनी मल्ल सम्राट पुरस्कार मिळाला आहे. अनेक कुस्तीपटू ते आपल्या आखाड्यात तयार करीत आहेत. राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरी शबापट यांनी गावाची धडपड पाहून नऊ लाख रुपयांच्या कुस्तीची मॅट साबळे यांना भेट दिली. ग्रामविकासात पुढे वाटचाल करणाऱ्या सिद्धेगव्हाणला कुस्तीच्या आखाडयात चमकविण्याचा त्यांचा संकल्प आहे. 

सिद्धेगव्हाणची वैशिष्ट्ये 

  • जलसंधारणामुळे विहिरींना पाणी 
  • 'आरओ फिल्टर’ द्वारे पाणीपुरवठा 
  • हागणदारी मुक्त गाव 
  • करवसुलीत आघाडी 
  • डांबरी रस्ते आणि सौर पथदीप 
  • कुस्ती प्रशिक्षण केंद्र 
  • इ-लर्निंग सुविधा देणारी शाळा 
  • योगासन सुविधा, कीर्तन, भजनसंगीत वर्ग 
  • गावाभोवती वृक्षारोपण 
  • लोकवर्गणीतून ग्रामदैवत मंदिर उभारले 

प्रतिक्रिया 
कुस्ती प्रशिक्षण केंद्रात गावची मुलं अतिशय मेहनत करीत आहेत. ऑलिंपिकचा कुस्तीपटू माझ्या गावात घडावा असे माझे स्वप्न आहे. आमचे गाव एक दिवस देशाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवेल असे प्रयत्न सुरू आहेत. 
-अनिल प्रभाकर साबळे, मल्लसम्राट 

कधी काळी आमच्या गावाच्या पडक्या शाळेत जनावरे बांधली जात होती. आता शाळेला नवे रूप मिळाले आहे. ग्रंथालय, ई-लर्निंग सेंटर आदी सुविधा सुरू झाल्याने मुलांना आधुनिक शिक्षण मिळू लागले आहे. 
-नितीन कावरे, ग्रामस्थ 

ग्रामस्थांनी एकदिलाने काम केल्याने अनेक कामे सुकर झाली. गाव स्वच्छताप्रेमी झाले असून हागणदारी मुक्त झाल्याचे समाधान वाटत आहे. 
-सचिन ज्ञानेश्वर मोरे, ग्रामस्थ 

जलसंधारणाची कामे झाल्यामुळे दोन तास चालणारी इलेक्ट्रिक मोटर आता चार तास चालते. गावाला दुष्काळाच्या झळा अजून तरी बसलेल्या नाहीत. 
-पंडीतराव मोरे, ग्रामस्थ 

लोकसहभागातून गावात दोन बंधारे उभे राहिले. परिसरातील सुमारे वीस विहिरींची पाणी पातळी वाढली. 
जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटला. 
-गणेश दाहोत्रे, ग्रामस्थ 

गावाला एकजूट आणि स्वच्छतेची ताकद मिळाली. मनःशांती लाभली. बिडी, गुटखा आदी प्रकार गावात कोठे दिसत नाहीत. गावातील महिलांच्या पुढाकारातूनच व्यसनमुक्ती जाहली. 
-विजय पवार, ग्रामस्थ 

संपर्क-शशिभाऊ मोरे ९८२२३३०००८ 

फोटो गॅलरी

इतर ग्रामविकास
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
मोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...
काटेकोर जलव्यवस्थापनाद्वारे खेडी खुर्द...खेडी खुर्द (ता. जि. जळगाव) येथील शेतकऱ्यांनी...
जीविधेची जाणीव करून देणारी आनंदशाळाशिक्षण गुणवत्तापूर्ण बनण्यासाठी शिक्षण...
योग्य पद्धतीने करा कूपनलिका पुनर्भरणमागच्या भागात आपण विहीर आणि कूपनलिका यांमधील फरक...
गटशेतीच्या सुलभ व्यवस्थापनासाठीशेतकरी गट स्थापन होऊन गटशेतीस सुरवात करताना पुढील...
गोष्ट तलावांचा श्वास मोकळा करण्याची...तलावांमध्ये बेशरम वनस्पतीचा पसारा वाढला तर आवश्यक...
भाजीपाला पिकातून कळवंडे झाले...रत्नागिरी जिल्ह्यातील कळवंडे (ता. चिपळूण) गाव...
कोरडवाहूमध्ये कमी खर्चात उत्पादनासह...अवर्षण स्थितीमध्ये सर्वांत अधिक फटका हा कोरडवाहू...
विहीर अन्‌ कूपनलिका नेमकी कोठे खोदावी?आपल्या जागेमध्ये विहीर करायची की कूपनलिका करायची...
गटशेतीतील जबाबदाऱ्यांचे वाटपशेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती...
सुधारित शेती, ग्रामविकासाच्या...लहान (ता.अर्धापूर, जि. नांदेड) गावातील...
भूमिगत बंधारा वाढवेल विहिरींची पाणी...सध्या अनेक गावांमध्ये विहिरीचे पाणी लवकर...
गटशेती : काळाची गरजशेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
जमिनीच्या आरोग्य कार्डाची उपयुक्तताभारतातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचे...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
निर्धारातून टाकोबाईची वाडीच्या...सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा काही भाग...
गळणाऱ्या बंधाऱ्याची दुरुस्ती शक्यसध्याच्या काळातील बंधाऱ्यांची परिस्थिती पाहिली तर...
विविध उपक्रमांच्या माध्यमातून माणगाव...कोल्हापूर जिल्ह्यातील माणगावच्या ग्रामस्थांनी...