चाराटंचाईमध्ये हायड्रोपोनिक्स चाऱ्याची निर्मिती फायदेशीर

हायड्रोपोनिक्स तंत्राने कमी जागेत, कमी पाण्यात, कमी कालावधीत हिरव्या चाऱ्याची निर्मिती करता येते.
हायड्रोपोनिक्स तंत्राने कमी जागेत, कमी पाण्यात, कमी कालावधीत हिरव्या चाऱ्याची निर्मिती करता येते.

अत्यल्प पर्जन्यमानामुळे चारा उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. तसेच, कमी पावसामुळे पिकाची वाढ खुंटल्यामुळे हिरवा चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ शकते. पारंपरिक पद्धतीपेक्षा हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जनावरांसाठी कमी वेळेत सकस चारा उपलब्ध होऊ शकतो. बदलते हवामान आणि पाण्याची कमतरता यामुळे जनावरांना १२ महिने दर्जेदार चारा उपलब्ध करून देणे ही समस्या ठरू लागली आहे. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानामुळे हे शक्य आहे. या तंत्राने चारा तयार केल्यास खर्च आणि वेळ दोन्ही गोष्टी नियंत्रणात राहतात. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे चारा उत्पादन म्हणजे कोणत्याही माध्यमाशिवाय कमीत कमी पाण्यामध्ये व कमीत कमी क्षेत्रावर नियंत्रित वातावरणात मका, गहू या बियाण्यापासून २० ते २५ से.मी.उंचीचा चारा उत्पादन करणे होय. २० ते २५ से.मी. पीक अवस्था असताना चारा मुळासकट जनावरांना देता येतो. हायड्रोपोनिक्स चारा तयार करण्याची पद्धत

  • हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाने प्रामुख्याने मका, गहू व बाजरी या तृणधान्यांची वाढ करून चारानिर्मिती करता येते. परंतु, या पद्धतीद्वारे ज्वारीचा उपयोग करू नये. कारण कोवळ्या ज्वारीच्या ताटामध्ये हायड्रोसायनिक अॅसिड असल्यामुळे जनावरांना विषबाधा होण्याचा संभव असतो.
  • बियाणे निवडताना, बियाणे चांगले व उत्तम प्रतीचे असावे. टपोरे दाणे, किमान ८o टक्के उगवणक्षमता, रोगमुक्त व बुरशीमुक्त असावे. तसेच, बियाणे कोणतीही बीजप्रक्रिया केलेले नसावे. असे केल्यामुळे जनावरांना होणा-या विषबाधेचा धोका टाळू शकतो.
  • सर्वप्रथम बियाणे स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घ्यावे. त्यानंतर ते बियाणे मोड येण्यासाठी १२ ते २४ तास कोमट पाण्यात भिजत ठेवावे. यानंतर पाणी काढून ते बियाणे ओल्या बारदान्यात पुढील ४८ तासांसाठी दडपून ठेवावे. यामुळे बियाण्यास मोड येण्यास सुरुवात होते. वातावरणाच्या अंदाजानुसार बारदान्यावर सकाळ व संध्याकाळी पाणी शिंपडून ते सतत ओलसर ठेवावे.
  • कोंब फुटण्यास सुरुवात झालेल्या बियाण्यावर ५ टक्के मिठाचे द्रावण शिंपडावे. यामुळे ओलसर असलेल्या वातावरणात वाढणा-या बुरशीची वाढ होत नाही.
  • बुरशीच्या प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशींनाशकाचा वापर करता येईल.
  • यानंतर २ फूट × १.५ फूट × २ इंच या आकाराचे ट्रे घ्यावेत. ट्रे स्वच्छ पाण्यात धुऊन चांगले वाळवून घ्यावेत. पूर्णपणे मोड आलेले तृणधान्य १ किलो प्रतिट्रे याप्रमाणे पसरवून द्यावे व असे ट्रे शेडमध्ये लाकडाच्या किंवा बांबूच्या ताट्यांवर ठेवावेत.
  • शेडमध्ये आर्द्रता कायम टिकून राहावी म्हणून फॉगर्स किंवा मायक्रोस्प्रिंकलरचा वापर करता येतो. फॉगर्सचा वापर केल्यास दिवसातून ७ वेळेस २ तासांच्या अंतराने प्रत्येक वेळेस ५ मिनिटे याप्रमाणे पाणी द्यावे. पूर्ण २४ तास फॉगर्सचा उपयोग केल्यास वीजपंपाला टायमरचा वापर करावा.
  • अशा पद्धतीने ११ ते १२ दिवसांत २० ते २५ सें.मी. उंचीचा हिरवा चारा तयार होतो. त्यातून जवळपास १० ते १२ किलो हिरव्या चाऱ्याचे उत्पादन प्रती ट्रे मिळते.
  • जनावरांना चारा देण्याचे प्रमाण दुभत्या जनावरांना प्रतिदिवस १५ ते २० किलो चारा लागतो व भाकड जनावरांना ६ किलो. प्रतिदिवस प्रतिजनावर यानुसार आपल्याकडील असलेल्या एकूण जनावरांच्या संख्येनुसार ट्रेचे नियोजन करावे. फायदे

  • कमी जागेत, कमी पाण्यात, कमी कालावधीत, स्वस्तात हिरव्या पौष्टिक चाऱ्याची निर्मिती करता येते.
  • हायड्रोपोनिक्‍स या तंत्रज्ञानात पाण्याचा अतिशय कमी वापर होत असल्यामुळे उन्हाळ्यात, पाणीटंचाईत व दुष्काळसदृश परिस्थितीत या तंत्रज्ञानाचा खूप मोठा आधार होऊ शकतो.
  • जनावरांच्या आहारात पशुखाद्याच्या वापराच्या खर्चाचा विचार केला असता, त्यापेक्षा कमी खर्चात जास्त प्रमाणात चारा जनावरांना देता येतो. यामुळे पशुखाद्यावरील सरासरी २५ ते ४० टक्के खर्च कमी करता येऊ शकतो व दुधाच्या प्रमाणातदेखील वाढ होते.
  • सुरुवातीला ट्रेचा खर्च वगळता यात खूप कमी खर्चात चारा उत्पादित करू शकतो. ३ ते ४ रुपये प्रतिकिलो चारा याप्रमाणे उत्पादन खर्च येतो.
  • दुधाच्या प्रमाणात, तसेच फॅटमध्ये वाढ होते.
  • जनावरांच्या शरीरात प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वाच्या उपलब्धतेत वाढ होते.
  • प्रथिने, जीवनसत्त्वे, अँटीऑक्‍सिडंट्‌स, फॉलिक ऍसिड, ओमेगा-३, स्निग्ध पदार्थ हरितद्रव्यात मोठ्या प्रमाणात असतात.
  • या पद्धतीद्वारे चारा उत्पादित करताना कोणतेही खत किंवा रसायनांचा वापर होत नसल्यामुळे पूर्णपणे नैसर्गिक चारा जनावरांस मिळतो.
  • संपर्क ः टी. डी. साबळे, ९९२१४९३७६४ (श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मालदाड, संगमनेर, जि. नगर)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com