प्रयोगशील शेतीला शंकरवाडीने दिला दुग्ध व्यवसायाचा आधार 

चापोली येथील पशुधन अधिकारी आम्हाला दुग्ध व्यवसायातील बारकावे समजावून सांगतात. त्यामुळे पूर्वी छोट्या प्रमाणात असलेल्या दुग्ध व्यवसायाची व्याप्ती वाढून आज शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर संकरित गाई (एचएफ) खरेदी केल्या आहेत. त्यातून दुधाचे संकलन वाढत आहे. -सचिन कोले, दुग्धोत्पादक ८६६८५४३६१८
शंकरवाडीच्या शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसायातून विकास साधला आहे.
शंकरवाडीच्या शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसायातून विकास साधला आहे.

लातूर जिल्ह्यातील चापोली गट ग्रामपंचायतीमधील शंकरवाडी (ता. चाकूर) हे डोंगरावर वसलेले गाव आहे. येथील शेतकरी फक्त शेतीवर अवलंबून न राहता पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. या जोडव्यवसायांची सांगड घातल्यानेच आज येथील शेतकऱ्यांच्या हातात सतत ताजा पैसा राहत आहे. त्यातून शेतीतील जोखीम त्यांनी कमी केलीच. शिवाय दुष्काळातही त्यांना मोठा आर्थिक आधार उपलब्ध झाला आहे.  लातूर जिल्ह्यातील शंकरवाडी (ता. चाकूर) हे गट ग्रामपंचायतीमधील गाव आहे. येथील जमीन माळरान, खडकाळ स्वरूपाची आहे. शेतीतून मिळणारे उत्पन्न जेमतेमच असल्याने दुग्ध व्यवसाय गावात चांगलाच रुजला आहे. सन २०१५ पासून चापोली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी तंत्रशुद्ध पद्धतीने दुग्ध व्यवसायाला सुरवात केली. आज दुष्काळातही जवळपास ६० ते ७० टक्के शेतकरी दुग्ध व्यवसायात सातत्य ठेवून आहेत.  दुग्ध व्यवसाय फायद्यात आणण्याचा प्रयत्न  अलीकडील काळात दुग्ध व्यवसायाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक दुग्ध उत्पादक संघर्ष करीत हा व्यवसाय टिकवून धरत आहेत. शंकरवाडीची स्थितीदेखील फार वेगळी नाही. तरीही चिकाटीने व त्यातही दुष्काळात व्यवसाय फायद्यात आणण्यासाठी त्यांचे सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.  साधारण प्रति गाईचा दिवसाचा खर्च किमान २०० रुपयांच्या आतला नाही. संकरित गाय (एचएफ) दिवसाला साधारण १५ ते १८ लिटरपर्यंत दूध देते. सर्वसाधारण फॅटनुसार दुधाला २१ रुपयांपासून २५ रुपये प्रति लिटरपर्यंत दर मिळतो. खर्चात बचत करणे हाच अनेकांपुढे मार्ग आहे. त्या दृष्टीने  प्रत्येक शेतकरी व त्याचे कुटुंब व्यवसायात राबत असल्याने मजुरी खर्चात बचत होते.  शेणखत विक्रीतून उत्पन्न  शंकरवाडीतील बहुतांश शेतकरी अल्प भूधारक, तर अति अल्पभूधारक आहेत. तरीही दुग्ध व्यवसायासाठी पशुधनाचे संगोपन त्यांनी टिकवून धरले आहे. त्यामुळे शेणखत त्यांच्याकडे उपलब्ध असते. आपल्या शेतात दरवर्षी आवश्यक तेवढे शेणखत वापरून उर्वरित शेणखताची विक्री ते करतात. साधारण तीन ते साडेतीन हजार रुपये प्रति ट्रॉली या दराने त्यांना समाधानकारक उत्पन्न मिळते. शेणखत विक्री करून उत्पन्नाचा अतिरिक्त मार्ग येथील शेतकऱ्यांनी शोधला आहे. दरवर्षी गावातून जवळपास २५ ट्रॅक्टर ट्रॉली शेणखताची विक्री होत असावी. कृषी विभागाच्या ‘आत्मा’ अंतर्गत येथील ५० शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीचा गट २०१५ मध्ये स्थापन करण्यात आला आहे. या शेतीला शेणखताचा मोठा आधार होतो.  रोजगारनिर्मिती  पूर्वी चापोली व शंकरवाडी येथे एकही डेअरी उपलब्ध नव्हती. सन २०१५ मध्ये शंकरवाडी येथील शेतकऱ्यांनी संकरित गाईंची खरेदी करून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात करण्यास सुरवात केली. त्या वेळी चापोलीत गुजरातमधील प्रसिद्ध सहकारी तत्त्वावरील कंपनीची डेअरी सुरू झाली. दुधाचे संकलन वाढले. त्यानंतर अन्य कंपनीचीही डेअरी सुरू करण्याच्या माध्यमातून गावात तरुणाला रोजगार मिळाला. तीन वर्षांत तीन डेअऱ्यांमधून युवकांमध्ये रोजगारनिर्मिती झाली आहे.  कुक्कुट व शेळीपालनाची साथ  गावातील काही शेतकरी कुक्कुट व शेळीपालन करून शेतीतील जोखीम कमी करीत आहेत.  काशिनाथ बोर्डे यांच्याकडे सध्या ८० गावरान व २२ कडकनाथ कोंबड्या आहेत. आतापर्यंत पाच वेळा कोंबड्यांची विक्री त्यांनी केली आहे. गोविंद कदम दीड वर्षांपासून बंदिस्त शेळीपालन करीत आहेत. सुरवातीला १२ शेळ्यांची खरेदी केली. आता त्यांच्याकडे लहान मोठ्या धरून ५१ शेळ्या आहेत. आतापर्यंत १८ शेळ्यांची सरासरी पाच हजार रुपये प्रति नग या दराने विक्री केली आहे. शेळीपालनासोबत ते गावरान कोंबड्यांचे संगोपनही करीत आहेत.  शेतीतील प्रयोग  पपईने दुष्काळात तारले  पपई, केळी, आले, हळद, ऊस अशा नगदी पिकांची लागवड गावात होते. दुग्ध व्यवसायाबरोबरच शेतीतही प्रयोग करण्याची धडपड अनेकांची आहे. सचीन कोले या तरुण शेतकऱ्याने मागील जानेवारीत दोन एकरांवर तैवान ७८६ जातीच्या पपईची लागवड केली. सुमारे १८०० झाडांचे संगोपन त्यांनी केले आहे. दिल्ली, जोधपूर, नागपूर येथील व्यापाऱ्यांना विक्री करून आजपर्यंत त्यांनी ८५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. अजून १२ टन उत्पादनाची अपेक्षा आहे.  दहा वर्षांपासून आल्याची शेती  ज्ञानोबा गुरुडे दहा वर्षांपासून सातत्याने एक ते दोन एकरांवर आल्याची शेती करीत आहेत.  शेणखत व सेंद्रिय खतांचा भरपूर वापर त्यांनी जमिनीची सुपीकता वाढवली आहे. सन २०१४ मध्ये दीड एकरांवर साडे सतरा टन उत्पादन त्यांनी घेतले.  ‘जलयुक्त शिवार’मुळे दुष्काळातही पाणी - 

  • ‘जलयुक्त शिवार’अंतर्गत शंकरवाडी येथे २३५ हेक्टरवर कंपार्टमेंट बंडिंग, दोन किलोमीटर नाला खोली व सरळीकरण, दोन मातीनाला बांध, दोन सिमेंट बंधारे दुरुस्ती व दहा शेततळी. त्यातून गावात पाणीपातळी वाढली. 
  • पाण्याची उपलब्धता झाल्याने दुग्ध उत्पादकांनी दहा गुंठ्यांपासून ते दोन एकरांपर्यंत गवताची लागवड केली. 
  • शंकरवाडी दृष्टिक्षेपात -

  • लोकसंख्या - ५२७ 
  • पेरणीयोग्य क्षेत्र - २५० हेक्टर 
  • बहुभूधारक शेतकरी - ५ 
  • अल्पभूधारक शेतकरी - ६४ 
  • अति अल्पभूधारक - ११ 
  • कुक्कुट व शेळीपालन करणारे शेतकरी – १३ 
  • लहान मोठी धरून एकूण जनावरे सुमारे- ४२६ 
  • चापोली व शंकरवाडी येथील डेअरीला दररोज दूध संकलन- ३०० ते ४०० लिटर 
  •  चापोली येथील हॉटेल व घरगुती विक्रीसाठी दररोज दूध- ७० ते ८० लिटर 
  • गायीच्या दुधाचा दर- २१ ते २५ रूपये, म्हशीच्या दुधाचा दर- ४० रुपयांपर्यंत (लिटरला) 
  • चापोली येथील हॉटेल व घरगुती विक्रीसाठी म्हशीच्या दुधाचा दर - ५० ते ६० रुपये. 
  • प्रतिक्रिया  शंकरवाडी येथील शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय निवडून शेतीमधील जोखीम कमी केली आहे. शेतकऱ्यांनी फक्त दुधाची विक्री न करता त्यावर प्रक्रिया करून अजून जास्त नफा मिळू शकेल.  डॉ. एस. बी. क्षीरसागर, पशुधन अधिकारी  ९४०३७७३८४४  दुष्काळामुळे या वर्षी शेतात काहीच पिकले नाही. मात्र दररोज दुधाच्या विक्रीतून आज शेतकऱ्यांच्या हातात ताजा पैसा येत आहे. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी हिरवा चाऱ्याची उपलब्धता करून दुग्ध व्यवसाय दुष्काळातही सुरू ठेवला आहे.  - नरसिंग पस्तापुरे  ८८०५१५१५०६  आमच्या गावाच्या जमिनी निव्वळ खडकाळ व माळरानाच्या आहेत. त्यामुळे शेतीतील उत्पादनावर मर्यादा येतात. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने आम्ही सेंद्रिय शेतीकडे वळलो. त्याद्वारे जमिनीची सुपीकता वाढवली. रासायनिक घटकांचे प्रमाण अल्प करून खर्चात बचत केली.  - ज्ञानोबा गुरुडे,  ९७६४०८०१८१  गावातील काही शेतकरी दुग्ध व्यवसायासोबतच कुक्कुट व शेळीपालन करीत आहेत. त्यात स्वतः शेतकरी कुटुंब राबत असल्याने मजुरीवरील खर्चात बचत होऊन नफ्यात वाढ झाली आहे. फक्त शेतीवर अवलंबून न राहिल्याने तोट्यात जाणारी शेती आज फायद्यात आणण्याचा प्रयत्न आहे.  गणेश कदम  ९१४९८०७०६१  संपर्क- कृषी सहायक- एस. डी. रोकडे- ९४०४७८८४९७v

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com