सेंद्रिय शेती पद्धतीसाठी जीवामृतासारख्या घटकांची निर्मितीही शेतावरच करता येते.
सेंद्रिय शेती पद्धतीसाठी जीवामृतासारख्या घटकांची निर्मितीही शेतावरच करता येते.

सेंद्रिय शेतीचे तत्त्व जाणून घ्या

जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची कमतरता, क्षारांचे वाढते प्रमाण, अन्नधान्यामध्ये सापडणारे कीडनाशकांचे अंश अशा समस्या वेगाने वाढत आहेत. त्यावर मात करण्यासाठी सेंद्रिय शेती उपयुक्त ठरू शकते. सध्या सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये उत्पादनाच्या विक्रीच्या समस्यांवरही काम करावे लागणार आहे. शेतीमध्ये अधिक उत्पादनाच्या अपेक्षेने रासायनिक खते, कीटकनाशके व तणनाशके यांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. या घटकांच्या असंतुलित वापरामुळे निसर्गातील अनेक घटकांवर विपरीत परिणामही दिसून येऊ लागले आहेत. उदा. जमिनीत क्षारांचे प्रमाण वाढणे, सेंद्रिय कर्बात घट, अन्नद्रव्यांचा ऱ्हास, अन्नद्रव्याचे असंतुलन, या बरोबरच माती आणि पाण्याचे प्रदूषण, रोग व किडींच्या प्रमाणात वाढ इ. या समस्यांवर मात करण्यासाठी सेंद्रिय शेतीचे तत्त्व पुढे आले आहे.

सेंद्रिय शेती पद्धती ही निसर्गातील विविध तत्त्वांच्या उपयोगावर आधारित आहे.

  • प्रामुख्याने शेतीतील पिकांचे अवशेष, सेंद्रिय पदार्थ, जिवाणू यांचा वापर केला जातो. काडी कचरा, धसकटे, तण, जनावरांचे मूलमूत्र, अवशेष इत्यादी शेतात अथवा शेताबाहेर कुजवून सेंद्रिय खतांची निर्मिती केली जाते. राज्यामध्ये अनेक भागातील जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे कमी प्रमाण हीच समस्या आहे. सातत्याने अधिक उत्पादन देणारी ठराविक पिके वर्षानुवर्षे त्याच जमिनीत घेतली गेल्याने ती उद्भवली आहे. त्यावर पिकांचे अवशेष तिथेच गाडून सेंद्रिय कर्बाचा पुरवठा संतुलित करणे हाच एक उत्तम पर्याय आहे.
  • व्यवस्थापन पद्धतीमध्ये आंतरपिके, पिकांचे फेरपालट, हिरवळीची खते अशा घटकांचा समावेश केला जातो. नत्राच्या स्थिरीकरणासाठी शेतात ताग, धैंचा यांसारख्या हिरवळीच्या पिकांची पेरणी करून ती जमिनीत गाडली जातात. डाळवर्गीय पिकांमुळे जमिनीत नत्राचे मोठ्या प्रमाणावर स्थिरीकरण होते. अशा पिकांचा अंतर्भाव पीक पद्धतीमध्ये फेरपालटासाठी केला जातो.
  • नत्र स्थिरीकरणाचे प्रमाण वाढविण्याकरिता विविध जैविक घटकांची बीजप्रक्रिया, आळवणीद्वारे वापर केला जातो.
  • गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने होत असलेल्या फवारणीमुळे किडी-रोग त्यासाठी प्रतिकारक्षम झाले आहेत. त्याच प्रमाणे नवीन रोग आणि किडीचा प्रादुर्भावही होताना दिसत आहे. या किडीरोग कीडनाशकांना दाद देत नसल्याचे चित्र आहे. सेंद्रिय पद्धतीमध्ये कीड नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतींसह सेंद्रिय, वनस्पतिजन्य, जैविक घटकांचा वापर केला जातो.
  • देश पातळीवर सेंद्रिय उत्पादनाची स्थिती देश पातळीवर सिक्कीम राज्याने संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीखाली आणण्याचे आव्हान पेलले आहे. अलीकडेच उत्तरांचल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, केरळ व छत्तीसगड राज्यांनीही आपले सेंद्रिय शेतीचे धोरण निश्चित केले आहे. काही अंशी सेंद्रिय शेतीचा अवलंबदेखील सुरू केला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याची भूमिका असली तरी प्रत्यक्ष जमिनीवर त्याचे पर्यवसान होताना दिसत नाही. सेंद्रिय शेतीमध्ये वाढ होण्यासाठी सेंद्रिय शेती प्रशिक्षणे, कार्यशाळा, प्रसिद्धी याबरोबरच सेंद्रिय उत्पादनांच्या विक्रीची नियमित व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

    अन्नद्रव्य व्यवस्थापन

  • सेंद्रिय शेतीसाठी शेणखत, कंपोस्टखत, कोंबडीखत, हिरवळीचे खत आणि गांडूळखत या भरखतांचा आणि अखाद्य पेंडींचा जोरखतांसाठी वापर करता येतो.
  • उपयुक्त जिवाणूंचे प्रमाण वाढविण्यासाठी रायझोबियम, ॲझेटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलियम, ॲसेटोबॅक्टर, स्फुरद विरघळवणारे जिवाणू (पीएसबी) या जिवाणू खतांचा वापर केला जातो. अशा घटकांचा बीजप्रक्रियेसाठी वापर केल्यास उत्पादनात ८ ते १० टक्के वाढ होत असल्याचे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे.
  • बायोडायनॅमिक, जीवामृत, बीजामृत, पंचगव्य इत्यादीचा वापर सेंद्रिय शेतीमध्ये केला जातो. या सेंद्रिय निविष्ठांच्या निर्मितीची पद्धती अद्याप प्रमाणित झालेल्या नसल्या तरी शेतकऱ्यांच्या अनुभवातून चांगले निष्कर्ष मिळाले आहेत.
  • सेंद्रिय निविष्ठा

  • बीजामृत (बीजप्रकिया) : बीजामृत तयार करण्यासाठी गाईचे शेण १ किलो, गोमूत्र १ ली, दुध १०० मि. लि., चुना ५० ग्रॅम, पोयटा माती ५० ग्रॅम, ट्रायकोडर्मा व्हिरिडी १०० ग्रॅम प्रति २०० लिटर पाणी
  • वापर : हे मिश्रण रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी बीजप्रक्रियेसाठी वापरता येते.
  • जीवामृत : शेण १० किलो, गोमूत्र १० लिटर, गूळ २ किलो, बेसन पीठ २ किलो, वनातील माती १ किलो प्रति २०० लिटर पाणी
  • वापर : प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये तयार केलेले हे द्रावण दररोज ३ वेळा ढवळावे. ५ ते ७ दिवस आंबवल्यानंतर त्याचा वापर प्रतिएकर क्षेत्रासाठी करता येतो.
  • अमृतपाणी : गाईचे शेण १० किलो, गाईचे तूप २५० ग्रॅम, गूळ ५०० ग्रॅम प्रति २००लिटर पाणी
  • वापर : हे तयार केलेले अमृत पाणी ३० दिवसांच्या अंतराने १ एकर क्षेत्रासाठी पाण्याद्वारे द्यावे. त्यानंतर १ महिन्याने झाडाच्या २ ओळींमध्ये पाण्यातून देता येते.
  • दशपर्णी अर्क : १० वनस्पतींचा २० – २५ किलो पाला (कडुलिंब + बेशरमी + टणटणी + रुई + झेंडू + करंज + गुळवेल + धोत्रा + सीताफळ +निर्गुडी प्रत्येकी २ किलो प्रमाणात घ्यावा. ), हिरव्या मिरचीचा ठेचा २ किलो, लसूण २५० ग्रॅम, शेण ३ किलो, गोमूत्र ५ लिटर पाणी प्रति २०० लिटर टाकावे. हे मिश्रण दररोज ३ वेळा ढवळावे. त्यानंतर १ महिना चांगल्या प्रकारे आंबल्यानंतर त्याचा वापर फवारणीसाठी करता येतो. २०० लिटर अर्कामधून ५ लिटर दशपर्णी अर्क गाळून घ्यावा. त्यात २०० लिटर पाणी मिसळून विविध किडी व रोगांच्या प्रतिबंधासाठी फवारणीद्वारे वापरावे. त्याचा मररोग (मूळकुजव्या), भुरी, केवडा, करपा या रोगांच्या नियंत्रणासाठीही उपयोग होत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
  • संजीवक : गाईचे शेण १०० किलो, गोमूत्र २०० लिटर, ५०० ग्रॅम गूळ प्रति ३०० लिटर पाणी
  • वापर : हे मिश्रण प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये टाकून १० दिवस आंबवून घ्यावे. नंतर त्याच्या २० पट पाणी घेऊन १ एकर क्षेत्रावर पाण्यावाटे पिकास देता येते.
  • पंचगव्य : १ किलो शेणखत, ७ लिटर गोमूत्र, २ लिटर दही, ३ लिटर दूध, ३ लिटर नारळाचे पाणी, ३ किलो गूळ, १२ केळी प्रति १० लिटर पाणी
  • वापर : हे मिश्रण ७ दिवस आंबवून दिवसातून २ वेळा हलवावे. तयार झालेले पंचगव्य १० लिटर पाण्यात जमिनीवर पाण्यावाटे देता येते. एकरी २० लिटर पंचगव्य वापरावे.
  • अंबादास ना. मेहेत्रे, ९५४५३२३९०६ डॉ. एस. एच. पठाण, ८१४९८३५९७० (वरिष्ठ संशोधन सहाय्यक, सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, कृषिविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com