वधारला गवारचा बाजार; दुष्काळात मोठा आधार

माझ्याकडे केवळ १० गुंठ्यांत गवार आहे. संकरित वाणच घेतले आहे. माल सुरू होऊन महिना झाला. सध्याही तोडणी सुरूच आहे. दर चांगला मिळतो आहे. उपलब्ध पाण्यावरच उत्पादन घेत आहे. आत्तापर्यंत गवारसाठीचा जवळपास खर्च वसूल झाला आहे. आता जे उत्पन्न मिळेल ते नफाच असेल. - आकाश आदाटे, कारंबा
सोलापूर बाजार समितीत आवक झालेली गवार
सोलापूर बाजार समितीत आवक झालेली गवार

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पाच-सहा महिन्यांपासून गवारने चांगलेच मार्केट मिळवले आहे. यंदाचा तीव्र दुष्काळ व त्यातही उन्हाळा यामुळे घटलेली कमी आवक हे त्यामागील कारण आहे.  पण तरीही एकूणच अलीकडील काळात गवारच्या मागणीत सातत्य आहे. त्यातही देशी गवारला सर्वाधिक पसंती मिळते आहे. गेल्या तीन महिन्यांत तर गवारने दरांच्या अनुषंगाने चांगलीच उचल खाल्ली आहे.  महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक अशा तीन राज्यांच्या सीमेवर असलेली सोलापूरची बाजारपेठ शेतमालाच्या दळणवळणासाठी सोयीची आणि खरेदी-विक्री केंद्र म्हणून महत्त्वाची ठरली आहे.  कांदा आणि भाजीपाला यासाठी ती विशेष प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्ह्यासह उस्मानाबाद, बीड, लातूर, सांगली, सातारा आणि पुण्याच्या काही भागांतून या ठिकाणी कांदा, भाजीपाला यांची आवक होते. शिवाय शहरानजीकच्या उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा, मोहोळ या स्थानिक भागांतूनही आवक सर्वाधिक असते.  तेजीत राहणारी गवार  सध्याच्या तीव्र उन्हाळ्यात व दुष्काळात आवक घटल्याने अनेक शेतमालांचे दर चढे आहेत. मात्र, गवार हे असे पीक आहे की त्याचे दर अन्य मालांच्या तुलनेत अलीकडील काळात बऱ्यापैकी चांगले आहेत.  यंदाच्या हंगामात जवळपास सहा महिन्यांपासून गवारच्या आवकेत काहीसा चढ-उतार होत राहिला. पण, दरांतील तेजी मात्र टिकून राहिल्याचे चित्र आहे.  उत्पादन घटले, आवक कमीच  यंदा सोलापूर जिल्ह्यात पाऊस खूपच कमी झाला. परिणामी, पाण्याअभावी फळभाज्या आणि भाज्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. शहरानजीकच्या उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ भागांतील शेतकरी रब्बी हंगामानंतर उपलब्ध पाण्यावर हमखास भाजीपाला आणि फळभाज्यांवर भर देतात. मात्र, दुष्काळजन्य स्थितीमुळे दरवर्षीप्रमाणे या पिकांचे नियोजन ते करू शकले नाहीत. गवारबाबतही असेच म्हणता येईल. सोलापूरच्या गवार पट्ट्यात किमान प्रत्येक गावात सात ते आठ एकरांवर गवार घेतलेली असतेच. पण, यंदा उत्पादन घटल्याने आवक कमी राहिली. त्यामुळे दरही अनेक दिवसांपासून टिकून राहिले आहेत. त्यामुळेच सोलापूर बाजार समितीत त्याचा तुटवडा जाणवला. एक-दोन दिवसाआड पाच ते दहा क्विंटल अशा माफक प्रमाणातच आवक राहिली.  खुले लिलाव, रोख पट्टी  खुले लिलाव आणि रोख पट्टी हे सोलापूर बाजाराचे वैशिष्ट्य आहे. कांद्यासह बहुतेक सर्व भाजीपाल्यांचे व्यवहार याच पद्धतीने होतात, त्यामुळेच स्थानिक भागासह बाहेरील शेतकरी आवर्जून सोलापूर बाजारपेठेला पसंती देतात. बाजारात गवारचेही काही खास व्यापारी आहेत. त्यांच्याकडे गवारचे चांगले लिलाव होतात. त्यामुळेही काही शेतकरी या निवडक व्यापाऱ्यांकडे हमखास गवार घेऊन जातात.  सहा महिन्यांपासून बाजार वधारलेला  जून-जुलैमध्येच गवारची सर्वाधिक लागवड केली जाते. पुढे अडीच ते तीन महिन्यांत प्रत्यक्ष उत्पादनाला सुरवात होते. दर चार दिवसांनी एकदा तोडणी होते. मागील हंगामाबाबत बोलायचे झाल्यास साधारण ऑक्टोबरपासून मार्चपर्यंत म्हणजे सहा महिन्यांच्या कालावधीत १० ते १८८ क्विंटलपर्यंत आवक राहिली. तर दर प्रतिकिलो २० रुपयांपासून ९० रुपयांपर्यंत मिळाले. त्यातही देशी गवारीला दीडपड अधिक दर आहे. गेल्या सहा महिन्यांची आवक आणि दर पाहता २० ते ३० रुपयांच्या फरकाने दरातील तेजी टिकून राहिल्याचे चित्र आहे.  सलग वर्षभर गवार घेणारे शेतकरी  मुख्यतः गवारची तोडणी वेळेवर उरकत नसल्याने हे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी असतो.  मात्र, मार्केटचा अंदाज घेत उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यांत आलटून पालटून सलगपणे गवार घेणारेही शेतकरी आहेत. एखाद्या हंगामात दर मिळाला नाही तर पुढचा एखादा हंगाम साधला जाईल व उर्वरित नुकसान भरून निघेल अशी त्यांची अटकळ असते. साधारण जुलैपासून पुढे एप्रिलपर्यंत गवारचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते.  गेल्या पाच महिन्यांतील गवारची आवक (क्विंटलमध्ये) व दर (रुपयांमध्ये)                                          दर  महिना- --आवक-- -किमान--कमाल---सरासरी  सन २०१८  नोव्हेंबर----१८८---- २०००---५०००----३०००  डिसेंबर--- -९५--- -२२००-- -५५००-----३५००  सन २०१९  जानेवारी--२७------२५००-- -७०००----४५००  फेब्रुवारी- -१०------१२००-----९०००-  -५०००   मार्च----७२ ----- -१५०० ----९००० ----७०००  प्रतिक्रिया  जानेवारीत अर्धा एकरांवर संकरित गवार केली. सध्या काढणी सुरू आहे. तीन तोडे झाले आहेत. दर चार दिवसांनी तोडा येतो. वीस ते ३० किलो गवार मिळते. प्रतिकिलोला ६० रुपये दर मिळतो आहे. सध्या पाणीही कमी आहे. पण बाजार चांगला असल्याने बऱ्यापैकी पैसे मिळत आहेत.  -सिद्धेश्वर भुट्टे, कारंबा, ता. उत्तर सोलापूर  गेल्या काही महिन्यांपासून गवारची आवकच कमी आहे. दुष्काळामुळे मोठा फरक पडला आहे. पण, मागणी चांगली असल्याने बाजारही तेजीत आहे. आवक कमी होईल तसे दर आणखी वधारण्याची चिन्हे आहेत.  - संजय जावळे, व्यापारी, सोलापूर बाजार समिती, सोलापूर 

संपर्क- अकाश आदाटे- ९६६५७७३९६३० सोलापूर बाजार संमिती- ०२१७-२३७४६७८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com