पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून फुलविलेली फळबाग केंद्रित शेती 

दाते यांनी पिकवलेल्या फळांना जागेवरच मार्केट मिळते आहे.
दाते यांनी पिकवलेल्या फळांना जागेवरच मार्केट मिळते आहे.

पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय पद्धतीवर भर देत नाशिक जिल्ह्यातील जळगाव नेऊर येथील हरिभाऊ दाते यांनी फळबाग केंद्रित शेतीतून अर्थकारण उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. निंबोळी पेंडनिर्मितीची जोड देऊन उत्पन्नाचा स्राेतही वाढवला आहे.  नाशिक जिल्ह्यातील येवला दुष्काळी तालुका आहे. पालखेडचे आवर्तन व विहिरीत पावसाळ्यात साठवलेले पाणी हा एकमेव सिंचनाचा पर्याय. तालुक्यात जळगाव नेऊर येथे हरिभाऊ दाते यांची सात एकर शेती आहे. कांदा हे त्यांचे प्रमुख पीक. सुरवातीच्या काळात पाणीटंचाई व भांडवलाचा अभाव असल्याने हरिभाऊ दाते यांचा शेती व्यवसाय अडचणीचा होता. मग त्यांनी मोलमजुरीकरून एक- एक पैसा जोडला. वाट्याला आलेल्या वडिलोपार्जित तीन एकर जमिनीला स्वकष्टाने आणखी तीन एकरांची जोड दिली. कांदा हे मुख्य नगदी पीक होते. मका, सोयाबीन यांची त्यास जोड होती. हवामानातील बदल, वाढलेला उत्पादन खर्च, मजूरटंचाई व दरांतील घसरण यामुळे कांदा पीक परवडत नव्हते. अशावेळी मुलगा भरत याने सर्व स्थितीचा अभ्यास करून फळशेतीची कल्पना मांडली. एकदा लागवड केल्यानंतर योग्य व्यवस्थापन केल्यास पुढील काही वर्षे त्यातून चांगले उत्पादन व उत्पन्न मिळू शकते हे ओळखले. मग चार एकर क्षेत्रांपैकी २०१६ मध्ये प्रत्येकी दोन एकरांत पेरू व ॲपल बोरची लागवड केली. यासाठी बँक ऑफ बडोदा यांच्याकडून दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले. तिथून मग जीवनाला कलाटणी मिळण्यास सुरवात झाली. आता जोडीला हंगामी पिकांबरोबर मिरची, आले ही पिकेही असतात. पेरूचे लखनौ ४९ वाण आहे. त्याची एकूण ९०० तर ॲपल बोरची आठशे झाडे आहेत. सीडलेस लिंबूची ४० झाडे लावली आहेत. सघन पद्धतीने लागवड केल्याने झाडांची संख्या व पर्यायाने उत्पादनात वाढ होत आहे. हरिभाऊ, पत्नी शेतीत राबतातच. शिवाय सुटीच्या दिवसात मुलगा भरत व सूनबाईंची पूर्णवेळ मदत होते. गरजेनुसार मजुरांची मदत घेतली जाते.  सिंचन व्यवस्थापन  दोन विहिरी व एक बोअरवेल आहे. यामुळे उपलब्ध पाणीसाठा कमी आहे. यावर मात करून फळबाग, भाजीपाला व अन्य पिकांसाठी प्रवाही पद्धतीचा वापर टाळला आहे. ठिबक, स्प्रिंकलर अशा सूक्ष्म सिंचन प्रणालीचा वापर ते करतात. उन्हाळ्यात जैविक मल्चिंगचा अवलंब करतात. नवीन तंत्रज्ञान स्वीकारणे हे दाते यांच्या शेतीचे वैशिष्ट आहे. सेंद्रिय शेतीची कास धरत फळबाग, भाजीपाला, दुग्धव्यवसाय, निंबोळी खतनिर्मिती अशा पूरक व्यवसायांची जोड देत त्यांनी प्रगती साधली आहे. एकात्मिक शेती पद्धतीचा आदर्शच त्यांनी उभारला आहे.  अवशेषषमुक्त शेतीचा ध्यास  रासायनिक अवशेषमुक्त शेती हा दाते यांचा ध्यास आहे. देशी खिलारी गायींचे ते संगोपन होते. शेतातील गवत, पाचोळा, निंबोळी पेंड यांचा वापर होतो. गायीचे शेण, मूत्र, गूळ, बेसनपीठ यांपासून बनवलेल्या स्लरीचा वापर होतो. त्यातून जमिनीची सुपीकता वाढली आहे. रासायनिक खेते व कीडनाशकांचा वापर अल्प प्रमाणात गरजेनुसार होतो. पावसाळ्यात पेरू बागेत मूग पेरला जातो.  निंबोळी पेंड खतनिर्मिती  रासायनिक खतांच्या अनियंत्रित वापरामुळे जमीन नापीक होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. हे ओळखून नागपूरहून निंबोळी पेंडनिर्मितीचे यंत्र आणले. पेंड व नीमतेल बनवून शेतात वापर होतो. निंबोळी खताची ते विक्रीही करतात. वर्षभरात प्रती ४० किलो वजनाच्या पाचशे ते सहाशे बॅग्जची विक्री होते. त्यातील नफ्याचा शेतीत भांडवल म्हणून वापर होतो.  उत्पादन व विक्री व्यवस्था  दरवर्षी नोव्हेंबर ते मार्चदरम्यान पेरू व ॲपल बोरांचा काढणी हंगाम असतो. पेरूचे एकरी सुमारे १० ते १२ टन तर ॲपलबेरचे १२ ते १५ टनांपर्यंत उत्पादन मिळते. पेरूसाठी एकरी ५० हजार तर ॲपलबेरसाठी सुमारे ६० हजार रुपये खर्च होतो. दर्जेदार उत्पादनामुळे व्यापारी थेट बांधावर येऊन खरेदी करतात. पुढे हा माल गुजरात, मध्यप्रदेश, हरियाणा आदी ठिकाणी पाठविला जातो. ॲपल बोराला सरासरी प्रतिकिलो १५ ते २० रुपये तर पेरूला २० ते ३० रुपये दर मिळतो.  ॲग्रोवन दीपस्तंभ  ॲग्रोवनमधील तज्‍ज्ञांचा सल्ला, नवे तंत्रज्ञान, यशोगाथा यांच्यामुळे दाते यांचा दृष्टीकोन बदलला. नवी उमेद निर्माण झाली. ॲग्रोवनचे अंक त्यांनी संग्रहात ठेवले आहेत सन २०१५ चे ॲग्रोवनचे गाईडही मार्गदर्शक म्हणून ठरले. दरवर्षी ॲग्रोवनचा दिवाळी अंक खरेदी करून ते संग्रहित ठेवतात. ॲग्रोवन आपल्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरतो असे ते म्हणतात. मोलमजुरी करून दाते यांनी मुलाचे शिक्षण केले. आज त्यांचा मुलगा भरत पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे.  संपर्क- हरिभाऊ दाते : ९६८९६५१०५५ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com