ऊस पट्ट्यात द्राक्ष शेतीतून साधली प्रगती, विष्णूदास पासमे यांचे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न 

द्राक्ष बाग म्हणजे खूप खर्चिक व किचकट व्यवस्थापन असल्याचा समज परिसरातील शेतकऱ्यांचा आहे. मात्र योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास अन्य पिकापेक्षा अधिक नफा मिळू शकतो, असा आमचा अनुभव आहे. ऊस शेतीला द्राक्ष बागेची जोड दिल्याने प्रगती शक्य झाली. - विठ्ठल पासमे ९१५६८०७५६१. -------------------------------
द्राक्षाचे घड दाखवताना विठ्ठल पासमे.
द्राक्षाचे घड दाखवताना विठ्ठल पासमे.

लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (ता. चाकूर) हे गाव ऊस लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. येथील ९० टक्के शेतकऱ्यांकडे उसाची लागवड आहे. अशा ऊस पट्ट्यात विष्णूदास पासमे यांनी आपली द्राक्षशेती फुलवलेली आहे. गेल्या १२ वर्षापासून दोन एकरवर द्राक्षाचे निर्यातक्षम उत्पादन घेताना योग्य व्यवस्थापन, पाण्याचा काटकसरीने वापर, यांत्रिकीकरण या जोरावर नफ्यामध्ये वाढ केली आहे.  आनंदवाडी (ता. चाकूर, जि. लातूर) येथील विष्णूदास पासमे यांच्याकडे आठ एकर शेती असून, एक प्रयोगशील शेतकरी म्हणून परिसरात परिचित आहेत. त्यांच्याकडे पूर्वी ऊस व पारंपरिक पिकाची लागवड असे. मात्र, शेती अधिक फायदेशीर कशी करता येईल, यासाठी त्यांचे प्रयत्न सतत सुरू असत. २००५ मध्ये नामदेव राचमाळे (रा. तळणी ता. रेणापूर) व नारायण गुरमे (रा. शिरूर ताजबंद, ता. अहमदपूर) या नातेवाइकांकडून द्राक्ष शेतीविषयीची सारी माहिती घेतली. द्राक्ष लागवडीसाठी सुरवातीचा भांडवली खर्च अधिक असला तरी धाडस केले. सुमारे ८ लाख रुपयांचे कर्ज घेत जून २००६ मध्ये द्राक्ष बाग उभी केली. निर्यातक्षम द्राक्ष बागेच्या अनुषंगाने थॉम्सन जातीची निवड केली. छाटणीपासून ते बाजारापर्यंतचे अचूक नियोजन करत गेल्या १२ वर्षापासून द्राक्षशेतीसह सर्व शेती फायद्यात ठेवली आहे. विष्णूदास यांचा मुलगा विठ्ठल हा खासगी महाविद्यालयामध्ये लेक्चरर असून, कॉलेज झाल्यानंतर पूर्ण वेळ द्राक्षबागेमध्ये लक्ष देतो.  द्राक्ष बागेचे व्यवस्थापन – 

  • · क्षेत्र – दोन एकर. 
  •  मांडव – वाय पद्धत. 
  • सिंचन व पाणी व्यवस्थापन – विहीर व गावाशेजारील साठवण तलावापासून दोन किलोमीटर चार इंची पाइपलाइन केली आहे. ठिबकद्वारे पाणी व्यवस्थापन. द्राक्ष बागेत छाटणी ते पुढील ३० दिवस रोज एक तास पाणी. जमीन चांगल्या प्रतीची असल्याने छाटणीनंतर ११० ते १२० दिवसात एक वेळेस पाट पाणी देतात. ४० ते ६० दिवस गरजेनुसार, ६० ते ८० दिवस रोज एक तास, ८० दिवसानंतर गरजेनुसार रोज दीड तास. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात खरड छाटणीमध्ये वेलीचे पोषण व संरक्षण याची काळजी घेतली जाते. 
  • ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात काडीची पक्वता व घडांची निर्मिती केली जाते. 
  • · द्राक्ष फळांचा आकार, रंग, चव यांच्या गुणवत्तेसाठी संजीवकांचा संतुलित वापर. 
  • काड्यांची व मण्यांची विरळणी वेळेत केली जाते. 
  • ही कामे मजुरांकडून करून घेतली जातात. 
  • बहार छाटणी कालावधी – १ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर. 
  •  ऑक्टोबर छाटणीनंतर ४५ व्या दिवशी पर्णदेठ परीक्षण करून विद्राव्य खते व सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा अभ्यासपूर्वक वापर करतात. 
  •  कीड-रोगांसाठी प्रतिबंधक उपाययोजना, डाऊनीसह भुरीवरही बारीक लक्ष ठेवून नियंत्रण ठेवले जाते. 
  • पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उसाच्या पाचटाचे आच्छादन करतात. 
  • दरवर्षी ऑक्टोबर छाटणीच्या १५ दिवस आधी दोन एकर द्राक्षबागेत १२ ते १४ ट्रॅक्टर शेणखत विकत घेऊन टाकतात. 
  • विक्री व्यवस्थापन –  · विष्णूदास पासमे यांच्या द्राक्षबागेचा एकरी खर्च साधारण तीन ते चार लाखापर्यंत असतो. सन २००६ ते आतापर्यंत द्राक्ष उत्पादन एकरी सरासरी १० ते १५ टन इतके राहिले. गेल्या बारा वर्षापासून द्राक्षाची विक्री जागेवरच केली जाते. छत्तीसगड, हैद्राबाद, अकोला, बुलढाणा, वाशीम, अंबाजोगाई येथील व्यापारी येतात. वाहतुकीचा खर्च वाचतो. व्यापाऱ्यांकडून स्थानिक बाजारपेठेसाठी सुमारे ३० ते ४० रुपये प्रति किलो दर मिळतो. तर निर्यातीसाठी ५० ते ७० रुपये दर मिळतो.  · आतापर्यंत व्यापाऱ्यामार्फत युरोप, मलेशिया व दुबई येथे द्राक्षांची निर्यात झाली. (२०११ मध्ये युरोपला दहा टन, २०१२ मध्ये मलेशियाला आठ टन व २०१४ मध्ये दुबईला दहा टन.) सन २०१५ पासून दुष्काळी स्थितीमध्ये निर्यातक्षम उत्पादन घेण्यात अडचणी आल्या. पाणी विकत घेऊन बाग जगविण्याकडेच लक्ष द्यावे लागले.  फवारणी यंत्र बनविले – 

  • द्राक्ष बागेत कीडनाशकांच्या फवारणीसाठी ट्रॅक्टरचलित अनेक कंपन्यांची फवारणी यंत्रे उपलब्ध आहेत. मात्र, त्यांच्या किमती एक लाख ते अडीच लाख रुपयापर्यंत आहेत. विठ्ठल यांनी बाजारातील फवारणी यंत्रे व त्यांचे कार्य समजून घेतले. चापोली येथील एका कारागिराच्या मदतीने केवळ ४५ हजारांमध्ये फवारणी यंत्र बनवून घेतले. त्यामुळे खर्चात बचत झाली आणि फवारणीचे कष्टही कमी झाले. 
  • ‘अॅग्रोवन’चा नियमित वाचक असून, त्यातील यशोगाथा, ऊस व द्राक्षासंदर्भात तज्ज्ञांचे मत, बाजारभाव, हवामान अंदाज याचा शेती नियोजनासाठी फायदा होतो. मोबाईलमध्ये अॅग्रोवनचे अॅपही घेतले असल्याचे विठ्ठल यांनी सांगितले. कृषी सहायक एस. डी. रोकडे यांचेही मार्गदर्शन मिळत असते. 
  • कुटुंबाची साथ  विष्णूदास पासमे यांची पत्नी सुचिता व मुलगा विठ्ठल हे अनुक्रमे घरचे काम व कॉलेजची नोकरी करून उर्वरित वेळात शेतीकडे लक्ष देतात. फवारणीसह बागेतील कामांमध्ये त्यांची मदत होते. पूर्ण कुटुंबाला द्राक्ष शेतीतील बारकावे अनुभवातून ज्ञात झाले आहेत.  आंतरपिकांसह ऊस शेती  उर्वरित शेतीमध्ये दरवर्षी पाच एकरपर्यंत ऊस असतो. मात्र, यावर्षी दुष्काळी स्थितीमुळे केवळ दोन एकर ऊस लागवड केली आहे. उसामध्ये दरवर्षी हरभऱ्याचे आंतरपीक असते. हरभऱ्याचे एकरी पाच क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. पाच एकरच्या आंतरपिकातील ७० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. उसाचे एकरी ५५ टनापर्यंत उत्पादन मिळते. त्याच प्रमाणे खरिपामध्ये सोयाबीन आणि तूर एक एकरमध्ये असते. ऊस आणि द्राक्ष प्रत्येकी दोन एकरवर ठिबक सिंचन केले आहे.    - विठ्ठल पासमे  ९१५६८०७५६१.  ------------------------------- 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com