व्यवहारांच्या नोंदीसाठी पासबुक महत्त्वाचे

पासबुक
पासबुक

पासबुकमध्ये आपण खात्यामध्ये ठेवलेल्या पैशांची किंवा खात्यातून काढलेल्या पैशांची, व्याजाची नोंद केली जाते. त्यामुळे बॅंक व्यवहारासाठी पासबुक महत्त्वाचे असते.   राधा कधी एकदा माहेराहून येते नि तिला बँकेत जाऊन पैसे काढल्याचं सांगते असं भीमाला झालं होतं. दोन दिवसांनी राधा माहेराहून आली तशी तिनं लगोलग पोरासोबत निरोप पाठवला दुपारी भेटायला येते. असं का बरं आधीच कळवलं तिनं? भीमाच्या जिवाला घोर लागला. दुपार झाली तशी राधा एक पुस्तक हातात घेऊन भीमाकडं आली. ‘कधीची वाट पाहते आहे बघ तुझी... अन् हे काय आहे हातात?’ भीमा राधाला बघून म्हणाली. राधा म्हणाली, ‘हे तुमचं बँकेचं पुस्तक! त्याला पासबुक म्हणतात आपण पैसे ठेवले की काढले, बँकेनं व्याज दिलेलं सगळं त्यात लिहिलेलं असतं. पण तुम्ही माझी का हो वाट पाहत होता?’... राधाच्या या प्रश्नाने घडलेलं सगळं भीमानं सांगितलं आणि हातातल्या पुस्तकाकडें बघून म्हणाली, ‘बघू?’ भीमाचा प्रसंग ऐकून हुश्श झालेली राधा म्हणाली, ‘पुन्हा फाट्यापर्यंत चालत जायलां नको म्हणून माहेराहून येतानाच मी तुमचं पुस्तक भरून आणायला बँकेत गेले. तर त्यात भरलेल्या पैशापेक्षा कमीच दिसले. कोणीतरी तुमच्या खात्यातून पैसे काढलेत असंही दिसलं मग मी साहेबाला भेटले तर त्यांनी तुम्ही पैसे काढल्याचं सांगितलं. माझा तर विश्वासच बसेना म्हणून तर आले होते तुम्हाला विचारायला. बरं झालं तुम्हालापण कळालं सगळं’ तेवढ्यात भीमाबाई म्हणाली, ‘मला वाटत होतं की मी सांगितलं तरच तुला कळेल, पण पुस्तकात नोंद असली की पुस्तकच बोलतं सारं! आता कळालं की शिकलं असलं म्हंजे वाचूनपण कळतं सारं!’ बचत गटामुळे लेखी नोंदी किती महत्त्वाच्या असतात हे कळालं होतंच; पण त्याचा उपयोग भीमाबाईला आता कळायला लागला. हातातलं बँकेच पुस्तक घेऊन, तिने कडूसरीचं चिठोर काढलं नि जपून पुस्तकात ठेवायला लागली तशी राधा म्हणाली, ‘आता ते नाही जपलं तरी चालेल’ ‘असं कसं? त्यामुळेच तर मी बँकेतलं काम करू शकले’ भीमाबाई सांगत होती तर राधा म्हणाली, ‘हा कागद पुस्तक भरून आणेपर्यंत सांभाळायचा. एकदा का पुस्तकात नोंद झाली की झालं!’ पहिला विषय बोलून संपल्यावर भीमाला पोरीचं बोलण आठवलं. ‘राधा आपल्या मीराचं पण खातं काढायचं आहे जमेल का?’ ‘का नाही जमणार?’ राधा म्हणाली. ‘न्हाही मीरा आपल्या गावात आता राहत न्हाई ना... तिचा सासरचा तालुकापण वेगळा आहे ना म्हणून विचारते....’ मग राधानं भीमाला उलगडून सांगितलं की खातं काढायचं त्या माणसाकडं रहिवासी पुरावा असला आणि ज्या बँकेत खातं काढायचं त्या बँकेतला ओळखणारा माणूस फॉर्मवर सही करायला तयार असला, की कुठल्यापण बँकेत कोणीपण खातं काढू शकतं. भीमाला ही माहिती नवीनच होती. ‘पण एकेका बँकेकडं काही गावं असतात ना? मग हे कसं चालेल?’ भीमात्यानं मनातली शंका बोलून दाखवली. तशी राधा म्हणाली, ‘अहो आत्या सरकारी काम करायला, सबसिडी मिळवायला ते तसलं लागतं; पण नुसती बचत करायची तर काय कुठेपण खातं काढता येतं. आत्या आपण जे तुमचं खातं काढलंय त्याला बचत खातं म्हणायचं. धंदा करणारी लोकं सारखं पैसे ठेवतात नि काढतात ते वेगळं खातं. त्याला पैशाला व्याज नाही मिळत. आपण बचत खातं काढलं की थोडं का होईना पण व्याज मिळतं. हे असं बचतीच खातं कुठेपण काढता येतं. आता आपल्याच गावची मुंबईत रहाणारी लोकं आहेत, ती तर तिथंसुद्धा खातं काढतात.’ ‘व्हय व्हय ..... तो दादू म्हणालाच होता त्याच मुंबईच्या बँकेत खातं हाये म्हणून! पण काय गं तो मुंबईला राहातो तिथला पत्ता बँकेला देणार का? गावातला?’ भीमात्या उगाचच आलेली शंका विचारात होती. राधा म्हणाली, ‘दादुकडं ज्या पत्याचा पुरावा असेल तो पत्ता देणार म्हणजे जर गावातलं आधार कार्ड पत्ता म्हणून दिलं, तर खातं मुंबईला असलं तरी गावाकडचाच पत्ता खात्यावर लागतो त्याला पक्का पत्ता म्हणतात; पण त्यासोबत भाड्याच्या जागेचा पत्ताही माहितीसाठी लिहावा लागतो. पण तेवढंच महत्त्व असतं ते ओळखणाऱ्याच्या सहीला! तो माणूस मात्र त्याच बँकेतला लागतो.’ हे सारं ऐकल्यावर भीमानं मीराला फोन केला की तुझं खातं या बँकेत काढता येईल, राधाताई मदत करेल; पण पुढच्या वेळी माहेरी येताना कान दिसतील असे साधे २ फोटो व रहिवासी पुरावे घेऊन ये. जावयांच्या कानावर घाल बघ काय म्हणतात ते.... असं सांगायला ती विसरली नाही.   संपर्क ः सुवर्णा गोखले, ९८८१९३७२०६ (लेखिका ज्ञान प्रबोधिनी, पुणे येथे कार्यरत अाहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com